प्रयागराज (वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. तेव्हापासून शनिवार,१५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिल्याचे वृत्तसंस्थेने दिले आहे.
आज १.१८ कोटी भाविकांचे पवित्र स्नान उ. प्रदेश सरकारच्या माहिती विभागानुसार, रविवार १६ फेब्रुवारीला दुपारपर्यंत १.१८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमानात पवित्र स्थान केल्याचे देखील सांगितले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती अशा पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १४४ वर्षांनी विशेष असलेल्या या महाकुंभमेळ्याला देश-विदेशातील अनेक भाविक संगमस्नानासाठी व कल्पवासासाठी प्रयागराजमध्ये दाखल हाेत आहेत.
४५ दिवसांचा महाकुंभमेळा
उ. प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा २०१३मध्ये झाला होता. त्यानंतर २०१९मध्ये अर्धकुंभमेळा झाला. तो दर ६ वर्षांनी होतो. आता तब्बल १२ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभ मेळ्यास त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी लाखो भाविक येत आहेत.