तेलंगणा : तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या श्रीनिधी हिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीनिधी दहावीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली. शाळेतील एका शिक्षकाने श्रीनिधीची तब्येत बिघडल्याचे बघितले. यानंतर श्रीनिधीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. पण तिने प्रतिसाद दिला नाही.
नंतर श्रीनिधीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात तपासणी करुन डॉक्टरांनी श्रीनिधीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने कामारेड्डी परिसर हादरला आहे. दरम्यान दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.