Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखयूट्यूबर रणवीरला ‘सुप्रीम’ची चपराक

यूट्यूबर रणवीरला ‘सुप्रीम’ची चपराक

यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचा देशातील लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येकालाच घटनात्मक अधिकार मिळालेला आहे. व्यक्त होण्याचा अधिकार हा अभिव्यक्तीचा एक प्रकार असला तरी त्या व्यक्त होण्याला एक मर्यादा असतात. व्यक्त होत असताना स्वत:ची भूमिका मांडण्याला प्राधान्य देताना इतरांच्या भावना दुखावल्या जातील, समाजजीवनामध्ये जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा घटना घडणारच नाहीत, याची स्वत:हून प्रत्येकानेच खबरदारी घेणे आवश्यक आहे. हल्ली झटपट लोकप्रियता मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना वादग्रस्त वक्तव्य करणे आणि प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहिल्यावर दिलगिरी व्यक्त करणे, माफी मागणे असे प्रकार अलीकडच्या काळात सर्रासपणे घडू लागले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘टकलू हैवान’ ही भूमिका साकारल्याने त्याच नावाने ओळखले जाणारे राहुल सोलापूरकर यांनी देखील अलीकडच्या काळात एकदा नव्हे तर दोनदा वादग्रस्त वक्तव्ये केली होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना महाराष्ट्रीय जनतेची नाराजी ओढावून घेतली होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आग्र्याहून पलायन केले होते, असा जावई शोध लावत राहुल सोलापूरकरांनी कोल्हेकुई केली होती. अर्थांत या गोष्टींनी शिवछत्रपतींच्या इतिहासाला काहीही फरक पडत नाही; परंतु महाराजांच्या सुटकेला लाच देण्याचा संबंध लावल्याने राहुल सोलापूरकरांबाबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत संताप व्यक्त केला गेला. सोलापूरकरांचे पुतळे देखील ठिकठिकाणी जाळण्यात आले. प्रकरण अंगलट येत असल्याचे व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून राहुल सोलापूरकरांनी दिलगिरी व्यक्त करत महाराष्ट्रीय जनतेची माफी मागितली होती. सोलापूरकर प्रकरणांवर पडदा पडतो नाही तोच यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया प्रकरणामुळे समाज जीवनात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. मुळात सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये करण्याच्या प्रकाराला आता कोठेतरी आळा हा बसलाच पाहिजे. उचलली जीभ, लावली टाळ्याला हे उद्योग आता खरोखरीच बंद झाले पाहिजेत. दिलगिरी व्यक्त करून प्रकरण मिटत असले तरी त्या वक्तव्यामुळे दुखावल्या गेलेल्या भावनांची, समाजजीवनात निर्माण झालेल्या कलहाची भरपाई होत नाही.

यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाने व्यवस्थित भाषेत सुनावल्यामुळे आता अशा घटनांना निश्चितच पायबंद लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आई-वडिलांवर अश्लील टिप्पणी केल्या प्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये रणवीर विरोधात त्याच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मुळातच या प्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आई-वडिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. आई आपल्या गर्भाशयात नऊ महिने, नऊ दिवस बाळाला वाढविताना दररोज यातना सहन करत असते. बाळाला गर्भाशयात घेऊन दररोजची कामे करताना बाळाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची ती क्षणाक्षणाला काळजी घेत असते. वडील मात्र जन्माला येणाऱ्या बाळाच्या खर्चाची व त्याच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी जन्माला येण्या अगोदरपासून सोय करत असतात. बाळासाठी आपले आई-वडीलच आपले दैवत असतात. अशा देवतुल्य मातापित्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची हिंमत यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया दाखवितोच कशी? ही वक्तव्ये खासगीत नाहीतर सार्वजनिक कार्यक्रमात व्यक्त करत असल्याने खऱ्या अर्थांने यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाची जीभ छाटण्याचेच आदेश न्यायालयाने दिले पाहिजेत; परंतु आपल्या घटनेत तशी तरतूद नसल्याने अशा वाचाळवीरांचे आजतागायत फावले आहे. या वक्तव्याबाबत देशाच्या विविध भागांत संतापाची लाट उसळल्याने यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीरूपी एफआयआर रद्द करण्यासाठी रणवीरने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. पण उच्च न्यायालयात दिलासा न मिळता त्याच्या पदरी निराशा आली आहे.

न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली असता न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी रणवीरला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी थेट ‘ही अश्लीलता नाही तर काय आहे?’ असा सवाल केला आहे. रणवीर अलाहबादिया विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी केवळ रणवीरच्या शोवर बंदी घातली नसून त्याचा पासपोर्टही जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय रणवीरला देशाबाहेर जाण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. समाजाला गृहीत धरत आहात. आम्हाला या जगातील एक व्यक्ती सांगा ज्याला हे आवडले आहे. तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या धमक्यांचा प्रश्न जिथे येतो तिथे कायदा काम करेल.राज्य सरकार धमकी देणाऱ्यांवर कारवाई करेल. आपल्याकडे कायद्याचे पालन करणारी न्यायव्यवस्था आहे. रणवीरला चौकशीसाठी बोलावण्यात येईल. त्यासाठी त्याला हजर राहावे लागेल, अशा प्रकारचे ताशेरे ओढताना न्यायालयाने यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला समज देताना चांगलीच खरडपट्टी काढली आहे. रणवीरला मिळालेल्या धमक्यांची दखल घेताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की, ज्या धमक्या देण्यात आल्या आहेत, त्यामधील भाषा ही तुमच्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. किमान कोणालाही वाचल्यावर लाज वाटणार नाही. एकंदरीत रणवीरला सुप्रीम कोर्टानेही दयामाया न दाखविल्याने हे प्रकरण त्याच्यावर चांगलेच शेकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही सुरुवात कोठेतरी होणे आवश्यक होते. त्याशिवाय अशा वाचाळवीरांना पायबंद बसणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -