कथा – रमेश तांबे
मी आठवीत शिकत होतो. त्यावेळी त्या परिसरात आमची शाळा कडक शिस्तीची म्हणून नावाजलेली होती. मी महानगरपालिकेच्या शाळेतून सातवी पास होऊन त्या शाळेत प्रवेश घेतला होता. शाळा, तिचा परिसर, शाळेतली मुलं, शिक्षक, ते शिस्तीचे वातावरण पाहून मी पार बुजून गेलो होतो. पुढेही या नव्या वातावरणाशी मला कधीच जुळवून घेता आलं नाही.
शाळा कितीही कडक शिस्तीची असली तरी प्रत्येक वर्गात काही टवाळ, मस्तीखोर विद्यार्थी असतातच. तसाच उनाड, साऱ्या वर्गाने ओवाळून टाकलेला एक मुलगा होता. महाजन नावाचा! त्यात माझं दुर्दैव असं की, तो नेमका माझ्या पाठीमागे बसायचा. मग काय तो रोज माझ्या कुरापती काढायचा. कधी वह्या-पुस्तकं पळवं, कधी शिक्षक शिकवत असताना टपल्या मार, तर कधी चिमटे काढ असे प्रकार तो नेहमीच करायचा. मी पुढे आणि तो मागे असल्याने मला मागे वळून पाहणेदेखील शक्य होत नसे. त्याच्या या कारवायांमुळे मी तर अगदी त्रस्त झालो होतो. त्याला किती वेळा विनंती केली, वर्गप्रमुखाला सांगितले पण काहीच फरक पडत नव्हता. शिवाय बसण्याची जागा बदलून घ्यावी तर तेही शक्य नव्हते.
त्या उनाड वर्गमित्राशी दोन हात करणं मला शक्य नव्हतं. कारण एक तर मी लाजरा-बुजरा, तब्येतीने किरकोळ, शिवाय नुकताच महापालिकेच्या शाळेतून आलेला नवखा विद्यार्थी होतो. या साऱ्या गोष्टींचा गैरफायदा घेत त्याने नुसता उच्छाद मांडला होता. अनेकवेळा माझा राग-संताप अनावर होत होता. अखेरीस तो दिवस उजाडला. त्या दिवसापासून मी माझा आत्मविश्वास पूर्ण गमावून बसलो.
त्याचं असं झालं. पाटील सर गणित शिकवत होते. किरकोळ शरीरयष्टीचे पाटील सर तसे शांत, प्रेमळ स्वभावाचे. कधी कोणाला मारणं नाही की साधं ओरडणंही नाही. तास सुरू होऊन पंधरा-वीस मिनिटे झाले असतील. महाजनच्या उनाडक्या सुरू झाल्या होत्या. कधी हळूच चिमटा काढ, तर कधी टपली मार! असे प्रकार होऊ लागले. खरं तर शाळेत एवढी कडक शिस्त होती की, आपला बेंच सोडून दुसरीकडे बसायचं नाही, त्यामुळे महाजनचा त्रास निमूूटपणे सहन करण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय नव्हता. आता तो मला पेन्सिलने टोचू लागला. मी तरी किती वेळ सहन करणार! माझ्या रागाचा पारा भलताच वाढला. मी मागे वळून त्याच्या हातातली पेन्सिल घेतली आणि दिली फेकून. मला काहीच कळलं नाही. पण ती फेकलेली पेन्सिल थेट पाटील सरांच्या नाकावर आदळली. हाय रे देवा! माझ्यासारखा अभागी मीच! एका संकटातून सुटका करून घेण्यासाठी मी दुसऱ्या संकटाला आमंत्रण दिलं होतं.
या अनपेक्षित हल्ल्याने सर चांगलेच हादरले. त्यांनी मला उभे केले आणि विचारले, “का मारलीस मला पेन्सिल फेकून? माझ्या डोळ्यांना लागली असती तर!” मी म्हणालो, “सर हा महाजन मघापासून पेन्सिलने मला टोचत होता. म्हणून मी रागात ती पेन्सिल फेकून दिली. पण ती चुकून तुम्हाला लागली.” मी मनातून चांगलाच घाबरलो होतो. त्यांनी महाजनला आणि मला पुढे बोलवले आणि दोन सणसणीत आवाज कानाखाली काढले आणि म्हणाले, “त्याने पेन्सिल टोचली, तर त्याला मारायची? मला का फेकून मारली!” पण या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. आणखीन दोन चापटी दोघांच्या पाठीवर बसल्या आणि शाळा संपेपर्यंत अंगठे पकडून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा आम्हाला पाटील सरांनी दिली. माझ्या डोळ्यांत पाणी तराळले. आपण सरांना पेन्सिल फेकून मारली याची मलाच लाज वाटू लागली. पण महाजन मात्र माझ्याकडे बघून हसत होता. तसा तो फक्त दहाच मिनिटेच ओणवा उभा राहिला आणि मी मात्र शाळा संपेपर्यंत!
तेवढ्या वेळात महाजनने धक्के मारून मला चार-पाच वेळा खालीदेखील पाडले. सर जाताच महाजन वर्गातसुद्धा गेला. मी मात्र तिथेच अंगठे पकडून स्वतःच्या नशिबाला दोष देत उभा होतो. शाळा संपेपर्यंत! आज इतक्या वर्षांनंतरही ही
नकोशी आठवण मला जशीच्या तशी आठवते, अगदी काल घडल्याप्रमाणे!