अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर संकुलात गर्दीतून उडणारे ड्रोन पाडण्यात आले आहे. अयोध्येत सोमवारी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी संध्याकाळी गेट क्रमांक ३ वर ड्रोन उडत पोहोचला. त्यावेळी ड्रोनविरोधी यंत्रणेने ड्रोन पाडला. यानंतर सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले. बॉम्ब स्क्वॉड टीमला पाचारण करण्यात आले. ड्रोनची तपासणी करण्यात आली. ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
अयोध्या पोलिसांना संशय आहे की हे चेंगराचेंगरी घडवण्याचे कट असू शकतो. कारण, राम मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास मनाई आहे. मंदिरावरून विमानांनाही उड्डाण करण्याची परवानगी नाही.अयोध्येतील कटरा चौकीचे प्रभारी सुनील कुमार यांनी रामजन्मभूमी पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. सदर एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता, राम मंदिर परिसरातील ड्युटी पॉइंट, बॅचिंग प्लांटजवळ, प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन कॅमेरा उडवताना काही अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून तो टाकला. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहता ड्रोन उडवण्यात आल्याचा संशय आहे. जेणेकरून मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊ शकते आणि जीवितहानी होऊ शकते.
Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात वाढती गर्दी! प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद
महाकुंभामुळे यावेळी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. अयोध्येतील राम मंदिर आणि परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. ड्रोन उडवण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. राम मंदिरावरून विमान उडवण्यासही परवानगी नाही. राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एसएसएफ म्हणजेच विशेष सुरक्षा दलाकडे आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी २०० सैनिक तैनात आहेत. असे असताना हा ड्रोन नेमका कुणी आणि का उडवला..? याचा पोलिस शोध घेत आहेत.