Friday, March 28, 2025
Homeमहत्वाची बातमीखोटे बोलून, खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे - देवेंद्र फडणवीस

खोटे बोलून, खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे – देवेंद्र फडणवीस

नागपूर: खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लव्ह जिहाद’ कायद्याचे रविवारी समर्थन केले. नागपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी लव्ह जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचा मानस व्यक्त केला. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात ही घोषणा करण्यात आली असून समितीचे सदस्य कोण असतील, त्याची कार्यपद्धती कशी असेल? याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. याबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आली आहे.

केरळ उच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काही नाही. पण खोटे बोलून, खोटी ओळख तयार करून, फसवणूक करून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे, ही प्रवृत्ती समाजात पसरत आहे. जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे योग्य नाही. त्यामुळे यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल ती राज्य सरकारकडून केली जाईल.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही आता लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी सरकारने राज्य पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. ही समिती लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर थांबवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना सुचवणार आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आलंय. इतर अनेक राज्यांमध्येही राज्य सरकारांनी कथित लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर थांबवण्यासाठी पावले उचललीत आणि आता महाराष्ट्रदेखील यात सामील होणार आहे.

जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी समिती उपाय योजणार

लव्ह जिहाद हा शब्द अनेकदा उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि संघटना वापरतात, असा आरोप बऱ्याचदा केला जातो. मुस्लीम पुरुषांकडून हिंदू मुली किंवा महिलांशी लग्न करून त्यांना इस्लाम धर्मात रूपांतरित करणे म्हणजेच लव्ह जिहाद असल्याचे बोलले जाते.

महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये महाराष्ट्राचे डीजीपी, महिला आणि बाल कल्याण विभाग, अल्पसंख्याक विभाग, कायदा आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे उपसचिव यांचा समावेश आहे. राज्य सरकारने शुक्रवारी या संदर्भात आदेश जारी केलेत. आदेशात म्हटले आहे की, अभ्यासानंतर समिती लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मातर करण्याच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी कोणते उपाय योजता येतील हे सांगणार आहे. ही समिती इतर राज्यांमधील यासंबंधीच्या कायद्यांचाही अभ्यास करणार असून, धर्मातर थांबवण्यासाठी तरतुदीदेखील सुचवेल आणि त्याच्या कायदेशीर पैलूंची सुद्धा चाचपणी केली जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -