मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, (CIDCO) म्हाडा (MHADA) यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत आहे. ही हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सिडकोचे अधिकारी तसेच लॉटरीतील सहभागी नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरजी यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय दर्जेदार असून ही घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता अटल सेतूमुळे २० मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफित तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभसंदेश वाचून दाखविण्यात आले.