कर्तृत्ववान ती राज्ञी : वैशाली गायकवाड
आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, स्वराज्याच्या महानायकाला त्रिवार वंदन. स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या शिलेदारांवर अतूट विश्वास ठेवून समाजातील सर्व स्तरातील घटकांप्रती माणुसकीचे बीज पेरण्याचे संस्कार दिले तशाच सेवाभावी वृत्तीने समाजातील गतिमंद मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ज्योत्स्ना प्रधान या आजच्या युगातील विशेष मुलांच्या जिजाऊंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ८० ते ९० च्या दशकामध्ये गतिमंदत्व हे फारसं समाजमान्य झालेलं नव्हतं, ही सगळी मुलं घरातल्या घरात लपवल्यासारखी राहायची. या विशेष मुलांचे भावविश्व जाणून घेऊन त्यांना व त्यांच्या पालकांना काही काळ मोकळा श्वास घेता यावा, या उद्दिष्टाने ‘विश्वास’ या गतिमंद मुलांच्या केंद्राची सुरुवात १९८९ साली झाली.
सुरुवातीपासूनच लायन्स क्लबसारख्या समाजाभिमुख संस्थांच्या कार्यानुभावामुळेच सामाजिक बांधिलकी ही आपसूकच ताईंच्या मनात मूलतः रुजली गेली. त्यामुळे आपण कोणतं अनोख कार्य करतोय अशी कोणतीच भावना मनात न येता समाजाप्रती आपला सहभाग हे आपले आद्य कर्तव्य म्हणून त्यांचे कार्य सुरू झाले.इन्कम टॅक्समध्ये इन्स्पेक्टर या पदावरून रिटायर्ड झालेल्या ‘अश्विनी सुळे’ आणि गृहिणी असणाऱ्या ‘ज्योत्स्ना प्रधान’ या दोन मैत्रिणींच्या अतूट विश्वासावर सहा मुलांना घेऊन अश्विनी सुळे, त्यांचे पती अरविंद सुळे, ज्योत्स्ना प्रधान, त्यांचे पती दिलीप प्रधान आणि डॉक्टर किरण कारानी अशा पाच व्यक्तींनी या केंद्राची सुरुवात अरविंद सुळे यांच्याच घरी राम मारुती रोड, ठाणे येथे केली या मुलांच्या पालकांचे देखील तेवढे उत्तम सहकार्य या संस्थेला लाभल्याने संस्था आज २२ मुलांना सांभाळत अविरत कार्य करीत आहे.प्रत्येक मुलाच्या भावविश्वाचा विचार करत त्यांची गुणवत्ता लक्षात घेणं हे खूप जिकिरीचे काम होते. अशा वेळेस संस्थेने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते यांची मदत घेऊन प्रत्येक मुलाची आयक्यू लेव्हल जाणून घेत त्यांना कशाप्रकारे सांभाळलं पाहिजे याचं ट्रेनिंग संस्थेतील शिक्षकांना दिलं. प्रत्येकाच्या कलाने घेत त्याच्यातील कौशल्य ओळखून त्याच्याशी संवाद साधत त्याला प्रेम आणि आपुलकीने, विश्वासाने आपलंसं करून चांगल्या गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करणं अशा महत्त्वपूर्ण बाबींवर संपूर्ण टीम काम करत होती. या मुलांच्या निरागस, निर्मळ, निर्व्याज, निरपेक्ष वागण्याने तिथल्या सगळ्यांनाच एक वेगळं समाधान आणि ऊर्जा ही मुलं देत होती.या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच संपूर्ण टीमचं टॉनिक ठरलं.
ज्योत्स्ना ताई आणि अश्विनीताई सुळे या स्वखर्चातून संस्था चालवत होत्या. तसंच या मुलांना गाणी, गोष्टी शिकता शिकवता त्यांच्या असे लक्षात आले की, ह्या मुलांच्या हाताला काहीतरी काम असलं पाहिजे. डॉक्टरांकडून त्याकाळी औषधांच्या छोट्या बॅग बनवण्याचे काम या मुलांकरिता मिळालं. आकाश कंदील तयार करणे, दिव्यांचं डेकोरेशन करणं, ग्रीटिंग्स तयार करणे, लसून सोलून देणं, मटार सोलून पॅकेट तयार करणे, अशा विविध गोष्टी कायमच ज्योत्स्ना ताईंच्या अध्यक्षतेखाली या मुलांकडून करून घेतल्या जातात. त्यामुळे अनेक संस्था, व्यक्ती या वस्तू विकत घेऊन त्यांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. शाळेत गेल्यानंतर मुलांचे हसरे चेहरे बघितल्यानंतर बाकीची सगळी दुःखं विसरायला होतात. तितक्याच आपुलकीने, अगतिकतेने या शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाताई क्षीरसागर यांच्या समन्वयाखाली सोबत असणाऱ्या सगळ्या शिक्षिका, मदतनीस हसतमुखाने सगळ्यांचे स्वागत करत असतात, त्यामुळेच मुलांना सुरक्षिततेसोबतच नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद देखील होतो. तसेच या मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. विविध कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करण्याची संधी यामुळे मुलांना मिळते. त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.एक छोटीशी लायब्ररी मुलांना सुरू करून दिली. या उपक्रमामुळे वाचनालय चालवण्याचं एक छोटंसं ट्रेनिंग ह्या दोस्तांना देण्याचा प्रयत्न केला गेला.
अश्विनी सुळे यांच्या निधनानंतर त्यांचे मिस्टर अरविंद सुळे यांनी संस्थेचे कार्य एकहाती पेलेले आणि पुढे नेले. अरविंद सुळे यांच्या निधनानंतर, काही काळ ताईंना एकटेपणा वाटून गेला. परंतु या मुलांमुळेच त्यांनी स्वतःला सावरत स्वतःबरोबर त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याचे कार्य अविरत चालू ठेवले.आता त्यांना साथ द्यायला कविता देशमुख, संजय भोईर, शैलेश साळवी, क्षीरसागर अशी विश्वस्तांची समिती कार्यरत आहे. मीना क्षीरसागर या विशेष मुलांच्या मुख्याध्यापिका असून त्यांच्यासोबतच अनुभवी शिक्षिका आणि स्वयंसेविका यादेखील तेवढ्याच निष्ठेने कार्य करीत आहेत.महिलांना त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. परंतु अशा आव्हानांचा सकारात्मक विचार करत प्रत्येक स्त्री ही स्वतःची वाटचाल उत्तमरीत्या करू शकते याचे उत्तम उदाहरण ताईंनी सगळ्या महिलांसमोर ठेवले आहे. हाच समाजसेवेचा वारसा ज्योत्स्ना ताई आणि अश्विनीताई यांची पुढची पिढी म्हणजेच अमोघ सुळे आणि यशोधन प्रधान हे दोघेही आज १०० मुलांना राहता येईल अशा रेसिडेन्शियल स्कूलची आखणी करत आहेत. गेली सहा वर्षे त्यांचा या रेसिडेन्शियल स्कूलचा प्रवास चालू आहे, पुढच्या दोन वर्षांत तो जवळजवळ पूर्णत्वाच्या टप्प्यात आलेला असेल. १०० मुलांना राहण्याची सोय, त्यांची संपूर्ण जबाबदारी ही त्या शाळेतच घेतली जाईल अशा दैवी कार्याचे संस्कार त्यांच्या मुलांमध्ये त्यांनी रुजवले आहेतच. त्यांच्या नातवाला देखील त्या विशेष मुलांसोबतची पुस्तक हंडी, जिथे स्टॉल लागतात त्या स्टॉलवर जाऊन त्यांनी केलेल्या वस्तू विकत घेणे, अशा कार्यक्रमांसाठी या मुलांना मदत करणे असे हे समाजसेवेचे व्रत अविरत चालू आहे. एका सामान्य महिलेने विचार केला तर तिच्या आजूबाजूला समाजात अडचणीत असणाऱ्या, गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे करत, निरपेक्ष भावनेने कार्य करत राहण्याचे उत्तम उदाहरण ज्योत्स्ना ताईंनी सगळ्यांसमोर ठेवलेले आहे
विशेष मुलांना मदत करणाऱ्या या आधारवडाची मूळ ही दिवसेंदिवस अधिक घट्ट होवोत, याची सावली अधिक दाट होत जावो. या घनदाट सावलीत अशा विशेष मुलांचे आयुष्य आकार घेण्याचे ईश्वरी बळ सगळ्यांना कायम मिळो.या विश्वासनीय प्रवासात आपल्यासारखी अनेक विश्वासू माणसे विश्वसनीयतेने जोडली जावोत. या सदिच्छेसह खालील दोन ओळी या संस्थेच्या कार्यासाठी अनुरूप वाटतात –
चाललेल्या मुशाफिरा दाखवावी वाट तू,
शोधतो आधार जो, त्यास द्यावा हात तू…