४९५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ : आ. किरण लहामटे
अकोले : इंग्रजांनी बांधलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत आहे.पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मनमोहक भंडारदरा धरणाचा परिसर असून पर्यटकांना आकर्षित करणारा आहे.भंडारदरा धरण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून धरण पायथ्याशी असलेल्या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे .तसेच धरण भिंत आणि स्पिल्वे परिसरात पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भंडारदरा धरण येथे पर्यटन उद्यान विकास व परिसर सुशोभीकरण करणे अंतर्गत भंडारदरा परिसराचा विकास व सुशोभिकरणं करण्यासाठी ४९५ लक्ष रुपयाच्या विकास कामांचे उदघाटन आ.डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रादेशिक पर्यटन विकास चे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यात भंडारदरा धरणासाठी दोन प्रवेशद्वार तयार करण्यात येणार आहे.धरण परिसरात अंब्रेला फॉल समोरील परिसरात मूलभूत सुविधा म्हणजे पार्किग, शौचालय, पाण्याची व्यवस्था, कॅफेटेरिया तयार करणे,अँपी थिएटर तयार करणे, गजीबो तयार करणे, सेल्फी पॉईंट, व्हीव्हिंग गॅलरी तसेच स्थानिकांसाठी स्थानिक वस्तू, उत्पादन विक्री कलाकुसर विक्रीसाठी स्टॉल करण्यात येणार आहे.तसेच पर्यटक माहिती केंद्राद्वारे स्थानिक पर्यटक मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात येणार आहे.
यामुळे स्थानिक नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होणार असून पर्यटकांना येत्या काजवा महोत्सवात पर्वणी ठरणार आहे. सदर होणाऱ्या विकास कामाबद्दल पर्यटकांनी अभिनंदन केले असून सदर विकास काम लवकर पूर्ण व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत आहे.