Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीराजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

नवी दिल्ली: यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून नवी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणार आहे. या संमेलनात दि. २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत कवी संमेलन ,मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ताल कटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८ वे साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेतीनला विज्ञान भवनात आयोजित होणाऱ्या उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.

पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

सभामंडपांची नावे

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भातररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले अशा महापुरुषांच्या नावे सभामंडप असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छुक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याची माहिती श्री नहार यांनी दिली.

शनिवारी २२ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, ‘मनमोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार’, विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि सायंकाळी ‘मधुरव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे.

याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य’, ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले सभा मंडप येथे कवी कट्टा आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी शेवटच्या दिवशी २३ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ आदी कार्यक्रम आहेत. यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयावर परिसंवाद आहेत. सायंकाळी ‘खुले अधिवेशन व समारोप’ असे सत्र असणार आहे.

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे

१९ फेब्रुवारीला पुणे येथून विशेष रेल्वे दिल्लीसाठी येणार असून या रेल्वेमध्ये देखील साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री रवींद्र सामंत असणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -