‘म्हाडा’चे उपाध्यकक्षांचे निर्देश
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी दिले. दोन्ही प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधून झोपडीधारकांची पात्रता निश्चिती, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल दिले .
मुंबई महानगर प्रदेशातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळावी यासाठी रखडलेल्या १७ प्रकल्पांचा पुनर्विकास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर केला जात आहे. यापैकी आठ प्रकल्पासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे १३(२) अन्वये कार्यवाही करण्यात आली असून सदर प्रकल्प मूळ विकासकांकडून काढून घेण्यात आले आहेत. गोरेगाव येथील १२, वांद्रे येथील २, कुर्ला येथील ५, बोरिवली/ दहिसर येथील २ प्रकल्पांचा यात समावेश आहे. उर्वरित पाच प्रकल्पांची व्यवहार्यता तपासायचे काम सुरू आहे. हे सर्व प्रकल्प म्हाडाच्या जमिनीवर आहेत.
या रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांच्या माध्यमातून म्हाडाला सुमारे २५००० अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट आहे. या पुनर्वसन प्रकल्पांतून प्रकल्पग्रस्तांसाठी किती घरे निर्माण होतील याबाबतचा आढावाही आज घेण्यात आला. या प्रकल्पांमधील अपात्र झोपडपट्टीधारकांना निष्कासित करण्याची कार्यवाही दोन्ही प्राधिकरणांनी तात्काळ करावी, असेही निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले.
म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मालवणी मालाड येथील प्रकल्प सर्वात मोठा असून या ठिकाणी १४००० झोपडीधारक आहेत. या सर्व झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याच्या सूचना श्री संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले.