Friday, May 9, 2025

महामुंबईमनोरंजनब्रेकिंग न्यूजविडिओ

छावा : खरा इतिहास, जो कधी कुणी दाखवलाच नाही!

छावा : खरा इतिहास, जो कधी कुणी दाखवलाच नाही!

छ. संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा नक्की बघा!


मुंबई : छत्रपती संभाजी महाराज.. स्वराज्याचे धाकले धनी, ज्यांचे चरित्र हे असंख्यांना प्रेरणा देणारे आहे. 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदाच इतक्या भव्यदिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार होता. हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, तो मराठी संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक आहे. या चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण उत्तेकर यांनी हा चित्रपट तयार करून मोठं धाडस केलंय.


इतिहासावर आधारित चित्रपट बनवताना अनेकदा वाद निर्माण होतात, मात्र लक्ष्मण उत्तेकर यांनी कोणतेही वादग्रस्त मुद्दे टाळून अत्यंत चोख आणि अभ्यासपूर्ण चित्रपट तयार केलाय. विशेषतः त्यांनी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचा काळ अधिक प्रभावीपणे दाखवलाय. संभाजी महाराजांच्या ९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल १२५ लढाया जिंकल्या. पती, पिता, पुत्र आणि राजा या सर्व भूमिका त्यांनी अत्यंत जबाबदारीनं पार पाडल्या. औरंगजेबाच्या कैदेत असतानाही त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही. त्यांचे बलिदान हे अमूल्य आहे, आणि ते प्रत्येक मराठी माणसाने समजून घेतलं पाहिजे.



विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका अतिशय ताकदीनं साकारलीय. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदानानेही चांगलीच छाप पाडलीय. येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यातील आत्मीयता, प्रेम आणि आदर अगदी सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, हंबीरराव मोहिते, कवी कलश आणि इतर मराठा सरदारांचे पात्रही प्रभावीपणे साकारण्यात आलेत.


या चित्रपटातील सर्वात उल्लेखनीय भूमिका म्हणजे अक्षय खन्नानं साकारलेला औरंगजेब! अक्षय खन्नानं आपल्या अभिनयानं औरंगजेबाचा राग, निर्दयता आणि राजकारण अत्यंत प्रभावीपणे साकारलंय. त्याचा आवाज, त्याची नजर आणि त्याची चालही अंगावर शहारे आणणारी आहे.


संभाजी महाराजांबद्दल इतिहासानं अनेक अन्याय केलेत. त्यांच्याविषयी चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या गेल्या. अनाजी पंतांसारख्या लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संभाजी महाराजांनी प्रत्येक अडथळ्यावर मात करत स्वराज्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला.


'छावा' हा केवळ एक चित्रपट नाही, तर ती एक प्रेरणादायी गाथा आहे. प्रत्येक हिंदूनं आणि विशेष करुन प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट नक्की पाहायलाच हवा. चित्रपटाच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये अश्रू अनावर होतील, पण संभाजी महाराजांचे बलिदान समजून घेण्यासाठी हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

Comments
Add Comment