Saturday, May 10, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

रायगड जिल्हा परिषदेच्या ६३ शाळांमधील वीज पुरवठा बंद

रायगड जिल्हा परिषदेच्या ६३ शाळांमधील वीज पुरवठा बंद

बील न भरल्याने ग्रामीण भागातील ज्ञानमंदिरे अंधारात


पनवेल  : ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरावा, अज्ञानरूपी अंधार दूर व्हावा यासाठी झटणाऱ्या शाळामध्येच अंधार निर्माण होण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज पुरवठा करण्यात जिल्हा परिषद अकार्यक्षम ठरली. जिल्हा परिषदेच्या ६३ शाळा अंधारात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही यादी घेण्यात आली आहे. शाळांना वीज पुरवठा व्हावा यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत नसल्याचे सांगितले जात आहे.


शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे डिजिटल शिक्षणाला हरताळ बसण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. शाळेत वीज पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. गटशिक्षण अधिकारी यांना सूचना देऊन आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या या गलथान कारभाराबाबत नाराजीचे सूर
उमटत आहेत.



डिजिटल शिक्षणाला फासला हरताळ


रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. या शाळेमध्ये ९५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. डिजिटल शिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रोजेक्टर उपलब्ध करण्यात आले. यातून आधुनिक पद्धतीने खेळता-खेळता शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ६३ शाळा गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Comments
Add Comment