मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी यांच्या दालनाबाहेर एका महिलेने पैसे उधळण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी समिती गठित केली असून या समितीने ११ अर्जदारांची पात्रता तपासून त्यांना संक्रमण गाळे वाटपसंबंधीचा तपशीलवार अहवाल येत्या पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश सोमवारी दिले. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील विक्रोळी कन्नमवार नगर संक्रमण शिबिरातील चाळ क्रमांक १२, १३ व १४ या चाळींमधील गाळे जुने जीर्ण व वास्तव्याकरिता धोकादायक असल्याने पुनर्विकासासाठी सदर चाळीतील गाळ्यांच्या बदल्यात इतर संक्रमण शिबिरात पर्यायी स्थलांतर देण्याच्या मागणीसाठी ११अर्जदारांनी अर्ज केला.
या अगोदर जुलै २०२०,मार्च २०२१,जून २०२१ व ऑक्टोबर २०२१ मध्ये कन्नमवार नगर विक्रोळी संक्रमण शिबिरातील जुन्या जीर्ण व धोकादायक चाळींमधील वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना संभाव्य जीवित वित्त आणि टाळण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन पुनर्रचित इमारतीत उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधिकरण यांच्या मान्यतेँने पात्र/अपात्रतेच्या अधीन राहून तात्पुरते स्थलांतरण देण्यात आले आहे. सदर परिपत्रक केवळ सद्यस्थितीत वास्तव्यास असणाऱ्या भाडेकरू/ रहिवाशांना लागू आहे. सद्यस्थितीला नमूद ११ अर्जदार हे धोकादायक व जीर्ण संक्रमण गाळ्यांमध्ये वास्तव्यास नाहीत. त्यामुळे सदर प्रकरण हे धोरणात्मक असल्याने त्याला वरिष्ठांची मान्यता आवश्यक होती. पूर्वी संक्रमण शिबिरामध्ये घुसखोरांविरूद्ध मोहिमेअंतर्गत म्हाडामार्फत कार्यवाही करून संक्रमण शिबिरातील घुसखोरांचे गाळ्यांमधून निष्कासन करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर अर्जदारांच्या अर्जाची सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे.
हे प्रकरण हे वीस वर्षांपूर्वीचे असल्याने या ११ अर्जदारांना नवीन संक्रमण शिबिर का दिले गेले नसावे याची पडताळणी होणे गरजेचे आहे. यामुळे सदर बाब धोरणात्मक असल्याने उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांच्या स्तरावर याबाबत आदेश होणे आवश्यक असल्याने सदर प्रस्ताव पाठवण्यात आला, असे म्हाडामार्फत सांगण्यात आले. ‘तक्रारदार महिला या स्वतः बाधित नसून ११ अर्जदारांनी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करणे संयुक्तिक होते. मात्र, तसे न होता ११ अर्जदारांच्यावतीने संबंधित महिलेने या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून सहमुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरण हे २० वर्षांपूर्वीचे असून सहमुख्य अधिकारी पदावर संबंधित अधिकारी हे दीड वर्षांपूर्वी रुजू झालेले आहेत. मात्र, तक्रारदार महिलेने सदर प्रकरणांबाबत चुकीच्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रकार केला आहे.
गेल्या दीड वर्षात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळामध्ये पारदर्शक व गतिमान कारभार सुरू असल्याने या कारभाराला कुठेतरी अडथळा आणण्यासाठी सदर प्रकार असू शकतो. ही समिती गठीत झाल्यामुळे याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून सदर अकरा अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर संक्रमण गाळेसंबंधी उचित निर्णय घेण्यात यावा’, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज सोमवारी दिले आहेत.