माेरपीस : पूजा काळे
निसर्गात वसंत ऋतूच्या खुणा दिसू लागल्या की, भावनाही ऊतू
जातात. फुलात फुलं होऊन
जगण्याचा मंत्र विविध अंगाने भरलेला ऋतू वसंतच देऊ शकतो.
“ नई ऋत बसंत बनबन छाई
डार डार पर फुल सजाई
चहु दिश कोयल बनबन बोले
झुम रही वेलीसंग डोले
नव पल्लव नव कुसुम सजाई”
हिंदी रचनेमधल्या दुर्गा रागातील शब्दरूपी कळ्या लाभलेलं हे सुंदरस गीत आपणास वसंत बहाल करतं. तर, दुसरीकडे मराठी भावगीतातल्या “धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना”. या नादमधुर पंक्ती ऋतू वसंताच्या आगमनाची नांदी देतात. पिकलं पान गळून पडताना, आयुष्यभराचं संचित घेऊन जातात. देठाकडून देठाकडचा हा प्रवास, झेललेले उन्हाळे, सोसलेले पावसाळे आणि हिवाळ्यात फिका पडत चाललेला पानाचा जर्द रंग कालमर्यादेची जाणीव करून देतो. फांद्यीवर आलेला वैभवरूपी कोब नवपर्णी फुटून, पिकल्या पानासहित गळून पडण्याचा, फांदीतून अलिप्त होण्याचा हा नैसर्गिक प्रवाह. निसर्ग आपल्याजवळ काही ठेवत नाही म्हणतात, ते हेचं असावं. एकेक पान गळताना मातीकडून मातीकडचा हा अनोखा टप्पा म्हणजे येऊ घातलेल्या सृजनाला जगण्यासाठी दिलेला हात. पानगळतीनंतर येणारा नवांकुर, पानफुटीचा काळ हा निसर्गाच्या गर्भारपणाचा काळ. नव्या कोंबाच्या वाढीसाठी जमिनीतली पोषक द्रव्य कारणीभूत ठरतात तेव्हा शिशिर ऋतूच्या कळांना सुसह्य करणाऱ्या वसंताच्या उदरात निसर्गरूपाने संपदा वाढीस लागते. अलवार कूस बदलताना, हवेची मागणी जोर धरू लागते. जसे आकाशातल्या निरभ्र सफेद ढगाने विठुरायाच्या सावळ्या रंगात स्वतःला रंगून घ्यावे, साऱ्या आसमंतावर कृपादृष्टी टाकत धरतीवर अमृतधारांची उधळण करावी, अगदी तसे…
शब्दश्री अरुण गांगल आपल्या कवनात सृष्टीच्या मनोहारी रूपाचं वर्णन करताना म्हणतात, श्रीराम ब्रह्मतत्त्व असे चराचरांत, आनंद कंद ऊठे दंग रामनामात. म्हणजे ईश्वरीय वरदान लाभलेल्या या सृष्टीत आनंदाचा परिमळ हा केवळ आणि केवळ रामनामाच्या उच्चारात दडलायं. केवढं मोठं हे वासंतिक रूप. या रूपाला साजेशी अवनीवर सौंदर्यस्थळ आढळतात. पहाटे
गुंजतो कुंजनाचा स्वर,
धरणी भाळते वेली वृक्षांवर |
प्रभात उगवते, सोनं किरणांच्या जाळी.
साऱ्या सृष्टीसी आनंद,
हळदी कुंकवाच्या भाळी |
तेज पसरते निळ्या नभांगणी,
मोद प्रसवितो ऋतू अंगणी |
उत्तम आशावादाचे जिवंत प्रतीक असलेल्या वसंत ऋतूची सुरुवात पानगळतीपासून होते. पानगळ म्हणजे निराशा, कटू आठवणींचा ठेवा. म्हटलं तर भार. तो विरताना आशावादी विचारांची नवी रोपटी फुलवायची, नवचैतन्याने भारलेल्या बागांची लागवड करायची. त्यामध्ये स्नेहाचं पाणी आणि मायेचं खत मिसळवायचं आणि इतरांना आनंद द्यायचा. हा भाव सृष्टीचा देखील आहे, झाडांना नवपर्णी फुटताचं, विविध रंगीत फुलांनी निसर्ग सजू लागतो आणि वसंत भुलवू लागतो. शिशिर ऋतूच्या आधीचं वसंताची हाक ऐकू येते. रानीवनी शिळ घुमते. पिवळ्या फुलांनी डवरत नव्या नवरीसारखा सजून आलेला ऋतुराज निसर्गाची अद्भुत लीलया दाखवतो. त्याच्या येण्याने पानं, फुलं, पशू, पक्षी आणि माणसंही प्रफुल्लित होतात. फेब्रुवारी, मार्च महिन्यात फुलणाऱ्या तीन पानांच्या पळसाला जानेवारीत बहरण्याची काय हौस असते, है तो, वसंतच जाणे! सर्वत्र कौमुदी कुसुमांच साम्राज्य पसरतं. विविध पुष्पांनी, रंगबिरंगी पाखरांनी सृष्टीला वैभव प्राप्त होतं.
नवरंगी फुलं, प्रभातीच्या गाली,
तिट लावती रविकिरणांची लाली |
मनी मानसी होई हर्ष,
होतो दवबिंदूचा पाकळ्यांस
नाजूक स्पर्श |
सृष्टीला आंदण मिळालेली वृक्षसंपदा बहरते. मोहक कळ्या-पाकळ्यांचा ताजा-टवटवीत नजराणा तयार होत, ता, ना, पी, हि, नि, पा, जा सारखे रंग सृष्टीवर अवतरतात. कुसुमांच्या राज्यात, भ्रमर गुंजनात, वृक्ष-वेलींचे वर्षभरातले श्रम सरतात. मधुमास येण्याचा, नव्या आशा पल्लवीत होण्याचा हा काळ. हिरव्या, तांबूस पिवळ्या, जांभळ्या पालवीच्या लुसलुशीत तारुणात हिरवी कंच धरा मोहरून उठते. नवपर्णी नंतर इवल्या कळ्या वेलीवर जन्म घेऊ लागतात. मोगरा धुंद करतो, गुलाब लालबुंद पाकळ्यात भिजतो. अष्टर वारा झेलतो तर शेवंती लाजूनबुजून पिवळी होते. गंधाळलेला केवडा अधिक उठावदार होतो. या फुलांच्या साजाची वेणी, गजरा सवाशिणीच्या डोक्यात घट्ट मावतो.
जेव्हा शांत संयमित नील
नभात जन्मतो ऋतू,
तेव्हा प्रसन्न हसरी सकाळ
करून सोडतो ऋतू.
गुलाबी थंडीच्या मादक खुणा अस्त पावताना, आतल्या अंगाने आलेल्या शीतलहरी थोड्याशा उष्णतेलाही घेऊन येतात. वसंतदूत असलेला मोहरूपी आंबा जीवन फुलण्याचा संदेश घेऊन येतो. चांदण रात्रीसाठी झेपावलेल्या सांजवेळा, शीतल वाऱ्यासंगे स्तुतिसुमनांची उधळण करत येतात. प्रेमरसाचा उन्माद वाढवणारं आल्हाददायक वातावरण, एकूणचं अवनीवर सुखसमृद्धीचा भोंडला घुमू लागतो.
हिरवीकंच नाजूक पाने, मखमली केवडा गंध.
हसरा मोगरा दारी फुलता,
पारिजात करी बेधुंद |
मधुमास मिलन येता,
आनंदे तन मन गहिवरले,
हिरव्या पिवळ्या जादूसंगे,
रुणझुण पायी पैंजण वाजले |
एव्हाना निसर्गासोबत हृदयातल्या वसंतालाही जाग येऊ लागलेली असते. मनोमनी वसणाऱ्या वसंताची भाषा ऋतू वसंताला काय सांगावी? ज्याचं मूळ वसंत आहे, त्याचं जगणही वसंत होऊन जातं आणि आतूर असलेल्या प्रेमीयुगुलांच्या भेटीसाठी, फेब्रुवारी महिन्याचं देखील सोनं होऊन जातं.