मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे
वाढत्या स्पर्धेत तग धरण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतीच दरवाढ केली. तसे पहिले तर एसटी दरवाढ ही काळाची गरज होती. मात्र ही एसटी दरवाढ करत असताना प्रवाशांना सुखसोयी देणे, आरामशीर वक्तशीरपणे प्रवास देणे एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे. मात्र त्यालाच तर प्रवासी पारखा होत नाही ना अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच परिवहन मंत्र्यांची जबाबदारी प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे, त्यांचे प्रयत्न हे निश्चित एसटीला कार्यक्षम कसे करता येईल याकडे असले तरी त्यांची इच्छाशक्ती ही वेगळी बाब व अधिकाऱ्यांची व पर्यायाने कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे.
सध्या एसटी महामंडळाला दिवसाला तीन कोटी रुपये तोटा आहे. सध्या मिळणारे उत्पन्न हे इंधन आणि सुट्टे भाग तसेच दैनंदिन खर्च आणि कर्मचारी यातच खर्च होत आहे. त्यामुळे एसटीकडे तसे काही बाकी राहत नाही यामुळे दरवाढ करणे आवश्यक होते. दरवाढ आवश्यक होती असे जरी महामंडळाने म्हटले असले तरी आजही राज्यातील बस स्थानकांची अवस्था तसेच बस गाड्यांचीही अवस्था पाहता प्रवाशांना तितक्या सोयी-सुविधा मिळत नाहीत. सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार बसेस आहेत व त्यातून जवळपास ६५ लाख प्रवासी रोज एसटीतून प्रवास करतात. कोरोना काळात एसटीचा तोटा हा दहा हजार कोटींच्या घरात गेला होता. दरम्यानच्या काळात काही प्रमाणात हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न झाला तरी अजूनही तोट्याचा भार हा एसटीवर कायम आहे. आज राज्यभर अवैध वाहतूक अक्षरशः बोकाळली आहे. त्यात महत्त्वाचे मार्ग हे खासगी वाहतूकदारांनीच काबीज केले आहेत. आज राज्यातील मोठे शहर अथवा कोणते लहान शहर असे नाही की जिथे रात्रीच्या खासगी ट्रॅव्हल्सला वाढ झाला नसेल. त्यामुळे बऱ्याचशा मार्गावर एसटीला बस गाड्या बंद कराव्या लागल्या. बस नाही म्हणून प्रवासी नाही आणि प्रवासी नाही म्हणून बस नाही हे उलट चक्र अव्याहतपणे सुरू आहे, त्यामुळे महामंडळाचा तोटा आणखीनच वाढत आहे तरी अजूनही एसटीला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागेल.
नुकतेच परिवहन मंत्र्यांनी बस गाड्यांच्या बाबतीत घेतलेला एक धोरणात्मक निर्णय हा एसटी महामंडळ कात टाकत असल्याचे दिसते. त्यानुसार दरवर्षी नवीन पाच हजार पाच गाड्या घेतल्या जातील. यासाठी पंचवार्षिक योजना तयार केली गेली असून येत्या पाच वर्षांत या २५,००० बस गाड्या ताफ्यात दाखल होतील. साहजिकच राज्याच्या वित्त विभागाची मोठी मदत लागणार असून मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नवीन बस ताफ्यात येतील व जुन्या १० हजार बस भंगारात जातील व सर्वत्र नवीन बसगाड्या दिसून येतील मात्र तोपर्यंत तरी सध्या असलेला प्रवासी टिकवून ठेवण्याचे एसटीसमोर मोठे आव्हान असेल. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी असे धोरण आणि प्रवाशांचे सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन एसटीचा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. एसटीमध्ये आज एक लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. एकेकाळी एसटीची एकाधिकारशाही होती. शहरापासून गावापर्यंत प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी एसटीकडे होती तसेच प्रवाशांनाही एसटीशिवाय पर्याय नव्हता. ग्रामीण भागात तर एसटी हेच प्रवासाचे प्रमुख साधन त्याकाळी होते. मात्र पर्यायाने वाहनांची संख्या वाढली. खासगी वाहनांचा अक्षरशा सुळसुळाट झाला. लोकांनीही बेभरवशाच्या परिवहन सेवेपेक्षा स्वतःचे वाहन खरेदी करणे पसंत केले. कालांतराने एसटीचे प्रवासी घटू लागले आणि मग एसटीचा तोटा हा दिवसेंदिवस वाढत गेला.
सरकारी धोरणे बदलल्याने खासगी वाहतुकीचा मोठा स्पर्धक एसटी समोर अल्पावधीतच उभा राहिला. खासगी वाहतुकीमध्ये वाढ होण्याची कारणे अनेक होती. आरामदायी प्रवास कर्मचाऱ्यांचे वागणे, दारातच बस सेवा देणे, सेवेची वारंवारता, प्रवास भाड्यातील लवचिकता अशी असंख्य कारणे ही खासगी वाहने वाढून लोकप्रिय होण्याची कारणे ठरली. आजही शहरात किंवा ग्रामीण भागात दुचाकी आणि कारची संख्या इतकी वाढली आहे ती आता एसटीने फक्त ज्येष्ठ नागरिक अथवा विद्यार्थीच जाताना दिसतात यामुळे याचा फटका शहरी एसटी बस वाहतुकीला बसला. वाढत्या रिक्षांची संख्या तसेच ग्रामीण भागात टमटम, अनधिकृत जीपचीही संख्या वाढल्याने शहरी भागात एसटी सेवा तोट्यात गेली आणि कालांतराने ती बंद झाली म्हणून मग एसटीने लांब पल्ल्याची आणि मध्यम पल्ल्याच्या बस सेवा चालवण्याचे ठरवले. तोपर्यंत खासगी सेवेने आपला विळखा तेथे घातला होता. यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृतपणे चालू केलेली ही सेवा एसटीच्या थेट मुळाशीच आली. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना हाती घेणे आवश्यक बनले आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवाढीनंतरही एसटीच्या उत्पन्नात केवळ १३ टक्क्याचीच वाढ झाली आहे. म्हणजेच दिवसाला जे २२ कोटींचे उत्पन्न होते ते २५ कोटींच्या आसपास आले. एसटी महामंडळाने जी १५ टक्क्यांची भाडेवाढ केली आहे त्यानुसार ६० ते ७० कोटींची वाढ होईल असे अपेक्षित धरले होते.
मात्र, अपेक्षित वाढीपेक्षा खूपच कमी उत्पन्न वाढले आहे याचा अर्थ प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घाट झालेली दिसून येत आहे. पैसे जास्त मोजून प्रवास करण्यापेक्षा त्यात अधिकचे पैसे टाकून नाहीतर कधी कधी त्याही पैशापेक्षा कमी पैसे मोजून आरामदायक व सुविधायुक्त प्रवसकडे प्रवासी अधिकचे वळले आहे ही एसटीसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे, तरी आता हा परीक्षांचा हंगाम असल्याने एकदा का सुट्ट्या पडू लागल्या की खरे चित्र स्पष्ट होऊ लागेल. मात्र आता तरी अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारभार केल्यास व कर्मचाऱ्यांनीही प्रवाशांशी अदबीने वागून व त्यांना चांगली सेवा देऊन आहे तो प्रवासी टिकवून ठेवणे हा कसोटीचा काळ ठरेल.
बदलत्या कालानुरूप एसटीने काही बदलही करून बघितले. मात्र वाढलेल्या आवाढव्य खर्चाचा मेळ मात्र अजूनही बसू शकलेला नाही. प्रवासी घटणार हे ठाऊक असूनही अखेर दरवाढ झालीच, मात्र या दरवाढीमुळे एसटीचा तोटा थोडा फार तरी भरून निघेल. एसटीतील भ्रष्टाचारावर सुद्धा आता नियंत्रण आणणे गरजेचे असेल. एसटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे उघड वास्तव आहे. त्याला चाप बसवला तर तोट्याचे प्रमाण कमी होणार आहे. दरवाढीने आता तरी लालपरीला थोडा फार आधार मिळाला असला तरी शासकीय मदत व प्रवाशांकडून मिळालेले उत्पन्न यांच्यात ताळमेळ बसवणे आवश्यक असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीसुद्धा आता फक्त एसटीच्या जागांचा विकास म्हणजेच एसटीच्या उन्नतीचा ध्यास हेच उद्दिष्ठ न ठेवता इतर मार्गांनीही एसटीचा विकास कसा होईल व एसटी स्वबळावर कशी उभी राहील व पुन्हा तिला गतवैभव कसे प्राप्त होईल हे पाहणे उचित ठरेल. एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही आता स्वयंशिस्त बाळगून प्रवासी वाढीला चालना दिल्यास एसटीला चांगले दिवस नक्कीच येतील हे निश्चित.