बाल कवितेतून भाषेचा आनंद

  41

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


वाचकहो, गेल्या आठवड्यातील लेखात प्रामुख्याने गिरणगावातील मराठी नाटकाच्या अनुषंगाने आपला संवाद झाला. आज भाषा शिक्षणाच्या संदर्भात बोलू या.


शालेय वयात मूळ भाषेच्या आधारेच अन्य विषय शिकतात आणि म्हणूनच मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असायला हवे. शिकण्यातला आनंद हरवू नये याची काळजी घेणे हे मोठ्यांचे कर्तव्य आहे. मुळात लहानपणापासून पालक गणित, विज्ञान या विषयांचे ओझे वाहतात आणि तेच हळूहळू मुलांवर लादतात. बालवयात मुलांना भाषा शिकण्यातला आनंद घेऊ देणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.


मराठीतील समृद्ध बाल कविता म्हटलं की, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ही नावे सहज आठवतात. त्यांनी विपुल बालकविता लिहिल्या आहेत. विंदानी आपण बालकविता कसे लिहू लागलो, हे एका मुलाखतीत सांगितल्याचे स्मरते.
त्यांचा मुलगा अंधाराला खूप घाबरत असे. विंदानी त्याच्याकरिता कविता लिहायला सुरुवात केली. त्याला अशी सवय लागली की, तो भीती वाटली की, घडाघडा कविता म्हणत असे. भीती संपेपर्यंत तो बाल कविता म्हणतच राहायचा. पुढे मुलगा हळूहळू या भीतीतून बाहेर आला पण विंदांच्या बालकविता मात्र सुरूच राहिल्या.


एका माकडाने काढले दुकान
आली गिऱ्हाईके छान छान
किंवा
अ ब ब ब केवढा फणस आई
आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोठे नाही
किंवा
एक परी तिचे नाव उनी
लागते तिला उन्हाची फणी
अशा नानाविध बाल कविता विंदानी लिहिल्या आहेत.
त्यातल्या काही कवितांची गाणीही झाली आहेत.
मंगेश पाडगावकरांची ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ हे गाणे गुणगुणत किती मुले लहानाची मोठी झाली. अभ्यासाचा ताण मुलांना खूप त्रास देतो. नि ही छोटी-छोटी मुले म्हणतात,
आई गणित नको, आकडे लागले चुकू
दोन नि दोन पाच, डोकं लागलं दुखू
आई पाढे नको , डोळ्यात येतं पाणी
तू नुसतीच शिकव, छान छान गाणी
मला आठवते माझ्या मुलीची शाळा सकाळी ७ वाजता सुरू झाली, तेव्हापासून तिला उठवून डब्यासह नि दप्तरासह शाळेत पाठवणे हा उद्योग करताना दमछाक व्हायची. मग सुट्टीकडे डोळे लावून बसायची ती. अनंत भावे यांचा एक छोटा बालगीतसंग्रह ‘सुट्टी’ याच विषयावर आहे.
अशी सुट्टी सुरेख बाई ,
पंख फडफडत उडून जाते
माझ्यापाशी आठवणींची
रंगबिरंगी पिसे ठेवते
सुट्टी येते तशी लगेच जातेही. मुले मग पुन्हा तिची वाट पाहत राहतात.
भावे सरांची ‘पटपटपूर’, गरगरा, सांगा सांगा ढगोजीबाप्पा अशी विविध कवितांची पुस्तके आहेत. माझ्या प्रिय विजया वाड बाईंनी खूप छान बालकविता तर लिहिल्याच आहेत पण मुलांसाठी कवितांचे कोशही संपादित केले आहेत.
कासव चाले हळू,
त्याच्या पायाला झाले गळू
किंवा
माझी खार, माझी खार
झुला फांदीचा करते
अशा दीर्घ बालकविता वेगळाच आनंद देऊन जातात.
तर एकूण बालकविता मुलांनाच का मोठ्यांनाही उदंड आनंद देतात.
ही आनंद घेण्याची कला मात्र सर्वांनाच जमली पाहिजे.

Comments
Add Comment

मराठी संस्कृतीला नव्या मराठी मालिकांचा फास?

मंदार चोरगे भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना भारतात टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे.

संस्कृती आणि स्त्रीगीते

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर सभोवताली पसरलेल्या हिरव्यागार वातावरणात सणा-उत्सवाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र एका

३० वर्षांच्या आर्थीचा ३० कोटींचा उद्योग !

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे गरज ही शोधाची जननी मानली जाते. तिच्या बाबतीत ही उक्ती १०० टक्के खरी ठरली. चेहऱ्यांवर

सया माहेरी आल्या गं...

माेरपीस : पूजा काळे गणेशोत्सवाच्या रणधुमाळीत भजन, कीर्तनात रमलेला चाकरमानी शोधायचा असेल तर, तो कोकणात सापडेल.

बुद्धीची देवता

संपूर्ण जनतेच्या ममत्त्वाचा, दैवत्वाचा, अस्मितेचा, श्रद्धाळू असा हा एकमेव गणेश. गणरायाचे आगमन म्हणजे सर्वांसाठी

शोध तरुण मनांचा

मराठी भाषेचा विकास आणि आव्हाने हा विषय सध्या सतत चर्चेत आहे. मला नेहमी असे वाटते की, येणाऱ्या काळात मराठीच्या