प्रशासन मात्र डोळे असून आंधळे
राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या गॅसचे अवैध साठे बिनदिक्कत अधिकृत गॅस एजन्सीज कडून खाजगी दुकानदारांकडे करण्यात येत आहे यातून मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय की काय अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
तालुक्यात राहुरी, वांबोरी, टाकळीमिया या ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसचे प्रमुख वितरक आहेत त्यात भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन प्रमुख कंपन्यांचेच वितरक आहेत. या ठिकाणाहून तालुक्याच्या ग्रामीण भागात गॅसचे वितरण होत असते. काही भागात एजन्सीची गॅस वितरण करणारी वाहने दररोज जा-ये करत असतात तर काही भागात ही वाहने दिवसाआड दोन दिवसाआड जात येत असतात. ही गॅस वितरण करणारी वाहने गावागावात ठराविक ठिकाणी थांबून ग्राहकांना गॅसटाक्यांचे वितरण करतात.
हे वितरण करत असताना ठराविक वेळेत केले जाते मात्र या वाहनांमधून गावातील काही ठराविक दुकानांमध्ये गॅसटाक्यांचे साठे करून ते ग्राहकांना दिले जातात त्याचे दरही जास्तीचे असतात गॅसवितरण करणारे वाहन निघून गेल्याने ग्राहकांना नाईलाजाने या ठिकाणाहून गॅसटाक्या न्याव्या लागतात. वरून दरही अव्वाच्या सव्वा द्यावा लागतो. ग्रामीण भागातील जनतेला पर्याय नसल्याने त्यांना अशा ठिकाणाहून गॅसटाकी नेणे क्रमप्राप्त होतं आहे.
केंद्र व राज्य शासनाने गॅस एजन्सीची परवानगी देताना अनेक नियम व अटी सदर एजन्सीला घालून दिल्या आहेत. मग त्यात टाक्या साठविण्याचे गोडाऊन गावापासून दूर असावे, त्याच्या सुरक्षे विषयीची खातरजमा दररोज केली जावी, या खेरीज अन्य सुरक्षेविषयक नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासन धोरण आहे. मात्र गावागावात ठेवलेल्या या गॅसटाक्यांच्या सुरक्षेविषयी काय ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.गावातील वर्दळीच्या ठिकाणी या गॅसटाक्या ठेवलेल्या असल्याचे सर्रासपणे आढळून येत आहे.
मागे दोन महिन्यांपूर्वी अशाच एका किराणा दुकानाला वीजेच्या शाॅर्टसर्कीटमुळे भीषण आग लागून संपुर्ण दुकान भस्मसात झाले होते. मात्र या दुकानाच्या अगदी शेजारीच साठविण्यात आलेल्या गॅस टाक्यांना सुदैवाने आगीची झळ पोहोचली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने सहसा ग्रामीण भागात शासकीय अधिकारी कर्मचारी अपवादानेच फिरकत असतात त्याचाच फायदा तर हे वितरक घेत नसावेत ? अशाही शंका जनतेतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात प्रशासन मात्र डोळे असून आंधळ्याची भुमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.