Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यअस्तित्वाच्या शोधात उबाठा सेना... !

अस्तित्वाच्या शोधात उबाठा सेना… !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हृदयात जपणाऱ्या हजारो शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचा निर्णय बिलकुल रुचला नव्हता; परंतु आदेश मानून काम करण्याच्या पद्धतीवर काम करणारी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली. खरंतर इथेच शिवसेनेला उतरती कळा लागली. एकिकडे शिवसैनिक प्रचंड नाराज होता. ज्यांच्याशी आयुष्यभर विरोध घेतला. विरोध करत शिवसेना वाढवली त्यांच्यासोबतच एकत्र येणे शिवसेनेतील अनेकांना रुचले नाही.

माझे कोकण:संतोष वायंगणकर

महाराष्ट्राचे राजकारण कसे आणि कोणत्या दिशेने सुरू आहे ते उभा महाराष्ट्र पाहतच आहे. २०१९ पासून मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीची शिवसेना- भाजपा युती सत्तेत आणि विरोधी पक्षातही होती; परंतु २०१९ ची निवडणुक भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्रितरीत्या लढवूनही सरकार स्थापनेच्या वेळी शब्द दिला आणि शब्द फिरवला याचे राजकारण होऊन शिवसेना-भाजपा युती संपुष्टात येत शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षांसोबत घरोबा करत सत्ता प्राप्त केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारलेली शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना कायम फटकारले, दूर ठेवले त्यांनाच सोबत घेत केवळ सत्तेसाठी महाविकास आघाडी म्हणून घरोबा केला. खा. संजय राऊत, खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई, खा. अरविंद सावंत, आ. अनिल परब यांसारख्या दरबारी नेत्यांनी शिवसेनेच काय होणार यापेक्षा स्वत:च भलं कसं होईल एवढाच सीमित विचार केला. यामुळे शिवसैनिकांशी नाळ तुटलेल्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील शिवसैनिकांना काय वाटतं, शिवसैनिक काय म्हणतोय हे कधी जाणून घ्यावसं वाटलं नाही. आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबतच्या चौकटीत मश्गुल राहिले. शिवसैनिकांना मातोश्रीचे दरवाजे केव्हाचेच बंद झाले होते.

शिवसैनिकांना फारच दूरची गोष्ट आमदारांनाही उद्धव ठाकरे भेटत नव्हते. ती नाराजी वाढतच गेली. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही उद्धव ठाकरे सेनेचे आमदार, शिवसैनिक यांच्यामध्ये कमालीचा दुरावा निर्माण होत गेला. याउलट ठाण्यातून शिवसेना नेते स्व. आनंद दिघे यांच्या तालमित तयार झालेल्या एकनाथ शिंदे मात्र रिक्षाचालक, शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री या साऱ्या प्रवासात एकनाथ शिंदेमधला सर्वसामान्य शिवसैनिक त्यांनी कायम जिवंत ठेवला. यामुळेच या मधल्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आमदार, खासदार, राज्यभरातील शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे जात राहिला. सर्वांना मदत करणे, त्यांची काम करणे हे सगळं नेहमीच एकनाथ शिंदे करत राहिले. साहजिकच पदाधिकारी, शिवसैनिकांना एकनाथ शिंदे अधिक जवळचे वाटू लागले. निवडणुक काळातही त्यांनी अनेक आमदारांना मदत केल्याचे किस्से ऐकायला मिळतात. उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कसे भेटत नाहीत. आमदारांना कसे परतावे लागते याची चर्चा शिवसैनिकांमध्येच मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यातूनच नाराजीचे प्रमाण वाढत गेले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना म्हणून त्यांनी स्वत:च कर्तृत्व सिद्ध केले. उलट उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचा वारसदार म्हणून चुकीचे निर्णय घेऊन शिवसेनेला चुकीच्या मार्गावर नेऊन ठेवले. साहजिकच याचा दूरगामी परिणाम खोके, खोके म्हणून हिणवत राहतात. संघटना बांधणी झालीच नाही. आजही तेच घडत आहे. त्यातच अवती-भोवतीच्या दरबारी भाटांनी नेहमीप्रमाणे आपणच कसे योग्य आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून नुकसानच झाले. उद्धव ठाकरेंची शिवसेना उभारी घेऊ शकली नाही. शिवसेनेचा मराठी आणि हिंदुत्व हा राजकीय विचारांचा बेस होता; परंतु दुर्दैवाने आठवणीपुरता मराठी बाणा आणि हिंदुत्व केव्हाचेच गळून पडले. या अशा कार्यपद्धतीने महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि हिंदू विचारधारेवर चालणारा हिंदू उद्धव ठाकरेंपासून केव्हाचाच दुरावला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालाचे बारकाईने विश्लेषण केल्यावरही शिवसेनेचे आमदार, खासदार कशामुळे निवडून आले त्या प्रश्नाचे उत्तरही आपोआपच सापडू शकेल.विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेतील पडझड कुणालाही रोखता आलेली नाही. आजही विश्वासानेच शिवसैनिक माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच राज्यभरात जी उद्धव ठाकरे सेनेची वाताहत चालली आहे तीच स्थिती कोकणात होत आहे. कोकणात दररोज कोणी – ना कोणी उद्वव ठाकरेंना सोडून भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे सेना कधीचीच खिळखिळीत झालेली आहे. आता उद्धव ठाकरेंची सेना अस्तित्वाचाच शोध घेतेय. जे शिवसेनेचे नेते म्हणवून घेत थांबले आहेत त्यातले अनेकजण इकडे-तिकडे केव्हाही जातील यामुळे खा. संजय राऊत आणि माजी खा. विनायक राऊत यांनी यांच्या भूमिका तरी नेमक्या काय आहेत या बद्दलही राजकीय गोटात संशय व्यक्त केल्या जाणाऱ्या आहेत.

खा. विनायक राऊत यांनी स्वत:च त्यांच्या निकटवर्तीयांना सेना-भाजपामध्ये पाठवल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात आहेत. यातल सत्य काय हे त्यांचं तेच सांगू शकतील. मात्र, कोकणाच्या राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अस्तित्व शोधताना दिसते. आम्हीच योग्य, बरोबर आहोत असे म्हणणाऱ्यांची ही वाताहत आहे. आजच्या राजकारणात कोणीही कोणासाठी थांबत नाही आणि थांबणारही नाहीत. मग ते आ. भास्कर जाधव कितीही शिवकालीन इतिहासाचे दाखले देत असले तरीही ते भाजपात किंवा सेनेत गेले तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको. याचं कारण उद्धव ठाकरे सेनेत शिवसैनिकांना विश्वास वाटावा अशी स्थिती नाही. यातच आदित्य ठाकरे यांनी खासदारांनी डिनरला जाताना परवानगी घेऊन जावे असे म्हटल्याने खासदारांमध्येही प्रचंड असंतोष आणि नाराजी पसरली आहे. उद्धव ठाकरे सेनेत नाराजी उघडपणे दिसू लागली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात काय होतं तेवढंच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -