Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यदिल्लीत ९८ वे साहित्य संमेलन...

दिल्लीत ९८ वे साहित्य संमेलन…

११ मे १८७८ साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्याच्या हिराबागेत संपन्न झाले, ज्याचे अध्यक्ष होते न्या. महादेव गोविंद रानडे, तर ३७ वे साहित्य संमेलन १९५४ साली ‘दिल्ली’ येथे संपन्न झाले त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी. आता तब्बल सात दशकांनी प्रथमच ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. ज्याचे संमेलनाध्यक्ष आहेत डॉ. तारा भवाळकर. लोकसंस्कृतीविषयी विपुल लेखन करणाऱ्या भवाळकर महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलनाबद्दल, तेही देशाची राजधानी येथे, काय भूमिका मांडणार आहेत, याचीही उत्सुकता सगळ्यांनाच आहे!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

सर्वसाधारण आढावा घेतला तर साधारण १४६ वर्षांच्या काळात आता ९८वे संमेलन, भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत संपन्न होत आहे. आतापर्यंत एकंदरीत १८ संमेलने महाराष्ट्राबाहेर संपन्न झालीत आणि आता हे १९ वे संमेलन आता दिल्लीत संपन्न होत आहे. जवळजवळ ७० वर्षांनंतर दिल्लीमध्ये हे संमेलन संपन्न होत आहे याचा आनंद दिल्लीस्थीत मराठी बांधवांबरोबर महाराष्ट्रातील मराठी साहित्यक तसेच रसिकांनाही होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे, दिल्ली आयोजित ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे त्यांच्या तारखा आहेत २०, २१ आणि २३ फेब्रुवारी. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत, तर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडणार आहे.

भारताच्या कानाकोपऱ्यांत नोकरीनिमित्त वसलेला मराठी भाषिक मराठी साहित्यापासून, मराठी साहित्यिक कार्यक्रमांपासून दुरावला जातो म्हणूनच अधूनमधून साहित्य संमेलने महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये घेणे जरूरी असते. यानिमित्ताने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून सर्व गटातील माणसांना ‘साहित्य संमेलन म्हणजे काय असते?’ हे तर कळतेच; परंतु त्यानिमित्ताने आपण पुस्तकातून जे साहित्यिकांना वाचतो आहे त्या साहित्यिकांना प्रत्यक्ष पाहता येते, ऐकता येते, भेटता येते. ग्रंथदालनातून त्यांची पुस्तके विकत घेऊन त्यावर तिथेच साहित्यिकांच्या सह्या घेता येतात. यानिमित्ताने काही स्थानिक साहित्यिकांनाही या संमेलनात सामावून घेता येते. यंदा साधारण १२० ग्रंथ दालने या संमेलनात असण्याचा अंदाज आहे. यात राजहंस, ग्रंथाली, दिलीपराज, तेजश्री, संस्कृती, चपराक, युवा ध्येय, अष्टगंध, अथर्व, मौज, रोहन, मेहता, साहित्य अकादमी इ. प्रकाशकांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे उत्तमोत्तम पुस्तक दिल्ली तसेच महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. ही पुस्तके घेऊन जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी पाच टन पुस्तकांनी भरलेला ट्रक, सोळा फेब्रुवारीलाच दुपारी पुण्यावरून दिल्लीकडे रवाना झाला आहे.

‘सावाना’चे (सार्वजनिक वाचनालय नाशिक) अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी १८३० ते १९१० या कालखंडात गाजलेल्या मराठी पुस्तकांवर लिहिले आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या पुस्तकांचा आढावा घेणारे त्यांचे ‘पुस्तकानुभव’ हे अनोखे पुस्तक प्रकाशित होत आहे. याशिवाय अनेक पुस्तकेही दिल्लीत प्रकाशित होणार आहेत, असे ग्रंथप्रकाशन समितीचे अध्यक्ष तसेच ‘चपराक’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी कळविले आहे.  ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  दिल्ली येथील सरहद स्टेडियममध्ये  ‘तालकटोरा स्टेडियम’ येथे होत आहे. या वर्षीच्या साहित्य संमेलनाची पत्रिका पाहिल्यावर लक्षात येते की दरवर्षीप्रमाणे उद्घाटन, समारोपाचा सोहळा, काही सत्कार, मुलाखत, कवी संमेलन, परिसंवाद, कवी कट्टा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. सर्व कार्यक्रम आहेतच; परंतु महाराष्ट्राबाहेर म्हणजेच दिल्लीत हे संमेलन असल्यामुळे तिकडच्याही रसिक वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून ‘बहुभाषिक कवी संमेलन’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’, ‘बृहन्महाराष्ट्रातील माणसाचे जीवन आणि साहित्य’ अशा समायोजित वेगळ्या विषयांवरील परिसंवाद जाणीवपूर्वक आयोजित केले गेले आहेत.’

साहित्य संमेलन हे मराठी भाषेत वाङ्मय उत्पन्न करणाऱ्या लोकांचे संमेलन आहे. हे संमेलन जातीविशिष्ट संप्रदायविशिष्ट किंवा स्तलविशिष्ट नाही. म्हणजे मराठी वाङ्मयाचा सेवक, मग तो कोणत्याही संप्रदायाचा अगर धर्मांचा असो, त्याचे येथे स्वागत आहे, असे १९३१ साली हैदराबाद येथे येथील संमेलनाध्यक्ष पदावरून श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी व्यक्त केलेले महत्त्वाचे विधान आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच जिथे जिथे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी मिळेल तिथे तिथे साहित्य संमेलने आयोजित केली गेली तर तिथे कमीत कमी एक प्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष हजेरी लावूया! ‘घुमान’ येथे साहित्य संमेलन आयोजित केले गेले होते. तेव्हा त्या संमेलनस्थळी जाण्यासाठी मुंबईवरून एक रेल्वे गाडी उपलब्ध करून देण्यात आली होती. तशीच ‘दिल्ली’ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीही रेल्वे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, याविषयी साहित्य रसिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतामधील एक ओळ ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा…’ ही अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या पत्रिकेवर दिमाखाने मिरवत आहे, याचा आनंद प्रत्येक मराठी माणसाला होणे स्वाभाविकच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -