मुंबई : झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. असाच एक जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झी स्टुडिओज पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ‘आता थांबायचं नाय’ असे या चित्रपटाचे नाव असून झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक ‘झी गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लाँच करण्यात आला. एकंदरच पहिली झलक पाहाता आणि चित्रपटाच्या नावातही लेखणी दिसत असल्याने हा चित्रपट शिक्षणावर आधारित आहे, हे नक्की ! या टिझरमध्ये एक स्फूर्तीदायी गाणेही ऐकू येत असून या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे. तर गुलराज सिंग या गाण्याचे संगीतकार आहेत आणि मनोज यादव गीतकार आहेत.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणातात, ” हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून आयुष्यातील संघर्ष आणि पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. या प्रवासात आम्हाला झी स्टुडिओजची साथ लाभली. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते आणि यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. १ मे हा दिवस महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि आत्मविश्वासाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट याच भावनेला उजाळा देणार आहे.”
झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश कुमार बन्सल म्हणतात, ” आजवर झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘आता थांबायचं नाय’ हा देखील असाच चित्रपट आहे. ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजक अनुभव नाही तर तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.”
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर म्हणतात, ” झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि आकर्षक आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आता थांबायचं नाय’मध्ये प्रेरणा आणि मनोरंजनाचा सुंदर संगम आहे. या चित्रपटात हास्य, भावना आणि प्रोत्साहनाच्या घटकांचा समावेश आहे. ज्यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल. चित्रपटाची टीमही अत्यंत कमाल आहे. अनेक नामवंत कलाकार यात आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात नक्कीच यशस्वी होईल.”