Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीभाडेवाढीनंतरही एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला! पीएफ काढता येईना!

भाडेवाढीनंतरही एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला! पीएफ काढता येईना!

मुंबई : एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून सुमारे ३२००-३५०० कोटी रुपयांची देणी थकली आहेत. प्रशासनाने तीन आठवड्यांपूर्वी १४.९५ टक्के दरवाढ करूनही उत्पन्नात दररोज केवळ दोन कोटी रुपयांची वाढ झाली असून प्रवासी गळतीला सुरुवात झाली आहे. एसटीपेक्षा खासगी बसगाड्यांचे तिकीट कमी असल्याने लाखभराहून अधिक प्रवासी कमी झाले आहेत. एसटीकडे निधीच नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी, आयुर्विमा महामंडळाच्या विम्याचे हप्ते कापूनही ही रक्कम भरण्यात आलेली नाही आणि उपदान (ग्रॅच्युईटी), कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देण्यांसह डिझेल खरेदीची बिलेही थकली आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात एसटीला भरीव मदत मिळाली, तरच परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

पीएफ काढता येईना! ऑक्टोबर महिन्यापासून प्रशासनाने थकवला कर्मचाऱ्यांचा पीएफ भरणा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात १५ टक्के भाडेवाढ करत ही भाडेवाढ गरजेचे असल्याचे म्हटले आहे. सरकार नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रीत करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, तरीही एसटी महामंडळाची परिस्थिती बिकट असल्याने चक्क एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसेच महामंडळाने गेल्या ४ महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले आहे.

बळीराजाचे हित हेच आमचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री

मुलीच्या लग्नासाठी, नवीन घर विकत घ्यायचे असेल किंवा नवे घर बांधायचे असल्यास पीएफचे पैसे काढता येतात. मात्र, एस.टी.कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाच्या रकमेतून रक्कम काढायची असेल तर ती सध्या काढता येत नाही. कारण, एस.टी. महामंडळाकडे निधीचा तुटवडा असल्याने प्रॉव्हीडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमलेले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून हे हप्ते थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागत आहे, असे एसटी महामंडळाचे अधिकारी सांगतात.

सध्या तोट्यात असलेल्या महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील रक्कम भरण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने निधी दिलेला नाही. विशेष म्हणजे जे कर्मचारी सेवानिवृत होत आहेत, त्यांचा फंड मात्र एक महिन्याच्या आत दिला जात आहे. परंतु, जे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, त्यांना विविध कारणांसाठी आपल्या फंडातील रक्कम काढायची असल्यास त्यांना वेट अँड वॉच अशी भूमिका महामंडळाचे आहे. त्यामुळे, एसटीच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगी सहन करावी लागत आहे. आमच्या मागण्यांकडे शासन किंवा महामंडळातील अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल यानिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान, एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पीएफ हप्त्यासाठी महिन्याला ४८० ते ४९० कोटी रुपयांच्या निधीची गरज असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -