सौंदर्य तुझं : प्राची शिरकर
चीन काळात महाराष्ट्रातील स्त्रिया साधे पण आकर्षक दागिने घालत होत्या. या दागिन्यांमध्ये मुख्यतः सोन्याचा वापर केला जात होता. मोती, रत्न आणि विविध धातूंचा उपयोग करून दागिने बनवले जात. मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळात महाराष्ट्रातील दागिन्यांमध्ये विशेष बदल झाले. या काळात सोन्याचे आकर्षक दागिने अधिक लोकप्रिय झाले. महाराष्ट्रातील अनेक राजघराण्यांत आजही ऐतिहासिक दागिने जपून ठेवलेले आहेत. हे दागिने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात, ते विकले जात नाहीत. त्यामुळेच शिवकालीन, पेशवेकालीन, मुघलकालीन दागिन्यांचा ठेवा या वारसांकडे कायम आहे. खानदानी दागिना नव्या सुनेला भेट देण्याचा प्रघात महाराष्ट्रात आहे. असे शंभर वर्षांहून अधिक वर्षं जुने खानदानी दागिने आजही आपली चमक टिकवून आहेत. हेच दागिने नव्या स्वरूपात आता महिलांना भुरळ पाडतात. आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने प्राचीन काळात सर्व कर्तबगार महिलांचे अलंकार कसे होते, त्या अलंकाराना कोणत्या नावाने ओळखलं जायचं… जाणून घेऊया या लेखातून काही खास दागिन्यांची ओळख.
जोंधळे मणी गुंड – जोंधळ्याच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते. जोंधळी पोत हा महाराष्ट्रात वापरला जाणारा एक पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यात घालण्याचा दागिना आहे. जोंधळ्याचे छोटे छोटे मणी एकत्र करून ही पोत बनवली जाते. छोट्या छोट्या मण्यांपासून बनवलेली ही पोत खूप नाजूक आणि सुरेख दिसते. तीन पदरीपासून ते दहा पदरीपर्यंत जोंधळी पोत बनवली जाते.
नथ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘राजकोश’ ह्या ग्रंथात नथीला ‘नासमणी’ असे म्हटले आहे. कारण तो नाकात घालावयाचा अलंकार आहे. हा महाराष्ट्रीय स्त्रियांचा अतिशय आवडता दागिना आहे. पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला हा प्रकार आहे. महाराष्ट्रीय स्त्री ही नथीशिवय पूर्ण होऊ शकत नाही.
डोरलं – मंगळसूत्र इतर कोणत्याही अलंकारापेक्षा अधिक महत्त्वाचा अलंकार म्हणजे मंगळसूत्र. हा महाराष्ट्र या प्रदेशातील सुवासिनींचा प्रमुख सौभ्याग्यलंकार. सौभाग्याचे प्रतीक असल्याने मंगळसूत्र अाहे व लेणं म्हणून ओळखले जाते.
शिंदेशाही तोडे – तोडे म्हणजे चांदीच्या कड्या एकात एक बसवून केलेला दागिना. मराठी अलंकारामधील ‘राजबिंडा’ अलंकार म्हणजे शिंदेशाही तोडा. नावाप्रमाणेच हा अलंकार ‘शाही’ आहे. दागिने घडविणे हे मुळातच अतिशय कौशल्याचे काम आहे. शिंदेशाही तोडे पाहिल्यावर तर ह्याची खात्री पटते.
कर्णकुंडल – हे कानात घालण्याचे एक वर्तुळाकार आभूषण आहे. पत्राकार, शंखाकार, सर्पाकार असे आकारानुसार त्याचे विविध प्रकार आहेत.
चितांग – गोलाकार पट्टी आणि पुढे जोडण्यासाठी फासा असं ‘चित्तांग’च स्वरूप असतं.
ठुशी – हा दागिना गळ्यालगत घातला जातो. यात बारीक मणी ठासून भरेलेले असतात म्हणून याला ठुशी म्हणतात. ठुशीचे काही प्रकार आहेत जसे साधी ठुशी, मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी, गोलमणी किंवा पेडंट असलेली ठुशी.
पुतळी हार – प्राचीन दागिन्यांमध्ये सोन्याची नाणी गुंफून केलेला ‘निष्क’ हा दागिना प्रसिद्ध होता. त्याचा १६ व्या १७ व्या शतकातील महाराष्ट्रीय अवतार म्हणजे पुतळी हार म्हणता येईल. ही सोन्याच्या नाण्यांच्या रंगाने तयार केली जाते. यासाठी खास पुतळी ताटे बनविली जातात व त्या ताटांची माळ केली जाते. या पुतळीवर दोन्ही बाजूनी प्रतिमा कोरलेल्या असतात. अत्यंत पारंपरिक असा हाराचा प्रकार म्हणजे पुतळी हार. छत्रपती शिवरायांचे कुलदैवत तुळजापूरची श्री तुळजाभवानी. या महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला राज्याभिषेकाच्या मंगल प्रसंगी त्यांनी जे दागिने भेट दिले त्यात १०१ पुतळ्यांची माळ आहे, जिच्यावर एका बाजूस जगदंब प्रसन्न व दुसऱ्या बाजूस शिवछत्रपती असा नामनिर्देश केलेला आहे.
कुडी – कुडी हा कानातील एक साधा आणि सुंदर दागिना आहे, जो कानाच्या लोबमध्ये परिधान केला जातो. हा दागिना आपल्या साधेपणामुळे आणि विविध डिझाईन्समुळे स्त्रियांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
बुगडी – बुगडी हे मराठी दागिन्यांपैकी एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक प्रकार आहेत. या दागिन्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आकर्षक आणि रंगीबेरंगी डिझाइन, जी प्रत्येक परिधानाला एक विशेष सौंदर्य देते. बुगडी विशेषत: महाराष्ट्राच्या पारंपरिक पोशाखांमध्ये वापरली जाते आणि ती विविध प्रकारे सजवलेली असू शकते.
पैंजण – पैंजण एकपदरी तर तोरड्या जाडजुड आणि एकापेक्षा अधिक पदरांच्या असतात. वाळे हे लहान मुलांच्या पायात घालण्याची देखील पद्धत आहे. याशिवाय चाळ, तोडर, नूपुर, जोडवी, मासोळी, विरोली, मंजीर, वाळा, वेढणी हे देखील पायातील दागिने आहेत.
कंबरपट्टा – अतिशय जुना असा दागिना कबंरपट्टा राजघराण्यातील राण्या घालत असायच्या. कंबरेवर पट्टा घातल्याने पोटाचा घेर प्रमाणात राहातो असे मानले जाते.