कथा – प्रा. देवबा पाटील
आता मात्र स्वरूप पूर्णपणे सुधारला, तो आनंदाने फिरायला जाऊ लागला हे साऱ्यांच्या लक्षात आले. स्वरूप दररोज सकाळी न चुकता झोपेतून लवकरच उठायचा. जणू काही आता त्याला नवा हुरूप आला होता. तो उत्साहाने स्वत:च स्वत:ची तयारी करू लागला. त्याच्या अंगाचा आळस गेला, त्याला सकाळी फिरायला जाण्याची चांगली सवय लागली. आजोबांसोबत जाण्यास सिद्ध होऊ लागला. ते दोघे आजेनाते सकाळी फिरायला जाण्यासाठी घरून निघाले. त्या दिवशी मात्र वातावरणात थोडेसे धुके पडलेले होते. धुक्याचा त्रास होऊ नये म्हणून आनंदरावांनी त्याला मफलर नाकातोंडावरून येईल असे नीट बांधून दिले व स्वत:च्याही नाकातोंडावर आपले मफलर बांधले.
बोलता बोलता स्वरूपच्या तोंडातून त्याला वाफा निघाल्यासारख्या दिसल्यात आणि न राहवून त्याने विचारलेच, ‘‘आजोबा, हिवाळ्यामध्ये एवढी कडक थंडी असूनही सकाळी आपल्या तोंडातून वाफा का निघतात?’’
आजोबा म्हणाले, ‘‘अरे व्वा! चांगले बारीक निरीक्षण आहे रे तुझे आपल्या कृतीकडे. त्याचं असं आहे, आपल्या शरीराच्या तापमानामुळे आपल्या शरीरातून म्हणजे तोंडातून बाहेर पडणारी हवा थोडीशी उबदार असते. हिवाळ्यात सकाळी बाहेरची हवा ही एकदम गार असते. त्यामुळे आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेतील बाष्प हे बाहेरच्या थंड गारव्यामुळे हळूहळू गोठते व त्याचे सूक्ष्म थंडगार बाष्प-जलकण बनतात. बाहेरच्या गारठलेल्या वातावरणात हेच हळूहळू थंडावणारे बाष्प वाफेसारखे वा पांढरट धुरासारखे दिसते. थंडीच्या दिवसांत सकाळी अशाच वाफा नदीच्या व तलावाच्या पाण्यावरूनसुद्धा निघताना आपणास दिसतात.
‘‘आजोबा धुरके म्हणजे काय असते?’’ स्वरूप म्हणाला.
आनंदराव म्हणाले, ‘‘धुराचा थर किंवा धूरमिश्रित धुके म्हणजेच धुरधुके किंवा धुरके. औद्योगिक कारखान्यातील धूर धुक्यात मिसळल्याने शहरावर तयार होणाऱ्या थरास ‘धुरके’ म्हणतात.
शहरांतील धुके काळे असते. कारण त्यांत कारखान्यांच्या धुरातील काजळी भरलेली असते. हे धुरके मात्र आरोग्यास अतिशय अपायकारक असतात.
पाण्याचा फवारा मारून धुरके कमी करता येते.
आजोबा पुढे म्हणाले, ‘‘हे धुरके हिवाळ्यात कधीकधी धुके नसतानाही सकाळी व सायंकाळीसुद्धा दिसते. हिवाळ्यात दिवस लहान असतो व सूर्यकिरण तिरपे पडत असल्याने पृथ्वी जास्त गरम होत नाही व सायंकाळी सूर्यास्तानंतर लवकरच थंडही होते. त्यामुळे पृथ्वीजवळील हवेचा थरही थंडच असतो. कोणत्याही धुराचा स्तर हा जड व वजनदार असल्यामुळे तो पटकन जास्त उंचावर न जाता पृथ्वीलगतच्या थंड हवेच्या संपर्कात येतो व तेथेच स्थिर होतो.
त्यामुळेच हिवाळ्यात धुके नसले तरी बऱ्याचदा सकाळी व सायंकाळीसुद्धा पातळ हवेचा थर पसरलेला दिसतो.
‘‘आजोबा धुरातून आपणास पलीकडचे का दिसत नाही?’’ स्वरूपने प्रश्न केला. ‘‘तुला पारदर्शक व अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय हे माहीत आहे का?’’ आनंदरावांनी विचारले.
‘‘हो आजोबा.’’ स्वरूप म्हणाला, ‘‘ ज्या पदार्थातून प्रकाशकिरण आरपार पलीकडे जातात त्याला पारदर्शक पदार्थ म्हणतात. अशा पदार्थांतून आपणास पलीकडचेही दिसते. उदा. काच. ज्या पदार्थातून प्रकाशकिरण पलीकडे जात नाहीत त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात. अशा पदार्थांतून आपणास पलीकडचेही दिसत नाही. उदा. लाकूड, दगड वगैरे.’’
आनंदराव म्हणाले, ‘‘धूर हा किंचित पारदर्शक असतो. त्यातून प्रकाशाचे थोडेफार किरण पलीकडे जातात व त्यामुळे आपणास पलीकडचे दृश्य अंधुक दिसते; परंतु धुराचे लोटच्या लोट आले तर मात्र त्याचे एकामागे एक नि एकावर एक असे दाट थर तयार झाल्याने तो अपारदर्शक होतो. त्यातून प्रकाश किरण पलीकडे जात नाहीत म्हणून दाट धुरातून आपणास पलीकडचे दिसत नाही. तो विरळ झाल्यानंतर थोडे थोडे अंधुकसे दिसू लागते.
असे रोजच्याप्रमाणे आज ज्ञानाचे एक जीवनोपयोगी पर्व शिकून स्वरूप आजोबांसोबत घरी आनंदाने परत आला.