Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Political News : शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात

Political News : शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात

भाजपा, राष्ट्रवादीच्याही नेत्यांची सुरक्षा केली कमी


मुंबई  : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील नाराजीच्या चर्चा रंगत असताना अशातच आता शिंदेंच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यात कपात केल्याने शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना नेत्यांसोबतच भाजपा आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पण त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.



राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही, त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपा नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


या सुरक्षा कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना. या आधी शिंदेंच्या आमदारंना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती.



शिवसेना फुटीनंतर सुरक्षा प्रदान


शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली. शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यावरून अनेकदा सरकारवर आक्षेप घेण्यात आले होते. पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. आता देवेंद्र फडणवीसांनी त्यामध्ये कपात केली आहे.

Comments
Add Comment