नवी दिल्ली: दिल्लीमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत होती. लोक भयभीत झाल्याने घराच्या बाहेर निघाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
याचे केंद्र दिल्लीच्या जवळ जमिनीपासून ५ किमी खोल होते. यामुळे याचे धक्के अधिक जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत राहिल्याने इमारतींच्या आतमध्ये जोरदार कंपन जाणवले. भूकंप सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांना आला. यामुळे लोकांची झोपच उडाली.
पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट
Tremors were felt in Delhi and nearby areas. Urging everyone to stay calm and follow safety precautions, staying alert for possible aftershocks. Authorities are keeping a close watch on the situation.
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2025
पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक पोस्ट करत लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. दिल्ली आणि जवळच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे तसेच योग्य ती सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करतो. अधिकाऱी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंग्र धौला कुआंमध्ये दुर्गाबाई कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता. जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथे एक नाला आहे. या परिसरात दर दोन ते तीन वर्षात एखादा लहान आणि कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसत असतात. २०१५मध्ये येथे ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.