बदलापूर (वार्ताहर) : बदलापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत देत भाजपाची एकहाती सत्ता आणणार असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. तसेच बदलापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार किसन कथोरे विरूद्ध शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी असे चित्र निर्माण झाले होते. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सुरूवातीला थेट विरोध करत नंतर प्रचारातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, माजी नगरसेवकांची कोंडी झाली होती. शहरप्रमुखाच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा की महायुतीचा धर्म पाळायचा अशा संभ्रमात ते होते. त्यातच भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही प्रचारातून अंग काढल्याने किसन कथोरे एकटे लढत असल्याचे चित्र होते. त्यांच्या मदतीला ऐनवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले.
शिंदे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांना थेट फोन करून आमदार कथोरे यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवारांच्या सभा घेण्याऐवजी आमदार कथोरे यांच्यासाठी बदलापुरात सभा घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्यासाठी काम केले. मात्र या सर्व प्रकारात कथोरे दुखावले होते. त्यांनी विजयाला काही तास उलटत नाही तोच आपल्या पहिल्याच भाषणाच सर्व विरोधकांना निर्वाणीचा इशारा दिला होता. माजी लोकांना पुन्हा आजी होऊ देणार नाही, असेही कथोरे त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर बदलापूर शहरात कथोरे विरूद्ध वामन म्हात्रे यांच्यात शाब्दीक चकमकी होतच होत्या. आता कथोरे यांनी पुन्हा पालिका निवडणुकांमध्ये भाजपा एकहाती सत्ता स्थापन करू शकते असा दावा केला आहे.
बदलापूर पालिकेसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा
