Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रशिर्डीतील ७२ भिक्षेकरांची सुधारगृहात रवानगी

शिर्डीतील ७२ भिक्षेकरांची सुधारगृहात रवानगी

गुन्हेगारीमुक्त शिर्डीसाठी पोलीस ॲक्शन मोडवर

शिर्डी : गुन्हेगारी मुक्त शिर्डी करिता प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शिर्डी पोलीस, नगरपरिषद व साईबाबा संस्थान यांनी संयुक्तपणे भिक्षेकर्‍या विरुद्ध धरपकड मोहीम राबवून महिला व पुरुष मिळून ७२ भिक्षेकर्‍यांना ताब्यात घेतले यामध्ये ६० पुरुष तर १२ महिला भिक्षेकर्‍यांचा समावेश आहे या सर्वांना पोलीस स्टेशन येथे आणून नाश्ता जेवण दिले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून न्यायालयाचे आदेशान्वये पुरुष भिक्षेकर्‍यांची विसापूर तर महिला भिक्षेकर्‍यांची रवानगी चेंबूर येथील बेगर होम मध्ये रवानगी केली जाणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

शिर्डीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांनी शिर्डी शहर गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त करण्याचा चंग बांधला आहे.ग्रामस्थांनी सुद्धा ग्रामसभा घेऊन गुन्हेगारी विरोधात व्यसनाधीन भिकारी व मोफत प्रसाद भोजन आणि अवैध धंद्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. शिर्डी पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी गुन्हेगार तसेच अवैध धंदे व बेकायदेशीर बाबींच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

गुरुवार रोजी सकाळी सकाळी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी खाकी वर्दी ऐवजी साध्या वेशात साईबाबा संस्थांनचे सुरक्षा कर्मचारी नगरपरिषदेचे कर्मचारी यांचा ताफा सोबत घेऊन शिर्डी शहरातील चावडी परिसर, द्वारकामाई, परिसर सोळा गुंठे, साई कॉम्प्लेक्स, दोनशे रूम, बसस्थानक परिसर तसेच इतर भागातून व्यसनाधीन झालेले तसेच चित्रविचित्र कपडे घालून साई भक्तांच्या मागे फिरत पैसे आणि खाण्याच्या वस्तूंची मागणी करणाऱ्या महिला पुरुष मिळून तब्बल ७२ भिक्षेकर्‍यांना ताब्यात घेतले आहे. भल्या पहाटे शिर्डी शहरात फिरून भिक्षेकर्‍यांचे थांबे शोधून त्या ठिकाणाहून या भिक्षेकर्‍यांना ताब्यात घेत विविध रिक्षांमधून गोळा करत बसद्वारे शिर्डी पोलिस स्टेशनला नेण्यात आले. तेथे या सर्वांना जेवण देऊन त्यांची आरोग्य तपासणी करत कोर्टाच्या परवानगीने पुरुषांची विसापूर येथे तर महिला भिकाऱ्यांची चेंबूर येथे सुधार गृहात रवानगी केली जाणार आहे.

पुरुष भिक्षेकऱ्यामध्ये परराज्यामधील परंतु शिर्डीत भिक्षा मागणाऱ्यांपैकी कर्नाटक राज्यातील ३, मध्यप्रदेश २,आंध्रप्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल राज्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे भिक्षेकरी आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण १४ भिक्षेकरी असून त्यापैकी ७ भिक्षेकरी राहाता तालुक्यातील आहेत. शिर्डी शहरातील ५ रुई व निमगाव कोऱ्हाळे गावातील प्रत्येकी एक जण आहे. मुंबई ४, छत्रपती संभाजीनगर ९, नाशिक ८, पुणे ३, वाशिम २, जळगाव ३, अकोला २ तर बुलढाणा नांदेड जालना बीड सांगली सोलापूर यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे मिळून एकूण ६० पुरुष भिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे महिला भिक्षेकर्‍यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून ८ त्यापैकी राहाता तालुक्यातील ६ भिक्षेकरी महिला आहेत. भंडारा जिल्हा १, नाशिक जिल्ह्यातून २ व कर्नाटक राज्यातील १ असे मिळून एकूण १२ महिला सर्व मिळून एकूण ७२ भिक्षेकरी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

या भिक्षेकरी लोकांमध्ये शिर्डीतील लोकांनी त्यांच्या वागणुकी नुसार मिश्किल नावे ठेवलेली काही अवलिया भिक्षेकरी सुद्धा आढळून आले त्यात दारू पिऊन गाणे गात फिरणारी “राणू मंडल”..तर कर्णकर्कश शिट्ट्या वाजवत अचानक जमिनीवर लोटांगण घेत कोलांटी उडी मारणारा “गुल्ल्या” .. दिवसा दारू पिऊन भाईगिरी करत कुठेही झोपून जाणारी “चोपडी”..यांसह बिगारी काम करणारे सुद्धा काहींना आपली व्यथा मांडताना दिसून आले त्यात काही भल्या सकाळी फुल्ल झिंगून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते.अचानक झालेल्या कारवाईने अनेकजण मानसिक धक्क्यात असताना चेहरे उतरून बसलेले असताना मात्र एक भिक्षेकरी इतक्या टेन्शनच्या प्रसंगी निवांत पेपर वाचत बसल्याचे दिसूनआले तर काहींचे नातेवाईक पोलिस स्टेशन जवळ आपल्या नातेवाईकांना पकडल्याचे कळताच सोडविण्यासाठी कागदपत्र घेऊन हजर असल्याचे बोलले जात होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -