महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना दिले निर्देश
मुंबई (प्रतिनिधी): दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांची तसेच स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच स्मशानभूमी परिसरामध्ये हिरवळ लागवडीसह उत्तम नागरी सेवा – सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये मंगळवारी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भेट देऊन नागरी सेवा-सुविधांची पाहणी केली. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्मशानभूमीत असलेली दफनभूमी, दहनवाहिनी, केश कर्तनालय, प्रार्थनागृह तसेच येथील विविध इमारतींची गगराणी यांनी भेटीदरम्यान पाहणी केली. स्मशानभूमीची कार्यप्रणाली, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा तसेच नागरिकांच्या काही सूचना किंवा तक्रारी आहेत का इत्यादी माहिती अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली.
स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच, उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतील का, याबाबतही विचार करून कार्यवाही करावी. अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता सध्या येथे उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांच्या संख्येत वाढ करावी. ही प्रार्थनागृहे नाविन्यपूर्ण आणि कल्पकतेने बांधवीत. सध्या स्मशानभूमीमध्ये पारंपरिक पद्धतीने तसेच विद्युत दहनवाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी लाकूड इंधन म्हणून वापरण्याऐवजी अन्य काही स्रोतांचा वापर करता येईल का, याचाही अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश गगराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.