मोखाडा(वार्ताहर): तालुक्यातील गाव पाड्यांची कायमची पाणीटंचाई मिटावी यासाठी जलजीवन मिशन योजनेतून धरणापासून ते पाण्याच्या टाकीपर्यत आणि टाकीपासून प्रत्येक गावात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला कुठे गटारी खोदून तर कुठे रस्ता खोदून पाइपलाइन टाकण्यात आली आहे; परंतु हीच पाइपलाइन आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरक्षण भिंतीमुळे संकटात सापडली असून गावात पाणी पोहोचायच्या अगोदर रस्त्यातच गळती लागायला सुरुवात झाली आहे.
सध्या जिकडे नजर जाईल तिथपर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम ठेकेदाराकडून सुसाट वेगाने चालू आहे. सुरुवातीला जलजीवन मिशन योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांना डावलून कुठे रस्ता खोदून काढला, तर कुठे गटार खोदले आणि आपले पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण करुन घेतले मात्र आता चित्र उलटे व्हायला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदारांकडून खोदकाम केले जात आहे. त्या खोदकामात आसे ग्रामपंचायत हद्दीतील काही गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला गळती लागली होती. गेल्या दहा बारा दिवसांपासून जलजीवन मिशन योजनेतून पूर्ण केलेल्या पाईपलाईन द्वारे टाकीत पाणी पोहोचवणे तसेच टाकीतून प्रत्येक गावात पाणी जाते की नाही याची टेस्टींग सुरू आहे. या टेस्टींगमधून काही गाव पाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्याची चौकशी केली असता पाणी गळती होण्याचे प्रमुख कारण रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत बांधकामासाठी केलेले खोदकाम आहे, असे निदर्शनास आले. त्यामुळे गळती थांबण्यासाठी जलजीवन मिशनच्या कामगारांनी दुरुस्ती करुन पाईपलाईन पूर्ववत केली आहे; परंतु हा पाणी गळतीचा प्रकार इतरही ठिकाणी चालू आहे.
यामुळे गेली कित्येक दशक पाणीटंचाईमुळे व्याकुळ झालेल्या ग्रामीण भागातील जनतेला उशिरा का होईना पिण्यास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र संरक्षण भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारामुळे जल जीवन मिशनची पाइपलाइन संकटात सापडण्याची शक्यता ग्रामीण भागात तयार झाली आहे.