Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजऑपरेशन टायगरने उडवलीय ठाकरे गटाची झोप!

ऑपरेशन टायगरने उडवलीय ठाकरे गटाची झोप!

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही आजी-माजी आमदार, खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. येत्या काळात पक्षप्रवेश पार पडतील, असेही वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केले होते. त्यानंतर काही दिवसामध्येच ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे राजन साळवी यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला, त्यानंतर आता पक्षाला आणखी काही धक्के बसू नयेत यासाठी उध्दव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षातील माजी आमदार, अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली आहे.

ठाकरे गटाच्या खासदारांची २० तारखेला तर आमदारांची २५ तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे. खासदार, आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती.

विधानसभेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलवण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच या बैठकीमध्ये ते त्या-त्या मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे समजून घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या चर्चा होत्या, या दृष्टिकोनातून या बैठका महत्त्वाचा मानल्या जात आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केलीय. त्यातच ठाकरे गटाला भगदाड पाडण्यासाठी शिंदे गटानं ऑपरेशन टायगर सुरू केलंय. माजी लोकप्रतिनिधींसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडून शिंदे गटाची वाट धरलीय. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर कोकणसारखा बालेकिल्ला ठाकरेंच्या हातातून निसटल्याची चर्चा सुरू झालीय. त्यातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवदेखील नाराज असल्याचे वृत्त समोर आल्याने याची धास्ती ठाकरे गटानं घेतलीय. तिकडे दिल्लीमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि त्यामुळे देखिल ठाकरे गटात खळबळ उडाली. शिवसेना (शिंदे गट) मजबूत होत असताना, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अस्वस्थता वाढतेय. उद्धव ठाकरे हे हलक्या कानाचे तर आदित्य ठाकरे हे संशयखोर असल्याने त्यांना आपल्याच खासदारांच्या निष्ठेवर आता शंका वाटू लागलीय. यासाठीच ऑपरेशन टायगरमुळे पक्षाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची २० फेब्रुवारीला तर खासदारांची बैठक २५ फेब्रुवारीला बोलवली आहे. तर खरंच, उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? “ऑपरेशन टायगर” हे खरंच भाजप आणि शिंदे गटाचं मोठं मिशन आहे का? आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना कुणी भीक घालतो का?

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरे गट सावध झाला. आपला पक्ष आणखी फुटू नये म्हणून आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला पोहोचले आणि खासदारांना स्पष्ट सूचना दिल्या—”शिंदे गटाशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही!” मात्र, या सूचनेमुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो—उद्धव ठाकरेंना भीती नेमकी कशाची आहे?

खरं तर, संसदेच्या अधिवेशनादरम्यान विविध पक्षांचे खासदार एकमेकांना भेटतात, चर्चा करतात. पण उद्धव ठाकरे गटातील खासदार शिंदे गटाच्या नेत्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्यांनी टाळ्या वाजवल्या… आणि लगेचच ठाकरे गटाच्या गोटात खळबळ माजली!

आता प्रश्न असा आहे की, केवळ एका सत्कारामुळे किंवा अनौपचारिक चर्चांमुळे पक्ष फूटतो का? जर पक्षातील नेत्यांचीच निष्ठा एवढी कमकुवत असेल, तर प्रश्न धमक्यांचा नाही, पक्षातील नेतृत्वाचा आहे.

शिंदे गटाला मजबूत करण्यासाठी भाजपनं “ऑपरेशन टायगर” सुरू केल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपनं एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवलीय. त्यांना उद्धव गटातील खासदार फोडण्याचं काम दिलं गेलंय आणि जर त्यांनी हे काम केलं, तर त्यांना केंद्र सरकारमध्ये मोठी संधी दिली जाईल!

यावरून स्पष्ट होतं की, एकनाथ शिंदे आणि भाजपचा हा डाव ठाकरे गटासाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो. त्यामुळेच सध्या ठाकरे गटात चिंतेचं वातावरण आहे. उद्धव ठाकरे पक्षावर आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी खासदारांना आदेश देत आहेत—”शिंदे गटाशी कोणतीही चर्चा नाही, कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहायचं नाही, आणि त्यांच्याकडे पाहायचंही नाही!” पण प्रश्न असा आहे की, हे खरंच किती प्रभावी ठरणार? एका पक्षाचा नेता आपल्या खासदारांना अशा सूचना देतोय, यावरूनच स्पष्ट होतं की, पक्षातील लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झालाय.

शरद पवारांचेच उदाहरण घ्या—त्यांचा पक्षही फुटला, पण त्यांनी कधीही आपल्या आमदार – खासदारांवर अशी बंधनं घातली नाहीत. उलट, त्यांचे काही लोक अजित पवारांशी समन्वय साधण्याचा आग्रह धरत आहेत.

इकडे खासदारांना आदेश दिल्यानंतरही ते जुमानत नसल्याने आता उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची २० फेब्रुवारीला तर खासदारांची बैठक २५ फेब्रुवारीला बोलवली आहे. पण याने काय साध्य होणारेय. यामुळे भविष्यात ठाकरे गट आणखी कमजोर होईल? शिंदे गटाचा वाढता प्रभाव ठाकरे गटातील खासदारांना आकर्षित करेल? भाजप “ऑपरेशन टायगर” यशस्वी करेल का? हे सर्व प्रश्न येत्या काही महिन्यांत स्पष्ट होतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे—धमक्या देऊन पक्ष टिकवता येत नाही. नेतृत्वात विश्वास असेल, तरच कार्यकर्ते टिकून राहतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -