मुंबई: काँगोचा एक नागरिक भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी किन्शासा येथून मुंबई विमानतळावर आलेल्या या महिलेला अटक केली.
भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूल्सचे सेवन केल्याचे या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले. या महिलेला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या महिलेच्या शरीरातून एकूण ५४४ ग्रॅम कोकेन असलेल्या १० कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या. काळ्या बाजारात या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे ५ कोटी ४४ लाख रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा २०२५ अंतर्गत हे कोकेन जप्त करण्यात आले असून याच कायद्याच्या तरतुदीअंतर्गत या महिलेला अटकही करण्यात आली आहे.