सद्गुरू वामनराव पै
आम्ही काय सांगतो तुम्ही आनंद वाटा आणि आनंद लुटा. आनंद वाटायला शिका व आनंद लुटायला शिका असे आम्ही सांगतो तेव्हा लोकांना काय वाटते, अहो आमच्याकडे आनंदच नाही, तर आम्ही वाटणार काय आणि लुटणार काय असा लोकांना प्रश्न पडतो. जीवनविद्या काय सांगते तुमच्याकडे आनंदाचा सागर आहे. आनंदाचा समुद्र आहे व तो कधीही न आटणारा आहे. समुद्र कधी आटला आहे का? सागर कधी आटला आहे का? तो कधीही आटत नाही आणि तो कधीही विटत नाही. हा आनंद आपल्याकडे आहेच. तो तुम्ही ज्यावेळेला द्यायला लागता ना तेव्हा तो आतून सारखा बाहेर यायला लागतो. यासाठी जीवनविद्या सांगते तुम्ही आनंद दुसऱ्यांना द्यायला शिका. तीर्थयात्रा, उपास हे सर्व आपण कशासाठी करतो. तीर्थयात्रा आपण आनंदासाठी करतो पण होतो त्रास. आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून लोक हे करतात. उपवास लोक देवासाठी करत नाहीत. उपवास हा तपश्चर्येचा प्रकार आहे व लोक तपश्चर्या कशासाठी करतात? देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी करतात. तीर्थयात्रेला लोक जातात ते देवाजवळ काहीतरी मागतात.
उपास करणारे लोक देवाजवळ काहीतरी मागत असतात. हा गणपती नवसाला पावतो, तो गणपती नवसाला पावतो असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा नवसाला पावणारा गणपती लोकांना पाहिजे व त्या ठिकाणी लोकांची गर्दी होते. नवसाला पावणारा गणपती व इतर गणपती यात काही फरक आहे का? फरक काहीच नाही पण लोकांचे अज्ञान किती आहे हे यावरून आपल्याला दिसून येते. सांगायचा मुद्दा असा की, लोक नवस करतात आणि देवाजवळ काहीतरी मागतात. उपास करतात आणि देवाजवळ काहीतरी मागतात. तीर्थयात्रा करतात आणि देवाजवळ काहीतरी मागतात. हे मागतात कशासाठी? आनंद मिळावा म्हणून मागतात, सुखी होण्यासाठी ते हे मागत असतात. जीवनविद्या असे सांगते आनंद तुमच्याजवळ आहे तो वाटायला शिका मग तुम्ही तो लुटायला शिकाल. लुटण्यासाठी काहीच करायला नको. ते तुम्हाला आपोआप येईल. वाटायला शिकलात की लुटणे आलेच. आपोआप ते आलेच. तुम्ही म्हणाल वाटण्यासाठी आमच्याकडे आनंद आहेच कुठे? ते मी मघाशीच सांगितले. आपल्याकडे आनंदाचा सागर आहे. आपण आनंद समुद्र आहोत.
जे जे पाहिसी ते ते सुखात्मक असे येईल लक्षी
तू आनंद समुद्र विश्व लहरी जाणूनी गोठी मुला
सांगायचा मुद्दा असा आपल्याकडे आनंदाचा सागर आहे. हा सागर कधी आटत नाही व कधीही विटत नाही, कधीही संपत नाही असा आहे. आनंद म्हणजे स्वानंद तुम्ही दुसऱ्यांना द्या. मघाशी मी स्वानंद आणि आनंद ह्यातला फरक सांगितला. आपल्याकडे असतो तो स्वानंद व आपण दुसऱ्यांना तो देतो तेव्हा होतो तो आनंद. हा आनंद दुसऱ्यांना मिळतो तेव्हा त्याला होते ते सुख व हे सुख जेव्हा बुमरँग होऊन आपल्याकडे परत येते तेव्हा आपल्याला होते ते समाधान. ही सर्व आनंदाची रूपे आहेत.