Thursday, March 27, 2025

संतोषाचा गाभारा

अरविन्द दोडे

जो संतोषाचा गाभारा |
आत्मबोधाचिया वोगरा |
पुरे न म्हणेचि धनुर्धरा |
आरोगिता ॥४.१०७॥

कोबाराया म्हणतात, ‌‘देवासाठी ब्रह्मांड सोयरे!’ साधुसंत अशी कोवळी उत्तरं देतात की माणूस अंतर्मुख होतो. नि:शब्द होतो. ओवी-अभंगाचा स्वाद घेताना जन आणि विजन दोन्ही सारखेच वाटू लागतात. भय, लज्जा अन्‌‍ शंका त्यजून कोण देव, कोण गुरू हा प्रश्नच निकालात निघतो. मीपणावर पाषाण पडल्यावर समतेचा प्रत्यय येतो. भक्तीचा मळा फुलतो. पिकल्या शेताचा वाटा कोण देतो? याचा शोध घेतला की जाणवतं गुरुशिवाय आहेच कोण आपल्याला? आपली तहानभूक निश्चल होते. कळिकाळाचा फास सुटतो. प्रपंचाची होळी न करता, अविवेकाची काजळी दूर करतो अन्‌‍ आत्मसुखाची दिवाळी साजरी करतो! देहभाव ओस पडतो. स्वप्नात हरवलेल्या ऐवजासाठी आकांत करण्याची सवय जाते. अंतरीचा साक्षीदार भेटतो. अणूचा गाभा कळतो अन्‌‍ विश्वाची आभा पाहून भक्त गुरूपुढे नमतो. रसाळपणाचा हा लोभ अवर्णनीय असतो.
गुरूभक्तीत आणि योगाच्या अग्नीत भक्ताची मलीन देहतत्त्वं शुद्ध होतात. मृण्मयाची चिण्मय होतात. स्थूल द्रव्येही सूक्ष्म होतात. विषयविकार शुद्ध होऊन चित्तवृत्ती उन्नत, उदात्त होतात. खऱ्या अर्थानं गुरूची ओळख पटते. आपलं व्यक्तित्व उजळतं. व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं. इतरांना आपलं वागणं, बोलणं आवडू लागतं. आपला सहवास हवाहवासा वाटतो. या यशाला नाव नसतं. ‌‘ही सारी त्याची कृपा!’ एवढंच मान्य करतो अन्‌‍ हात जोडतो. हा कृतज्ञतेचा ओलावा! संसाराच्या महावृक्षावर आरूढ होऊन, नरक सागरात पतन पावलेल्या सर्वांचा जो उद्धार करतो त्याला त्रिवार नमस्कार! परिवर्तन हा जगाचा स्थायिभाव.

पंचमहाभूतांचा संसारवृक्ष म्हणजे जणू अश्वत्थवृक्ष म्हणजे पिंपळ. वर्तमानात जगावं. भूतकाळात रमू नये. भविष्यात गुंतू नये. दोन्ही अनिश्चित. आयुष्याचा अर्थ कळला की, परमार्थात मन रमून जातं. जो स्वार्थ सोडतो, त्याला गुरूनमनाचं मर्म कळतं. ‌‘उद्या… उद्या…’ करत भविष्यकाळाच्या मखमली शय्येवर जगण्यात काय अर्थ? वर्तमानाशी मैत्री करावी. संयमशील दिनक्रमात गुरुभक्ती असावी. पेरणीच्या वेळी पेरणी नाही केली, तर पीक हाती लागणार कसं? गुरू शेतकरी असतो. शिष्याच्या मनाची मशागत करतो. पुष्कळ जमिनी नापीक असतात, तरीही तो पेरणी करतो. चमत्कार घडतो. पीक येतं. भक्तीच्या मळ्यात जीव रमतो. गुरुरूपानं देव खाली उतरतो. सामान्यांमध्ये मिसळतो. जीवा-शिवाचं अतूट नातं पटवून देतो. ज्यांना पटत नाही, ते जत्रेत हरवतात. आईपासून दूर जातात. आई सोडत नाही. आपल्या लाडक्या लेकराला शोधून काढतेच! प्राप्तीच्या पैलतीरावर पोहोचलेला गुरू उत्तम नावाडी असतो. ऐलतीरावर येतो. सद्शिष्यांना पैलपार नेतो. हे कठीण उद्धारकार्य करून तो सार्थकी लावतो आपलं जीवन आणि इतरांनाही सार्थकता शिकवतो. गुरुपरंपरा अखंडपणे सुरू ठेवतो. आपल्या अंतरीच्या गुरुमंदिराचा गाभारा संतोषानं भरून टाकतो. समाधान मिळालं की शांती धावतच येते!
गुरूंचे महागुरू कोण? प्राचीन ग्रंथात ही माहिती मिळते. प्रथम गुरू म्हणून महादेवांचा उल्लेख आहे. त्यांचे गुरू ब्रह्मा. ब्रह्मांचे गुरू कोण? ते स्वयंभू आहेत. शंकराचे शिष्य सप्तर्षी. दुसरे महागुरू दत्तात्रेय. त्यांचा पहिला शिष्य कार्तिकेय, अर्थात शिवपुत्र स्कंद.

भक्त प्रल्हाद हा दुसरा शिष्य. देवतांचा गुरू बृहस्पती. असुरांचा गुरू शुक्राचार्य. त्याआधी भृगूऋषी होते. परशुरामाचे गुरू शिव आणि दत्त. रामाचे गुरू वसिष्ठ आणि विश्वामित्र. कृष्णाचे गुरू गुर्गमुनी, सांदीपनी अन्‌ वेदव्यास. द्रोणाचार्य गुरू होते कौरव, पांडव अन्‌‍ एकलव्याचे. बुद्धाचे गुरू अलारकलाम, उद्दाका रामापुत्त वगैरे. चाणक्याचे गुरू त्याचे पिता चणक. चाणक्याचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य. रामकृष्ण-विवेकानंद आदी आपणास ठाऊक आहेतच. जाता जाता, चाणक्य काय म्हणतो पाहा – आयुष्यात यशस्वी होण्यास गुरू हवाच. खरा गुरू शिष्याला देवदर्शन घडवतो. गुरू किती अनुभवी आहे, हे शिष्यानं समजून घ्यावं. गुरू कसा असावा? अनुशासनप्रिय! संवेदनशील असावा. त्याला शिष्यांची सुखदु:खं कळायला हवीत. संकटं, अडीअडचणी दूर करता यायला हव्यात. जीवन सावरून सन्मार्ग दाखवायला हवा. शिष्य वाया जाऊ नये म्हणून दक्ष असावा. धर्म, नीती, न्याय आदी विषय शिकवून शहाणं करणारा हवा… वगैरे. यत्न करतो तो यती. मनन करतो तो मुनी, ध्यान करतो तो ध्यानी. नाम घेतो तो नामी. जप करतो तो जपी. तप करतो तो तपी. या साऱ्या अवस्था गुरुभक्ती करताना भक्ताला अनुभवता येतात. भक्तीच्या पायऱ्या पाहून मन प्रसन्न होतं.

श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, चरणसेवन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन. नवविध भक्तांचे आदर्श अनुक्रमे असे आहेत – परिक्षित, शुकदेव, प्रल्हाद, लक्ष्मी, पृथुराजा, अक्रूर, हनुमान, अर्जुन, बळिराजा. म्हणजे असं की, ईश्वरलीला, कथा, महत्त्व, शक्ती, उगम हे ‌‘श्रवण’ करणं. ईश्वरगुण, चरित्र, नाम, पराक्रम आदींचा आनंद. उत्साहानं ‌‘कीर्तन’ करणं, निरंतर भक्तिभावानं ‌‘स्मरण’ करणं. माहात्म्य आणि शक्तिस्मरण करणं. ईश्वरचरणांच्या आश्रयानं, श्रद्धेनं जगणं, त्यांनाच सर्वस्व मानणं म्हणजे पाद्यपूजा. मन, वाचा, कर्मांद्वारे पवित्र सामग्रीनं ईश्वरपूजा, चरणपूजा करणं म्हणजे अर्चना. मूर्ती किंवा प्रतिमा यांना वंदन करताना वडीलधाऱ्यांचा मान राखणं म्हणजे वंदना. भगवंताला किंवा सद्गुरूला स्वामी आणि स्वत:ला सेवक समजून नम्रतेनं आराधना, प्रार्थना करणं हे दास्य. ईश्वराला अथवा गुरूला आपला सखा समजून (मर्यादेनं वागून) सर्वस्व अर्पण करणं हे सख्यत्व आणि नववी पायरी आहे मनातलं सगळं सांगून टाकणे. संपूर्ण शरणागती पत्करणं म्हणजे आत्मनिवेदन. अधिक संदर्भासाठी श्रीदासबोधाचा दशक ४/ समास १ ते ९ पाहा. गुरूप्राप्तीच्या या नऊ मार्गांपैकी एक मार्ग निवडला तरी पुरेसा आहे. सर्वप्रथम ‌‘ऐकून घेण्याची’ सवय लावून घेणं म्हणजे श्रवणभक्ती! गुरू हा दयेचा सागरच असतो. माणूस कितीही दुर्गुणी असो, अज्ञानी किंवा अडाणी असो, त्याला जर सन्मार्ग हवा असेल, तर त्यानं गुरुमाऊलींच्या सावलीत न घाबरता जायला हवंय. जय गुरुदेव!

([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -