नोएडा : उत्तर प्रदेशमधील नोएडा सेक्टर ४९ मधील अगाहपूर गावात दुर्दैवी घटना घडली. लग्नाची वरात गावातून जात असताना ही दुर्घटना घडली. एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास अगाहपूर गावातून एक वरात जात होती. वरातीतल्या बँडचा आवाज ऐकून जवळ असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे विकास (४०) आणि त्यांचा मुलगा (२) हे दोघे बाल्कनीत आले. ते बाल्कनीतून लग्नाची वरात बघत होते. याच सुमारास वरातीत असलेल्या एका व्यक्तीने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबर केला. यातलीच एक गोळी थेट डोक्यात लागल्यामुळे चिमुरडा गंभीर जखमी झाला आणि बाल्कनीतच खाली कोसळला.
मुलगा गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच विकास यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन उपचार सुरू केले. पण थोड्या वेळाने मुलाने अखेरचा श्वास घेतला.या प्रकरणी विकास यांनी दिलेली माहिती ऐकल्यावर पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यास सुरवात केली आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत तपासलेले सीसीटीव्ही फूटेज आणि हाती आलेली माहिती यांच्याआधारे पोलिसांनी हॅप्पी आणि दिपांशू या दोघांचा शोध सुरू केला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि कलम ३० च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी सापडताच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.