सात आरोपी ताब्यात : लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
शिर्डी : गुजरात राज्यातील सुरत येथील भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असताना,त्यांचे वाहन अडवून बंदुक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून यातील सात आरोपींना ताब्यात घेऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत इर्टिगा वाहनातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचे वाहन सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आले असताना,दुसऱ्या एका चारचाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांचे वाहन थांबवले. यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने तसेच मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पलायन केले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांचे पथक आणि कोपरगाव पोलिस यांनी समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला. हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव याने केल्याची प्रथम माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ कदम,राहुल शिंगाडे, सागर भालेराव,समीर रामदास माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.आरोपींकडून लोखंडी कत्ती,गावठी कट्टा,एअर गण, धातूच्या अंगठ्या,चैन असा एकूण ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या घटनेतील आरोपी सराईत गुन्हेगार असून या आधी ही त्यांनी दरोडा,जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आली.आरोपींनी रोख रक्कम आपापसात वाटून घेत सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली. रस्तालूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.