श्रीनिवास बेलसरे
निर्माते-दिग्दर्शक मोहन कुमार यांनी राजेश खन्ना आणि स्मिता पाटीलला घेऊन काढलेला ‘अमृत’(१९८६) बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चित्रपट अनेक ठिकाणी सिल्व्हर ज्युबिली झाला. त्याचा ‘आत्मा बंधूवुलू’ नावाने तेलुगू रिमेकही निघाला. ‘अमृत’मध्ये काकाजीबरोबर अरुणा इराणी, शफी इनामदार, झरिना वहाब, सतीश शहा, मुक्री, पल्लवी जोशी आणि राजेश पुरीही होते. ‘शराफत अलीको शराफतने मारा’ ही महेंद्रकपूर, कविता कृष्णमूर्ती, महंमद अझीज आणि जसपाल सिंग यांनी तबियतने गायलेली आनंद बक्षीजींची कव्वाली होती. त्यावेळचा अरुणा इराणी, शफी इनामदार, सतीश शहा, मुक्री आणि खुद्द काकाजीचा अभिनय पाहण्यासारखा होता. शिवाय काकाजीसाठी किशोरकुमारने गायलेले ‘जिंदगी क्या हैं, एक लतीफा हैं.’ हे गाणेही ऐकण्यासारखे होते. व्ही. के. शर्मांची कथा गेल्या काही वर्षांत उग्र रूप धारण केलेल्या एका जुन्याच कौटुंबिक समस्येबाबतची होती. शेक्सपियरने जगप्रसिद्ध ‘किंग लियर’ या नाटकात मांडलेली ती सार्वकालिक समस्या म्हणजे कृतघ्न अपत्यांनी केलेला ज्येष्ठांचा छळ! अमृत (राजेश खन्ना) त्याच्या एकुलत्या एक मुलाकडे राहत असतो आणि कमला (स्मिता पाटील) तिच्या मुलाकडे. दोघेही मुलांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक मुकाट सहन करत असतात.
दोघांवर आलेल्या प्रसंगी ते एकमेकांना मदत करतात. त्यातून त्यांच्यात स्नेहाचे नाते तयार होते. जीवनात पूर्ण निराश झालेले दोघे एकमेकांना दिलासा शोधतात. त्यात स्मिताला क्षयाची बाधा होते. तेव्हा राजेश तिला मनापासून मदत करतो. मिळेल ती कामे करून मिळणाऱ्या मजुरीतून स्मिताला टीबीवरची औषधे पुरवतो. एकदा तो मोठी हातगाडी ओढत रस्त्याने जात असताना जवळून जाणाऱ्या एका फकिराच्या तोंडी दिग्दर्शकांनी सुंदर गाणे दिले होते. एकाच वेळी कोट्यवधी लोकांची नजरबंदी करणारी दूरचित्रवाणी नावाची चेटकीण आलेली नव्हती. त्यावेळी बहुतेक गाणी रेडिओमुळे श्रोत्यांची पाठच झालेली असायची. पण दूरचित्रवाणीमुळे रसिकांचा गाण्याशी संबंध कमी झाला. सर्वांनाच लहान मुलांसारखी ‘मुव्हिंग ऑबजेक्टस’ एकटक पाहत बसण्याची चटक लागली! त्यामुळे लक्ष्मी-प्यारेंच्या संगीत दिग्दर्शनात महंमद अझीज यांनी गायलेले ते आनंद बक्षीजींचे शब्द अनेकांना आठवणारही नाहीत. पण मुद्दाम युट्युबवर जाऊन ऐकावे असे ते गाणे होते –
‘दुनियामें कितना गम हैं,
मेरा गम कितना कम हैं’
किती वेगळा विचार! बक्षीसाहेबांनी चित्रपटातील प्रसंगासाठी लिहिलेले ते गाणे खरे तर कुणालाही, कधीही उपयोगी पडणारा एक ‘दु:ख निवारक मंत्र’च आहे. कारण गाण्याच्या पुढच्याच ओळी येतात –
‘लोगोंका गम देखा तो,
मैं अपना गम भूल गया…’
जेव्हा माणसाच्या जीवनात एखादी मोठी आपत्ती येते, जीवलग व्यक्तीचा मृत्यू किंवा प्रेमभंग होतो, नोकरी जाते, अपघातातून विकलांगता येते असे काहीही झाले तर आपल्याला आपले दु:ख जगातले सर्वांत मोठे दु:ख वाटू लागते. ते अगदी स्वाभाविकही आहे. पण जेव्हा त्यावर उपाय करणे शक्यच नसते तेव्हा मात्र माणसाला जीवनाशी काहीतरी तडजोड करावी लागते. जगण्याचा काहीतरी फॉर्म्युला शोधून काढावा लागतो. आनंद बक्षीजींनी प्रेक्षकांसाठी तेच केले. त्यांनी या गाण्यातून दिलेला संदेश होता ‘इतरांकडे बघा. त्यांची दु:खे बघा.’ मग तुम्हाला आपोआप आपले दु:ख लहान वाटेल, किमान सह्य तरी वाटेल!
‘कोई एक हजारों में,
शायदही खुश होता हैं.
कोई किसी को रोता हैं,
घरघर में ये मातम हैं,
मेरा गम कितना कम हैं…’
या जगात कुणीच पूर्णत: सुखी नाही. आपल्याला बाहेरून कुणी कितीही श्रीमंत वाटले, सुंदर वाटले, सुदृढ वाटले तरी त्यालाही काहीतरी दु:ख असतेच; परंतु दु:खाच्या क्षणी मात्र सर्वांना आपलेच दु:ख मोठे वाटत असते.
बक्षीसाहेब जीवनातील विदारकता मांडतानाच त्याचे सकारात्मक स्वरूपही लक्षात आणून देतात. जीवन एकसुरी असेल तर कसलाच आनंद अनुभवता येणार नाही. दु:ख येऊन गेले तरच आनंदाच्या क्षणाची अपूर्वाई असते. जीवन हा या दोन्ही अवस्थांचा सुंदर संगम आहे ही गोष्ट ते कशी सहज गळी उतरवतात, पाहा –
इसका हैं रंग रूप यही,
इसको जीवन कहते हैं.
कभी हँसी आ जाती हैं,
कभी ये आँसु बहते हैं.
दुःख–सुख का ये संगम हैं,
मेरा गम कितना कम…
आपण सहानुभूतीने पाहू शकलो तर अवतीभोवतीच्या प्रत्येकाकडे वेदना आहेत, अश्रू आहेत, संताप आहे. जग हीच एक आतून दुखावलेली वस्ती आहे. माझे व्यक्तिगत दु:ख तसे नगण्यच नाही का?
सबके दिल में शोले हैं,
सबकी आँख में पानी हैं.
जिसको देखो उसके पास,
एक दुःखभरी कहानी हैं.
दुखिया सारा आलम हैं.
मेरा गम कितना कम हैं…
बक्षीजी आपल्याला जीवनाकडे अधिक तटस्थपणे पाहायला उद्युक्त करताना म्हणतात, हे जगणे म्हणजे केवळ ‘चार दिनकी चांदनी’! आयुष्य हा चार दिवसांचा आनंदमेळा! तो टिकणारा नाहीच. येताना जसा माणूस एकटा येतो, जाताना एकटाच जातो तसा तो जगतानाही आतून एकटाच नसतो का? कुणी समदु:खी भेटल्यावर क्षणभर बरे वाटते पण ती सोबतही कुठे शाश्वत असते? समर्थांनी म्हटले तसे, ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.’ हीच जगाची रीत!
‘चार दिनोंकी खुशिया हैं,
चार दिनों के मेले हैं,
मैं अपनी क्या बात करू
सारे लोग अकेले हैं
कौन किसीका हमदम हैं
मेरा गम कितना कम हैं.’
आज कुणी प्रेमाचा माणूस भेटला तरी त्याची उद्याची खात्री देता येत नाही. नाते जवळचे असो की दूरचे, उत्कट प्रेमातही अंतर पडतेच. जगाची रीतच आहे की, ‘जनरीत जनरीत’ म्हणून जी टिकाऊ वाटते तीसुद्धा पुढे बदलतेच. निसर्गाचे ऋतू कालबद्धपणे बदलतात तसेच हे! कसले दु:ख करायचे आणि कसला आनंद साजरा करायचा! एकदा जीवनाचे सत्य कळले की, मला माझे दु:ख सहन करणे सोपे होईल.
‘अपनों की, बैगानों की
प्रीत बदलती रहती देखी हैं.
इस बैरी से जमाने की,
रीत बदलती हैं.
ये दुनिया एक मौसम हैं,
मेरा गम कितना कम हैं.’
सिनेगीते म्हणजे प्रेम यशस्वी झाल्यावर ते साजरे करणारी प्रेमगीते किंवा विरहात टाकलेले उसासे असे जेव्हा नव्हते आणि मुळात चिंतनशील असलेले कवी जाताजाता गाण्याच्या ३ मिनिटांतसुद्धा काहीतरी सघन संदेश देऊन जात असत तेव्हाची ही गाणी! ऐकावीत कधीकधी.