साईभक्तांच्या फसवणुकीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : साईभक्तांची लुटमार थांबणार का?
शिर्डी : देशातील नंबर दोन श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी शहरात पूजा साहित्याच्या नावाखाली जादा पैसे घेऊन लुटण्याचा प्रकार घडला असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली.
दरम्यान याबाबत माहिती अशी की, युनायटेड किंग्डम येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्त परिवाराची शिर्डीत फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली.
पूजा साहित्याच्या नावाखाली तब्बल चार हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार युनायटेड किंगडम (यु.के)येथील बलदेव राम, वय ७३, या भाविकाने शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे.मूळ जालंधर,पंजाब येथील आणि व्यवसाय निमित्ताने युनायटेड किंगडम येथे स्थायिक असलेले साईभक्त बलदेव राम हे आपल्या कुटुंबासह सोमवारी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.मंदिरात दर्शनासाठी जात असतांना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलीशी एजंटने हारफुल, प्रसाद दुकानावर घेवून जात बळजबरीने ५०० रुपये किमतीचे पुजाचे साहित्य ४ हजार रुपयांना दिले. तक्रारदार बलदेव राम मेन या भाविकाची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री माळी यांनी स्वतः भाविकांना घेवून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे योगेश मेहेत्रे,रा.सावळी वीहीर ता.राहाता, अरुण रघुनाथ त्रिभुवन, प्रदीप राजेंद्र त्रिभुवन रा. लक्ष्मीनगर,शिर्डी, ता.राहाता, सुरज लक्ष्मण नरवडे पत्ता माहित नाही यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुरनं १६७/ २०२५ भारतीय न्याय संहिता ३१८(४),१२६(२), ३ (५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.यात फुल भांडार दुकान जागा मालक, चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे.पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. शिर्डीला साईभक्तांना लुटण्याच्या घटनाच्या सत्र सुरुच असल्याने यापुढे आता मुळ जागा मालक देखिल आरोपी केले जाणार आहे. अगदी लहान दुकान तीन ते चार हजार रुपये रोजाने भाड्याने दिली जातात. यामुळे भाविकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी आता यात कठोर कारवाई आदेश दिले आहेत. तसेच शिर्डीतील फुल भांडार दुकानांवर पुजा साहित्याचे दर पत्रक लावण्यासाठी बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे.
शिर्डीत गेल्या काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी शिर्डी ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासन एक्शन मोडवर आले असून युवानेते डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.या घटनेनंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे आयोजन केले.या ग्रामसभेत पोलिस प्रशासन आणि फूल प्रसाद विक्री दुकानांतून साईभक्तांची लूट करणाऱ्या बाहेरील प्रवृत्तींचा बिमोड व्हावा तसेच काहींनी पॉलिश करणारे बंदच करावे अशी भूमिका मांडली तर पोलिसांनी ज्या दुकानावर लूट होईल त्या दुकानाच्या मालकावर थेट गुन्हा दाखल व्हावा असा अनेकांनी प्रस्ताव मांडला होता. यानंतर साई भक्तांची लूट थांबेल अशी अपेक्षा असताना काही दिवस उलटत नाही तोच शिर्डीतील एका फूल भांडार वर युनाईटेड किंगडम मधील भाविकांची शिर्डीत फसवणूक झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.