Tuesday, March 25, 2025
Homeसाप्ताहिककोलाजअनाथांचे बाबा शंकरबाबा पापळकर

अनाथांचे बाबा शंकरबाबा पापळकर

श्रद्धा बेलसरे खारकर

अनेक दुर्दैवी मुलांना अनाथ आश्रमात राहावे लागते. सरकार या आश्रमांना अनुदान देते. पण त्यांचा एक अतिशय त्रासदायक नियम आहे, मुलगा/मुलगी १८ वर्षे वयाची पूर्ण होताच त्यांना आश्रमाबाहेर जावे लागते. त्यावेळी ही मुले अर्धवट वयाची असतात. पोटासाठी त्यांच्यासमोर पहिले काम असते नोकरी शोधणे. दुर्दैवाने त्यांच्याकडे चटकन चांगली नोकरी मिळेल असे काही कौशल्य नसते. बाहेरच्या जगाची त्यांना नीटशी माहितीही नसते. मुले कुठे तरी काम शोधतात. ते मिळाले नाही तर शेवटचा उपाय म्हणून पुष्कळ वेळा चोऱ्यामाऱ्या करायला लागतात. या व्यवसायातल्या लोकांना निरागस दिसणारी ही मुले हवीच असतात. ते यांना असल्या कामात ओढून गुन्हेगारीत त्यांचा प्रवेश करतात. मुलींची तर किती वाईट अवस्था होत असेल याची कल्पना केली तरी अंगावर शहारा येतो. राहायला जागा नाही? खायचं काय हा प्रश्न तसाच शिल्लक? आणि बाहेरचे निर्दय कठोर गुन्हेगारी विश्व तर टपूनच बसलेले असते. असंख्य वेळा या निराधार मुली अशा गिधाडांच्या पहिल्या बळी होतात.

गेली कित्येक दशके या गंभीर प्रश्नावर वझ्झरचे शंकरबाबा पापळकर एकट्याने आणि निष्ठेने लढा देत आहेत. पण मायबाप सरकारला मात्र जाग येत नाही असाच गेल्या कित्येक दशकांचा इतिहास सांगतो. शंकरबाबांचा प्रवास फार विलक्षण आहे. ते परिट समाजाचे आहेत. रस्त्याच्या कडेला टेबल टाकून ते कपड्यांना इस्त्री करून देत असत. संत गाडगेबाबांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याबरोबर खूप प्रवासही झाला. खूप वाचन झाले. साहित्याच्या आवडीतून त्यांनी ‘देवकीनंदन गोपाला’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यांचे दिवाळी अंक फार वाचनीय असत. थेट भीमसेन जोशींपासून लोक या अंकात लिहीत असत. अंकात नामवंत कंपन्यांच्या रंगीत जाहिराती असत. बाबांचा जनसंपर्क फार दांडगा आहे. रतन टाटांपासून सारे त्यांना ओळखतात. एकदा मुंबईला गेले असताना त्यांना एक मतीमंद मुलगी स्टेशनवर सापडली. तिची अवस्था बघून बाबांना राहावले नाही आणि तिथून त्यांच्या अनाथ आश्रमाचा प्रवास सुरू झाला!

अमरावती जिल्ह्यात परतवाडा-अचलपूर रोडवर वझ्झर गावात शंकरबाबांनी “अंबादा संपत वैद्य मतीमंद आणि अपंग बालगृह” काढले आहे. या आश्रमाला वझ्झार आश्रम म्हणून ओळखले जाते. १९९० मध्ये ही संस्था स्थापन झाली. त्यावेळी फक्त ४ बालके होती. आजमितीस १२३ मतीमंद, दिव्यांग आणि अनाथ मुले-मुली इथे सुरक्षित आयुष्य जगत आहेत. या मुलांच्या पालकांनीच यांना वाऱ्यावर सोडून दिलेले असल्याने त्यांना अनेकदा स्वत:चीच नावे नसतात, तर वडिलांचे नाव काय लिहिणार? म्हणून मग बाबांनी सगळ्या मुलांना स्वत:चे नाव दिले आहे. आश्रमात सर्व मुला-मुलींची राहणाऱ्यांना जेवण्याची व्यवस्था आहे. इथून मुलांना सर्व सरकारी अनाथ आश्रमाप्रमाणे १८ वर्षे पूर्ण होताच बाहेर काढले जात नाही. जोपर्यंत मुले स्वत:च्या पायावर उभी राहत नाहीत तोपर्यंत त्यांना आश्रमात राहू दिले जाते. विशेष म्हणजे या मुलांना काही व्यावसायिक शिक्षणही दिले जाते आणि छोटे-मोठे उद्योग करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत इथल्या ३० मुलांचे विवाह बाबांनी लाऊन दिले आहेत. ते सर्व आश्रमात आनंदाने राहतात. आतापर्यंत २० मुलांना उच्च शिक्षण दिले गेले आहे. त्यातील एक मुलगी तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.

आश्रमाकडे २० एकर जमीन आहे. त्यामध्ये १६,००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आश्रमाचा परिसर सुंदर, हिरवागार झाला आहे. आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींचे आधारकार्ड बनवण्यात आले आहे. अनेक १८ वर्षांवरील मुला-मुलींना मतदान कार्डही देण्यात आले आहे. आश्रमाच्या बाहेरही मुला-मुलींना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी बाबा प्रयत्न करत असतात. आतापर्यंत १२ मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. सरकारी नियमाप्रमाणे वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांना अनाथाश्रम सोडावा लागतो. दरवर्षी साधारण एक लाख मुले बाहेर पडतात. इथून बाहेर पडलेली मुले-मुली पुढे काय करतात याची काहीही माहिती सरकारकडे नाही; परंतु बाबा त्यांच्या आश्रमातील मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर न काढता तहहयात इथे राहण्याची व्यवस्था करतात. हीच मुले सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात कामे करतात आणि स्वत:च्या पायावर उभी राहतात. ‘वझ्झर पॅटर्न’ देशभरात लागू करावा यासाठी बाबा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. १८ वर्षं वयानंतरही मुलांना आश्रमात राहता यावे, असा कायदा व्हावा ही बाबांची इच्छा आहे. याचा बाबांनी ध्यास घेतला आहे. देशविदेशातील अनेक लोक, विविध राज्यांतील सामाजिक, शासकीय संस्थांचे अधिकारी ‘वझ्झर पॅटर्न’चा अभ्यास करण्यासाठी

इथे येतात.बाबा कुणी देणगी पाठवली तर परत पाठवतात. ते म्हणतात, या इथे काय चालले आहे ते बघा आणि मग देणगी द्या. मला भीक नको आहे. अनेक पुरस्कार त्यांनी नाकारले. पण जेव्हा अमरावती विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट द्यायचे ठरवले त्यावेळी संत गाडगेबाबांच्या नावाचा पुरस्कार कसा नाकारणार म्हणून त्यांनी ही पदवी स्वीकारली. पंढरपूरला कचराकुंडीत टाकलेले लहान बाळ असो, नागपूरच्या बस स्थानकावर सापडलेला इवलासा मुलगा असो. अशा अनेक निरागस बालकांना बाबांनी आपलेसे केले आहे. १२३ पेक्षा अधिक मुलांचे वडील म्हणून शंकरबाबांची ओळख आहे. या सर्व मुलांना मतदानासाठी बाबा घेऊन जातात. वैराग्यमूर्ती असलेले बाबा आजही हातामध्ये भली मोठी काठी घेऊन आश्रमाच्या दाराजवळच्या झोपडीत राहतात. बाबांचे वय आता ८० झाले आहे. तरीही न थकता ते सतत काम करत असतात आणि आपल्या हयातीत तरी अनाथ मुलांना १८ वर्षं होताच बाहेर काढण्याचा नियम बदलेल या आशेने बाबा अजून एका असंवेदनशील सरकारकडे नेटाने पाठपुरावा करत आहेत. दरम्यान “भगवान के घर देर है, अंधेर नहीं है” अशी एक म्हण आहे. त्याचा प्रत्यय आला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. एका अर्थाने त्यांच्या कामाला ही राजमान्यताच म्हणावी लागेल.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -