इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर १५ फेब्रुवारी २०२५ रोजी महाकुंभसाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण तुडवले गेले. प्रयागराज येथे महाकुंभला जाण्यासाठी रोज लक्षावधी भाविक देशाच्या कानाकोपऱ्यांतून रेल्वे, बस, मिळेल त्या वाहनाने जात आहेत. गेल्या अडतीस दिवसांत ६० कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे. येत्या २६ फेब्रुवारीला महाकुंभची सांगता आहे. तोपर्यंत भाविकांचा ओघ प्रयागराजकडे अखंड चालूच राहणार आहे. दि. २९ जानेवारीला प्रयागराज येथे महाकुंभसाठी जमलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४० जणांचा मृत्यू झाला. १० फेब्रुवारीलाही प्रयागराज स्टेशनवर अफाट गर्दीत चेंगराचेंगरी, धक्काबुक्की झाली होती. महाकुंभ परिसरात लागलेल्या आगीतही मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून देशातील सर्व शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या ये-जा करीत असतात. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन अहोरात्र गर्दीने गजबजलेले असते. तिथे सीसीटीव्हीचे जाळे आहे. सुरक्षा व्यवस्था सर्वाधिक आहे. अन्य रेल्वे स्टेशनच्या तुलनेने मनुष्यबळ बऱ्यापैकी आहे. मग महाकुंभला जाणाऱ्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १८ बळी पडले त्याला जबाबदार कोण? प्रवाशांच्या अफाट गर्दीला नियंत्रित करता आले नाही का? सुरक्षा व्यवस्था अपुरी होती का? रेल्वेचे प्लॅटफॉर्म अचानक बदलले म्हणून गोंधळ-पळापळ झाली का? उद्घोषणा चुकीच्या झाल्या का? अफवांमुळे निरापराध भाविकांचे गर्दीने गुदमरून बळी गेले का? रेल्वे स्टेशनवरील जिने अचानक बंद केल्याने चेंगराचेंगरी झाली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे उच्चस्तरीय चौकशीनंतर समजतील.
पण प्रयागराज किंवा दिल्ली स्टेशनवर अफाट गर्दीने घेतलेले बळी परत येणार नाहीत. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच दुर्घटना नव्हे. एक डझनपेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांचे मृत्यू झालेल्या अनेक घटना सांगता येतील. याच वर्षी २२ जानेवारीला उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसची साखळी ओढून काही प्रवाशांनी ट्रेन थांबवली. या गाडीतून खाली उतरून रेल्वे रूळ ओलांडत असताना नेमके समोरून वेगाने कर्नाटक एक्स्प्रेस आली व त्याखाली १२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेअगोदर लुधियाना येथे शान ए पंजाबला आग लागल्याची घटना घडली, सूरतमध्ये सौराष्ट्र एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली, जून २०२४ मध्ये बिहारमध्ये कटिहार येथे कंचनगंगा एक्स्प्रेसवर मालगाडी आदळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. सन २०२३ मध्ये ओडिशा रेल्वे अपघातात २९६ जणांना जीव गमवावा लागला. अशा अनेक रेल्वे दुर्घटनांची मालिका सांगता येईल, प्रत्येक घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा विरोधी पक्षाने मागितला पण गेल्या दहा वर्षांत कोणत्याही रेल्वे मंत्र्याने राजीनामा दिला नाही किंवा विरोधी पक्षानेही राजीनाम्याची मागणी सातत्याने पुढे रेटली नाही.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजवर रेल्वे दुर्घटनेनंतर तीनच रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. लाल बहादूर शास्त्री, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार या तिघांनी रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९५६ मध्ये तामिळनाडूतील (तत्कालीन मद्रास) अरियालूर रेल्वे अपघातानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला होता. अरियालूर व कल्लगाम रेल्वे स्टेशनच्या दरम्यान पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याच्या वेगाने पुलाचा वीस फूट भाग वाहून गेला व त्यानंतरही पुराचे पाणी वाढत राहिले. दि. २३ नोव्हेंबर १९५६ रोजी तुतीकोरिन एक्स्प्रेस सकाळी ५.३० वाजता अलियालूर स्टेशनवरून निघाली आणि तीन किमी अंतरावर रुळावरून घसरली. ट्रेनचे इंजिन आणि सात बोगी नदीत कोसळल्या. आठवा डबा रुळावरून खाली उतरला तर शेवटचे चार डबे सुरक्षित राहिले. या अपघातात १४२ प्रवाशांचा मृत्यू झाला व ११० जखमी झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री रेल्वेमंत्री होते. या दुर्घटनेअगोदर आणखी काही गंभीर रेल्वे अपघात घडले होते.
दि. २ सप्टेंबर १९५६ च्या रात्री सिकंदराबादहून निघालेल्या ट्रेनला मेहबूबनगर जवळ अपघात झाला व त्यात १२१ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र अरियालूर दुर्घटनेनंतर शास्त्रींनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. शास्त्री यांचा राजीनामा स्वीकारत असल्याची शिफारस आपण तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना करीत असल्याची घोषणा पंडित नेहरूंनी तेव्हा लोकसभेत केली होती, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले – रेल्वे अपघाताला स्वत: शास्त्रीजी जबाबदार आहेत असे मी मानत नाही. पण काहीही घडले तरी चालेल असे कोणी समजता कामा नये म्हणून संविधानिक औचित्याच्या दृष्टिकोणातून त्यांचा राजीनामा स्वीकारून आपण राष्ट्रपतींकडे पाठवत आहोत…
दि. २ ऑगस्ट १९९९ च्या रात्री ब्रह्मपुत्रा मेल दिल्लीला जात होती आणि समोरून अवध आसाम एक्स्प्रेस आली. बोडो उग्रवादींच्या आंदोलनाच्या टापूतच हा भयानक अपघात झाला. गाइसल स्टेशनच्या केबिनमध्ये वीज नसल्याने अंधारात एक कंदील घेऊन बसलेल्या केबिनमनला काही कळण्यापूर्वीच हा मोठा अपघात झाला. त्यात ३०० पेक्षा जास्त प्रवासी ठार झाले व ६०० पेक्षा जास्त जखमी झाले. दुसऱ्या दिवशी ३ वाजता तत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार घटनास्थळी पोहोचले तेव्हा संतप्त जमावाला त्यांना सामोरे जावे लागले. अपघातातील डबे उचलणारी क्रेनही तिथे उशिरा पोहोचली. अस्वस्थ झालेले नितीशकुमार तासाभरात दिल्लीला परतले व त्यांनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे सुपूर्द केला. वाजपेयी यांनी नितीशकुमार यांची त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून बरीच समजूत घातली पण अखेर त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला.नंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी रेल्वे अपघात हे रेल्वेचे अपयश असल्याचे सांगून या घटनेची आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. हा अपघात ही केवळ चूक नव्हती तर ती गुन्हेगारी स्वरूपाची बेपर्वाई होती, म्हणूनच रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रेल्वेवर सातत्याने बोजा वाढत आहे, तांत्रिक सुधारणा करणे अत्यंत जरूरीचे आहे, अशीही त्यांनी टिप्पणी केली होती.
सन २००० मध्ये केंद्रात भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार असताना रेल्वे अपघाताच्या दोन घटना घडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण पंतप्रधान वाजपेयी यांनी त्यांची समजूत काढली व राजीनामा फेटाळला. मार्च २००१ मध्ये वाजपेयी यांनी पु्न्हा रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे नितीशकुमार यांच्याकडे सोपवली. त्यांनी रेल्वे सुरक्षा व सक्षम सिग्नल प्रणालीवर भर दिला. रेल्वे अपघात कसे कमी होतील यावर त्यांनी लक्ष्य केंद्रित केले होते.
भारतात अहोरात्र हजारो रेल्वे गाड्या देशभर धावत असतात आणि रोज कोट्यवधी लोक त्यातून प्रवास करीत असतात. रेल्वे सुरक्षा हा सर्वात संवेदनशील व सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या एका अहवालात ७५ टक्के रेल्वे अपघात हे रेल्वे कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा किंवा बेपर्वाईपणामुळे घडत असतात असे म्हटले आहे. १० टक्के रेल्वे अपघात साधनसामग्री किंवा उपकरणे बिघडल्यामुळे होत असतात. इंजिन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक, सिग्नल्स, आदींच्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे गाड्या रुळावरून खाली घसरतात. शॉर्टसर्किट, पेंट्री कारमधील कर्मचारी, ठेकेदार, प्रवाशांकडे असलेले ज्वलनशील पदार्थ आदींमुळे डब्यांना आगी लागतात. गरजेपेक्षा रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुरे मनुष्य बळ हे सुद्धा अपघाताचे एक कारण आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षा यंत्रणेत जवळपास २० हजार पदे रिक्त होती. अनेक ठिकाणी लोको कर्मचारी, ट्रेन व्यवस्थापक, स्टेशन मास्टर अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेच्या अहवालानुसार २००४ ते २०१४ या काळात दरवर्षी रेल्वे अपघातांची संख्या सरासरी १७१ होती. २०१४ ते २०२३ या काळात हीच संख्या प्रतिवर्षी ७१ पर्यंत खाली आली आहे.
रोज मरे त्याला कोण…
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उपनगरी रेल्वे (लोकल) अपघातात रोज ६ ते ७ प्रवाशांचा मृत्यू होतो पण त्याची फारशी कधी चर्चा होत नाही. सन २०२३ मध्ये मुंबईत लोकल अपघातात २५९० जणांचे मृत्यू झाले, तर २०२४ मध्ये २४६८ मृत्यू झाले. गेल्या वर्षी रूळ ओलांडताना ११५१ जणांचे मृत्यू झाले. गेल्या २० वर्षांत उपनगरी रेल्वे अपघातात ५० हजार मृत्यू झाले असावेत. मुंबईत रोज ३२०० पेक्षा जास्त लोकल्स धावतात व त्यातून ७५ लाखांपेक्षा जास्त लोक प्रवास करीत असतात. रोज मरे त्याला कोण रडे अशी मुंबईच्या उपनगरी रेल्वे प्रवासाची अवस्था आहे.