Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकुटुंबव्यवस्था ढासळल्यामुळे समाजव्यवस्था विस्कळीत

कुटुंबव्यवस्था ढासळल्यामुळे समाजव्यवस्था विस्कळीत

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

प्रत्येक कुटुंब आणि समाज यांमध्ये ऋणानुबंध असणे आवश्यक आहे. समाज समृद्ध होण्यासाठी कुटुंब प्रगल्भ असणं, संस्कारी असणं, सक्षम असणं, विचारी असणं खूप आवश्यक आहे. कुटुंबातील लोकं, त्यांचे विचार आचार आणि त्यांची वर्तवणूक तसेच समाजाप्रती बांधिलकी जर असेल तर नक्कीच निरोगी समाज घडेल यात शंका नाही.

जेव्हा कोणतीही घटना आपल्या घराबाहेर जाते तेव्हा ती सामाजिक विषय बनते आणि समाज रचना बिघडते. म्हणूनच आपण म्हणतो घराबाहेर काही जायला नको त्यामुळे इज्जत जाते, बदनामी होते, लोकं आपल्याबद्दल चुकीचं बोलतात, आपला अप प्रचार होतो. हे जर टाळायचे असेल तर कुटुंबाला शिस्त असणं, संस्कार असणं खूप महत्त्वाचे आहे. नवरा-बायकोचं भांडण जर घराबाहेर गेलं की समाजाला, नातेवाइकांना माहिती होतं, तिथून ते कोर्टात गेलं की समाजात अजून एक घटस्फोटाची केस म्हणून त्याची नोंद होते. हेच पती- पत्नीचं भांडण वाद जर घरात मिटले तर ते समाजात पसरून समाजावर पण चुकीचे संस्कार होणार नाहीत. याच जोडप्याचं पाहून अनेक जोडपी ज्यांच्यात वाद सुरू आहेत त्यांना घटस्फोट घ्यायला प्रोत्साहन मिळेल आणि आपण म्हणू समाजात आजकाल लग्न टिकत नाहीत.

जेव्हा कोणत्याही एका घरातील एक मुलगा बिघडतो, वाईट मार्गाला जातो तेव्हा तो अनेक घरांना, अनेक कुटुंबाना फसवतो, उद्ध्वस्त करतो. जेव्हा तो एक मुलगा अनेकांना फसवतो तेव्हा त्या एका कुटुंबाच्या चुकीच्या वळणापाई, वाईट संस्कारामुळे अनेक लोकांना त्याचे चुकीचे परिणाम भोगावे लागतात, त्यांची फसवणूक होते आणि ही सामाजिक स्तरावर गुन्हेगारी ठरते. या गुन्हेगारी वृत्तीचा जन्म, या गुन्हेगाराचा जन्म एका घरात म्हणजेच कुटुंबात झालेला असतो. जर वेळीच त्याला त्याच्या घरातून योग्य मार्गदर्शन मिळाले असते, योग्य दिशा मिळाली असती तर त्याने समाजातील इतर निष्पाप लोकांना फसवले नसते.

समाजात फसवणूक पसरली आणि समाज दूषित झाला तो या फसवणुकीच्या वृत्तीमुळे. एका व्यक्तीने रस्त्यावर कचरा फेकला ते पाहून दुसऱ्याने फेकला आणि असे होत होत त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग तयार झाला. कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीने हा विचार केला नाही की, हे वागणे चुकीचे आहे पण त्यामुळे कचऱ्याची सामाजिक समस्या मात्र निर्माण झाली जी सगळ्यांसाठी त्रासदायक आहे. म्हणजेच ही समस्या तयार व्हायला प्रत्येक घरातील व्यक्तीने हातभार लावला आणि प्रत्येक घरातील व्यक्ती त्याच कचऱ्याचा त्रास पण सहन करणार आहे आपण प्रत्येक जण, आपलं घर आणि आपल्या घरातील प्रत्येक माणूस हा समाजाचा घटक आहे. समाज रचनेचा भाग आहे हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजात घडत असलेल्या कोणत्याही चांगल्या-वाईट घटनेला आपण सर्व वैयक्तिक जबाबदार आहोत आणि जर ते चुकीचं असेल तर आपण पुढाकार घेऊन त्याला आळा घालणं आपलं कर्तव्य आहे पण आजकाल लोकं आपल्या घरातच वाईट वृत्तींना प्रोत्साहन देत आहेत, तर ते समाजातील वाईट वृत्तींना काय थोपवणार?

जर शेजारच्या घरात किंवा दुकानात आग लागली तर आपण ताबडतोब अग्निशमन दलाला बोलावतो. ती आग आपल्या घराला लागलेली नसते पण आपल्याला माहिती असते ही आग वेळीच विझली नाही, तर आपल्यापर्यंत येऊन आपले नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची जबाबदारी घेतली तर कदाचित आपले घर पण वाचेल, शेजारचे घर पण वाचेल आणि पर्यायाने समाज वाचेल.

सातत्याने समाजाला नावं ठेवून आणि इतरांना दोष देवून आपण मोकळे होतो हे सपशेल चुकीचं आहे. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मीच एकट्याने बदलून, चांगले वागून काय जगाला फरक पडणार आहे का, सगळीकडे हेच सुरू आहे, आजकाल वातावरणच असं आहे, असंच चाललंय, सगळीकडे फसवणूक आहे, सगळेच भ्रष्टाचार करतात, व्याभिचार करतात, सगळेच लफडे करतात, आजकाल तत्त्व राहिलेत कुठे? आजकाल संसार टिकतात कुठे? असं बोलून स्वतःपण त्याच पाप कर्मात सहभागी होण्यापेक्षा आपल्या परीने आपण काय चांगलं करू शकतो, आपल्या घरात कमीत कमी यातलं काही होणार नाही यासाठी कसे जागृत राहू शकतो हा प्रयत्न नक्कीच करावा. समाज समृद्ध होण्यासाठी कुटुंब प्रगल्भ असणं, संस्कारी असणं, सक्षम असणं, विचारी असणं खूप आवश्यक आहे. कुटुंबातील लोकं त्यांचे विचार आचार आणि त्यांची वर्तवणूक तसेच समाजाप्रती बांधिलकी जर असेल तर नक्कीच निरोगी समाज घडेल यात शंका नाही. प्रत्येक कुटुंब आणि समाज यामध्ये ऋणानुबंध असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कुटुंबात सुद्धा परस्पर सुसंवाद, प्रेम, आपुलकी असणे गरजेचे आहे. कोणत्याही सामाजिक विषयावर एकत्र येणे, त्यावर भाष्य करणे, सामाजिक विषयावर चिंतन करणे, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. फक्त मी, माझ्या पुरतं, माझं घर, माझी माणसं इतकं संकुचित विचाराने आपण वागलो तर आपण पण मागे राहू आपले घर पण मागे राहील आणि ज्या समाजातं आपण राहतो तो पण प्रगती करू शकणार नाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -