कोकणी बाणा – सतीश पाटणकर
कोकण म्हटलं की, आपल्या तिकडच्या नारळाच्या बागा, हापूस आंबे, फणस, त्याचबरोबर तिथले समुद्रकिनारे इत्यादी आठवतात. याच कोकणच्या भूमीला परशुरामाची भूमी असे संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची पण जागृत देवस्थाने आहेत आणि अशा प्रत्येक देवस्थानाची काही ना काही कथा आणि त्याच्यामागे इतिहास देखील आहे. जर तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारूळ दिसले तर आश्चर्यचकित नका होऊ. ती वारुळे नुसती वारुळे नसून, मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळांत आहे.
कोकणात वारूळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. या वारूळ महिम्यावर एक टाकलेला प्रकाशझोत. काय आहेत ती वारुळं? आणि मंदिराच्या आतमध्ये कशी काय आहेत वारुळे? लोक त्या वारुळाची पूजा का करतात? त्याचाच शोध आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. अशी एक-दोन नाहीत, तर तब्बल ७९ मंदिरे सातेरी नावाने सिंधुदुर्गात आहेत.
सातेरी म्हणजे सप्त मातृकापैकी एक किंवा त्यांचा समुदाय असावा, असे मत पंडित महादेवशास्त्री यांनी व्यक्त केले आहे. भारतात मातृपूजा आर्येत्तरांनी (द्रविड) चालू केली. तिची परंपरा अद्यापही खंडित झालेली नाही. जिल्ह्यात सातेरी किंवा माऊली, भगवती यांना गाऱ्हाणे घालीत असताना ‘माते माजे आवशी’ म्हणून हुंकार दिला जातो. सातेरीला कुठे माऊली असेही म्हणतात. पावशीची सातेरी ही कोकणच्या देवता विज्ञानातील मोठे आश्चर्य आहे. कुडाळपासून सव्वा मैलावर असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या पावशी गावात हे आश्चर्य पाहायला मिळते. सातेरीचे मंदिर रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. या मंदिराची रचनाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की, माऊलीच्या दर्शनासाठी गेल्यावर आईच्या कुशीत गेल्याचा भास होतो. गाभाऱ्यात १५ फुटांहून अधिक उंच आणि २० फुटांहून अधिक घेर असलेले प्रचंड वारूळ आहे. वारूळ मंदिराच्या छप्पराला टेकले असून ते वाढत नसले तरी वारुळाच्या रचनेत बदल होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या वारुळाची मूर्ती मानून सातेरी देवीची पूजा केली जाते. याच भागात तांदळाचा प्रसाद देऊन देवीशी संवाद साधला जातो. अनेक भक्तांच्या समस्या देवी चुटकीसरशी सोडविते. या वारुळाच्या मागील कोनाड्यात गणपतीची छोटी मूर्ती आहे. आणखी दोन-तीन वारुळेही या परिसरात आहेत. या मोठ्या वारुळात सर्प रूपाने सातेरी देवी वास्तव्यास आहे, असे भक्त मानतात. या देवस्थानची निर्मिती कथाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
सध्या सातेरी देवीचे जेथे मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी एक घर होते. महाडेश्वर नावाचे कुटुंब येथे राहायचे. त्यांच्या स्वयंपाकघरातील चुलीत नेहमी वारूळ निर्माण होत असे, ते वारूळ पाडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत. एकदा त्यांच्या चुलीत वारूळ निर्माण झाले आणि हा हा म्हणता २० ते २५ फुटांनी वाढले. चुलीतील वारूळ घरातील मंडळींना पाडता आले नाही. त्या रात्री त्यांना सातेरीने दृष्टांत दिला. मी तुझ्याकडे आले आहे. हे ऐकताच त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी देवीची पूजाअर्चा सुरू केली. काही दिवसांतच वारूळ एवढे विस्तारत गेले की ते छप्परापर्यंत पोहोचले. ही घटना सुमारे ५०० वर्षांपूर्वीची असावी असे म्हटले जाते.
या देवस्थानाचे पावित्र्य अत्यंत काटेकारेपणे पाळले जाते. देवीसमोर खोटे बोलू नये, असा दंडक आहे. भक्ताने जर देवीला खोटे बोलून आपले भले करण्याबाबत गाऱ्हाणे घातले तर त्याचे प्रायश्चित्त त्यालाच भोगावे लागते.
वारा आपल्याला दिसत नाही. पण त्याची अनुभूती सदानकदा येत असते. अनेकवेळा अशा घटना घडतात की, त्याचे गूढ उलगडता येणे शक्य नसते. सुमारे ७०० वर्षांपूर्वी पावशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे प्रकट झालेल्या सातेरी देवीची अशीच कथा आहे. देवीला आपली खरी समस्या सांगावी आणि तिने आईच्या मायेने जवळ करत भक्ताला असलेले दु:ख, त्याच्यासमोर असलेले प्रश्न क्षणात दूर करावेत, या मातेची अशी ख्याती सर्वदूर आहे. मंदिराची पारंपरिकता जपत सांभाळलेला हा ठेवा अत्यंत मौल्यवान असाच आहे. पावशी गावात या देवीचे आगमन झाले आणि या गावाचे रूपडेच पालटले.
या मंदिराजवळ दोन लाकडी मोठाले स्तंभ आहेत. या ठिकाणी पूर्वी जत्रेच्या दिवशी बगाडचा कार्यक्रम होईल. कालौघात हा कार्यक्रम थांबला आहे. खांबावर हुकास लटकवून टांगते ठेवले जायचे. यावेळी त्या टांगलेल्या माणसाच्या पाठीतून रक्ताचा थेंबही निघत नसे. आता ही प्रथा बंद आहे. पूर्वी घोडेही नाचविले जायचे. या देवस्थानात दसरा, दिवाळीचा थाट काही औरच असतो. देवीला साकडे घालण्याची परंपरा, तिच्याशी संवाद केल्याशिवाय कधीही पुढे जात नाहीत, असे गाववासीय सांगतात.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)