Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यवेलॉक्स सोल्युशन्स लिमिटेड

वेलॉक्स सोल्युशन्स लिमिटेड

सेवाव्रती : शिबानी जोशी

जगभरात पन्नास वर्षांपूर्वी संगणकाचा वापर सुरू झाला आणि हळूहळू सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातही तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला. संगणकाच्या वापरामुळे जलद गतीने काम सुरू झालं; परंतु तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत त्यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारेही निर्माण होऊ लागले आणि त्यासाठी सेफ्टी म्हणजेच सुरक्षेची गरज निर्माण झाली. संगणकाद्वारे आर्थिक व्यवहार सुरू झाल्यावर, तर सायबर सिक्युरिटी ची गरज खूपच भासू लागली. सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये डॉक्टर मंगेश आमले यांनी पूर्वानुभवातून कंपनी सुरू केली. आज अनेक राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, विविध मोठमोठ्या कंपन्या यांना सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स पुरवत आहेत.

आज डॉ. मंगेश अमले हे व्हेलोक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हेलॉक्स व्हर्चुअल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, व्हेलॉक्स इंक. शिकागो यूएसए आणि कर्करोगाच्या रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी काम करणाऱ्या व्हेलॉक्स फाउंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसेच डेक्कन बँक, मुंबईच्या बोर्डावर संचालक म्हणूनही ते काम करतात. वेलॅाक्स सोल्युशन ही कंपनी सायबर सिक्युरिटी पुरवते. आता सायबर सिक्युरिटी क्षेत्र म्हणजे नेमक काय? संगणकाचा वापर, बँकिंग, एकमेकात होणारा संवाद यासाठी सर्वसामान्य करू लागले आणि मग लक्षात येऊ लागले की, कोणीतरी आपली माहिती चोरतोय किंवा त्याच्याशी छेडछाड करत आहे. तिथे त्याची सुरक्षेची गरज पडू लागली. २५ वर्षांपूर्वी सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त अँटीव्हायरस करणे अस वाटायच. पण हे आता एक वैश्विक जाळ झाले आहे आणि तुमच्या माहितीवर कोणत्याही देशातून अटॅक होऊ शकतो तो होऊ नये म्हणून सायबर सिक्युरिटी.

आमले यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात घरच्या परिस्थितीमुळे एका सामान्य सरकारी शाळेत केली. पण नंतर त्यांनी जगातील  प्रतिष्ठित विद्यापीठांमधून अनेक पदव्या मिळवल्या आणि विविध क्षेत्रात तज्ज्ञता मिळवली. पूर्वी आपण नागपूरच्या डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे नाव ऐकले होते, त्यांच्याप्रमाणेच आमले यांनी पुणे विद्यापीठातून पदवीधर इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषय, आयआयटी मुंबईमधून एमबीए,वॉशिंग्टन विद्यापीठातून ईएमबीए, बिझनेस फायनान्समध्ये मास्टर आयआयटी कानपूर, जम्मूमधून सायबर सुरक्षा विषयात पदव्युतर पदवी, सायबर लॉ मध्ये डिप्लोमा, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये प्रमाणपत्र लंडन स्कूल ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्समधून, मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी., सनराईज युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट) युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पॅरिस इतक्या पदव्या त्याने प्राप्त केल्या आहेत. काही वर्षां पूर्वी तंत्रज्ञान परदेशी होत, आपल्या देशात बनत नसे. आमले यांच्या वेलॉक्स या कंपनीतर्फे विविध कंपन्या, बँका यांना सायबर सेक्युरिटी तर दिली जातेच त्याशिवाय  त्या सिक्युरिटीसाठी वापरले जाणारे प्रॉडक्ट्स देखील तयार केले जातात.

आज मोबाईल, लॅपटॉप, संगणक, ऑफिस, बँका कोणत्याही ठिकाणी सायबर सिक्युरिटीची खूप मोठी गरज आहे. आज आपल्या देशातल्या एटीएमपैकी जवळजवळ ५० टक्के एटीएम केंद्रांवर वेलॉक्सची सिक्युरिटी टूल्स वापरली जातात. सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया या धोरणामुळे सुद्धा बाहेरून सायबर सिक्युरिटी टूल्स घेण्यापेक्षा भारतात बनवलेली टूल्स वापरण्यावर  भर देण्यात येत आहे त्यामुळे वेलॉक्सचे कामही खूप वाढले आहे, असे मंगेश आमले सांगतात. एखाद्या कार्यालयातील लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक, नेटवर्क, डेटा सेंटर, सर्वर अशा सर्व सिस्टिम्सना सिक्युरिटी टूल्स देण्याचं काम त्यांची कंपनी करते. आमले यांनी आयआयटी मुंबईमधूनही शिक्षण घेतले आहे. ते म्हणतात की, या संस्थेत हेही शिकवले जाते की तुम्ही जे काही कराल ते केवळ स्वतःसाठी, पैसे मिळवण्यासाठी नसून देशासाठी सुद्धा ते काम होत आहे हे लक्षात ठेवून ते काम करा. सायबर सिक्युरिटी हे तर अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. अनेक बँका सरकारी आस्थापना यांच्यासाठी सायबर सुरक्षा पुरवणं हे एक राष्ट्रीय कार्य सुद्धा आहे असे आमले म्हणतात.

या संवेदनाशील क्षेत्रात काम २४ तास ३६५ दिवस सुरू राहते त्यामुळे वेलॉक्सकडे प्रशिक्षित असा २६५ जणांचा स्टाफ आहे. उच्चशिक्षित इंजिनियरांना अतिशय चांगला मोबदला देऊन दर्जेदार सेवा वेलोक्स पुरवत असते. आज  १११ सहकारी बँका तसेच ३० सरकारी आस्थापनांना ते सायबर सेक्युरिटी पुरवतात. वेलॉक्स सोल्युशन्सचा बारा वर्षात शेकडो कोटींच्या वर टर्न वर पोहोचला आहे. त्यांचे काम पाहून  आता त्यांची टूल्स निर्यातही होऊ लागली आहेत. जवळजवळ आठ देशांमध्ये ते सायबर सिक्युरिटी सेवा पुरवतात त्यासाठी त्यांनी शिकागो येथे एक केंद्र ही स्थापन केले आहे. त्या ठिकाणी संशोधन आणि नावीन्यता यावर काम केले जाते.पुढच्या पाच वर्षांत जगभरातल्या १०० देशांमध्ये पोहोचण्याचे त्यांचे लक्ष आहे.  आपण पाहतो की सर्वसामान्य माणूसही सायबर  गुन्ह्यांच्या जाळ्यामध्ये अडकला जात आहे. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असं विचारलं असता आमले म्हणाले की, आपण घर घेतो तेव्हा त्या घराला दरवाजा आणि कुलूप हे घेतोच घेतो त्याप्रमाणे जेव्हा आपण कुठलीही एखादी सिस्टीम वापरायला घेतो तेव्हा त्याला सुरक्षित कवच ठेवणे हे नितांत गरजेचे आहे आणि नुसते कुलूप घ्यायचे नाही तर ते लावायचे सुद्धा. त्यामुळे प्रत्येकाने अवेअरनेस ठेवलाच पाहिजे. आपल्याच छोट्याशा चुकीमुळे ७० टक्के फ्रॉड होत असतात.

आज गुगल तुमची प्रत्येक गोष्ट हेरून ठेवत आहे. तुम्ही सकाळी भाजीवाल्याकडे गेलात आणि भाजी आणलीत आणि दोघांसाठी गुगल असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तशाच प्रकारची एखादी जाहिरात दिसू लागते. त्यासाठी घ्यायची काळजी आणि सुरक्षितता आपण राखलीच पाहिजे. या क्षेत्राचे भवितव्य काय? असे विचारले असता आमले म्हणाले  की जस “जब तक सुरज चांद रहेगा” याच धरतीवर “जब तक संगणक सिस्टिम्स रहेगा सायबर सिक्युरिटी का महत्त्व रहेगा.” त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आवड असलेल्या तरुणांना या क्षेत्रामध्ये खूप मोठं भवितव्य आहे आणि त्यांनी जरूर या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवावं असा सल्ला ते तरुणांना देतात.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -