मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून ती आता ६२ टक्के झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये या प्रकल्पांचा आढावा घ्यायला महारेराने सुरुवात केली तेव्हा हे प्रमाण ०.०२ टक्के असे नगण्य होते. सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने ही माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत होत असल्याने घरखरेदीदारांच्या तक्रारींची संख्या नियंत्रणात राहायला मोठी मदत होत असल्याची माहिती महारेरामार्फत देण्यात आली.
महारेराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रतिसाद न देणाऱ्यांवर प्रकल्पाचे बँक खाते गोठवून महारेरा नोंदणी क्रमांक स्थगित करण्यासारखी कठोर कारवाई सुरू केल्याने हा प्रतिसाद वाढलेला आहे. सध्या राज्यात १८,०१२ कार्यरत प्रकल्प आहेत. यापैकी ११,०८० प्रकल्प ही त्रैमासिक प्रपत्रे अद्ययावत करीत आहेत. म्हणजे राज्यात सध्या ६२ टक्के गृहनिर्माण प्रकल्प महारेराच्या संकेतस्थळावर त्रैमासिक माहिती अद्ययावत करीत आहेत. स्थावर संपदा अधिनियमातील कलम ११ विनियामनाचे नियम ३,४ आणि ५ शिवाय ५ जुलै २०२२ चा आदेश क्रमांक ३३/ २०२२ चेही कलम ३ आणि ४ नुसार विकासकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट तरतूद आहे.
त्याप्रमाणे घरखरेदीदाराला घरबसल्या प्रकल्पांची सर्व माहिती देणारी, ग्राहकाला सक्षम करणारी ही प्रपत्रे दर तिमाहीत म्हणजे २० जानेवारी, २० एप्रिल, २० जुलै आणि २० ऑक्टोबर या वेळापत्रकानुसार हे त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. यात प्रपत्र १ आणि २ मध्ये बांधकामाचा प्रगती अहवाल, प्रपत्र ३ मध्ये खर्चाचा तपशील आणि किती सदनिका, गॅरेजची नोंदणी झाली, किती पैसे आले, किती खर्च झाले, प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल झाला का? माहितीचा तपशील देणे आवश्यक आहे.