उर्मिला राजोपाध्ये
जनमानसांवर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना प्रत्येक शिवप्रेमी भारावलेला असतो. अर्थात ते भारावलेपण केवळ एका दिवसापुरते नसते. राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांवर पाऊल ठेवताना, त्यांच्या नावाचा गजर करताना, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग ऐकताना ते जाणवते आणि आपण या महान इतिहास पुरुषापुढे नतमस्तक होतो. भारावलेल्या मनाने त्यांचा महिमा गातो… राजेशाही असण्याच्या काळात भारताने अनेक राजे पाहिले. त्यांचा अंमल अनुभवला. इतिहासाने त्या त्या काळातील राजांची नोंद घेतली. आजही ठिकठिकाणच्या संग्रहालयांमध्ये राजेरजवाड्यांची तत्कालीन चित्रकारांनी चितारलेली चित्रे, संदर्भ, बखरी वा अन्य साहित्यांतून मिळणारे संदर्भ समोर येतात आणि त्या काळात डोकावण्याची संधी मिळते. मात्र शिवाजी राजांचे नाव निघते तेव्हा इतिहासाबरोबरच वर्तमानाशीही संबंध जोडला जातो. अशाप्रकारे दोन्ही काळांशी तादात्म्य पावणारा हा एकमेव राजा असावा… त्यामुळेच आजही शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे बाळरूप पाळण्यात जोजावताना लडीवाळ पाळणा गाताना, मिरवणुका काढून त्यांचा जन्मोत्सव साजरा करताना प्रत्येकाच्या भावनांना उधाण येते. या मागे जाणत्या राजाला अभिवादन करण्याचे प्रयोजन असतेच. त्याच बरोबरीने जनमनावर आजही राज्य करणाऱ्या आवडत्या राजाप्रतिचे प्रेम असते. हा सोहळा हृद्य होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. प्रजापालक, मुलगा, पती, पिता, कडवा प्रतिस्पर्धी अशी त्यांची एक ना अनेक रूपे आजही जगण्याचे आणि जगवण्याचे धडे देऊन जातात. जयंतीच्या निमित्ताने राजांना मानाचा मुजरा करण्याची संधी समाधान देऊन जाते.
याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका साम्राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते एका आदर्श नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यामुळे त्यांचे विचार आणि कार्यांचे महत्त्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही, तर ते आजही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. सध्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत त्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. राजांचे नेतृत्व आणि ध्येयधोरणे पाहता ते दूरदृष्टीचे आणि आदर्शवादी राजे होते. त्यांनी स्वराज्य हा संकल्प उभा केला आणि त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आजच्या काळात, विशेषतः तरुणांना नेतृत्वगुण आत्मसात करण्यासाठी आणि स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी महाराजांच्या या जिद्दीचा आदर्श घेता येईल. दुसरी बाब सामाजिक समता आणि न्यायाची आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात जात-पात, धर्मभेद न मानता सर्वांना समान न्याय दिला. त्यांनी हिंदू-मुस्लीम एकतेचा आदर्श घालून दिला. आजच्या काळात जातीयतेच्या आणि धार्मिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर, त्यांचे विचार सामाजिक सलोख्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता हा आज ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर पाहता शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात महिलांसाठी स्वतंत्र संरक्षण यंत्रणा उभारली होती. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कठोर शासन केले. ते बघता आजच्या समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत वाढत्या समस्यांसाठी त्यांचे विचार आणि धोरणे प्रेरणादायी ठरू शकतात. आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन प्रत्येक काळात महत्त्वाचे असतेच. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था आणि जलदुर्ग, गडकोट यांची मजबूत व्यवस्था निर्माण केली. आजच्या आर्थिक संकटांच्या काळात ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी त्यांचा हा आदर्श उपयुक्त ठरणारा आहे. खेरीज राजांनी शिस्त आणि युद्धनीतीचेही कालातीत धडे दिले आहेत. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा आणि गुप्तचर यंत्रणा आजच्या संरक्षण आणि धोरणात्मक व्यवस्थेसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. त्यांच्या शिस्तप्रियतेचा आदर्श आजच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठीही प्रेरणादायी आहे.
पर्यावरण आणि त्याच्या रक्षणासंबंधीचे प्रश्नदेखील आज भेसूर रूप घेत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण निसर्गचक्रच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पर्यावरणसंवर्धन आणि गडसंवर्धनासाठी महाराजांनी घेतलेले निर्णय आजही अभ्यासण्याजोगे ठरतात. शिवाजी महाराजांनी गडदुर्गांच्या संवर्धनावर विशेष भर दिला. आजही त्यांचे गडदुर्ग आपल्या ऐतिहासिक वारशांचा भाग आहेत. तेव्हा त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. थोडक्यात, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त केवळ साजरीकरणामध्ये दंग न राहता त्यांच्या विचारांनुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अपेक्षित असणारा समाज आपण घडवू शकतो. महाराजांच्या जीवितकार्यातल्या प्रत्येक तेजोमय प्रसंगाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला कोपरा उजळला आहे. आपल्याला रणाचा परिचय नाही पण राजांची रणनीती मात्र आयुष्यातल्या बारीक सारीक प्रसंगांमध्येही मार्गदर्शक ठरते. आता कोणी शाहिस्तेखान, अफझलखान आपल्यावर चालून येणार नाही पण त्यांच्या कथा ऐकून मोठे झाल्यामुळे गोड बोलून पाठीत वार करू शकणाऱ्या प्रत्येक शत्रूप्रती आपण सजग आहोत. शिवसाम्राज्यानंतर काही शतकांचा काळ उलटला असला तरी आजही प्रचंड उत्साहात आणि दिमाखात शिवरायांची जयंती साजरी होणे आणि प्रत्येक पिढीने तेवढ्याच आनंदाने त्याचा भाग होण्याचा प्रयत्न करणे हाच या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे.
राजांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रेमाबरोबरच भक्तीही आहे. ही भक्ती तो प्रतिपालक, धनी, नेता, धुरंधर असल्याबद्दल आहेच. पण त्याहीपेक्षा अधिक त्यांनी अखंड जनकल्याणाचा विचार केल्यामुळे आहे. याच जनांच्या कल्याणासाठी मिसरुडे फुटायच्या वयापासून वृद्धत्वाची साद ऐकू येण्याच्या वयापर्यंत त्यांनी अनंत संकटांचा सामना केला. आपल्या मावळ्यांना प्राणपणाने जपले. प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. म्हणूनच त्यांचे तख्त इतिहासजमा झाले तरी छत्रपती महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आरूढ आहेत. त्यांच्याप्रती असणारे मनामनातले प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. स्वराज्य आणि शिवराय हे अद्वैत महाराष्ट्राच्या ललाटावरील टिळ्यासम आहे. आजही कोणताही गड चढताना इथे शिवप्रभूंची पायधूळ झडली असेल, या विचाराने प्रत्येकजण भारावून जातो. रायगडावरील शिवरायांच्या प्रतिमा दृष्टीस पडताच डोळे भरून येतात, समाधीचे दर्शन घेताना प्रत्येकजण भावुक होतो. शिवरायांचा असा महिमा असल्यामुळेच महाराष्ट्राची मातीदेखील त्यांची जयंती साजरी करते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे शिवप्रभूंच्या चरित्रातून घेण्यासारखे खूप काही आहे. किंबहुना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्यायच अभ्यासण्याजोगा आहे. मावळे आणि सह्याद्री यांची साथ असल्याशिवाय संघर्ष सफल होणार नाही हे या द्रष्ट्याने आधीच ओळखले होते. यातूनच शिवबांना गडकोटाच्या अभ्यासाची आणि सामान्यजनांचे सुखदु:ख जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. आदिलशाही सत्तेने आक्रमण करून शहाजीराजांची जहागिरी बेचिराख केली. आधी गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याच्या भूमीवर जिजाऊने बारा वर्षांच्या शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला आणि एका सुवर्णकाळाचा आरंभ झाला. शिवबाने यवनांनी उद्ध्वस्त केलेल्या कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला. एका नव्या युगाला, आरंभाला गणेशाचे आशीर्वाद मिळाले. दुसरीकडे, शिवबांनी उद्ध्वस्त जहागिरीची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. त्यांनी देशमुख-देशपांडे या वतनदारांच्या माध्यमातून रयतेशी संपर्क साधला आणि पुनर्वसाहतीसाठी नागरिकांचे सहकार्य मागितले. पण जनता अस्मानी आणि सुलतानी संकटाने ग्रासलेली होती. त्यांच्याकडे घालायला कपडा, पोटाला घास, दावणीला बैल आणि राहण्यासाठी निवारा नव्हता. जमीन पडीक पडली होती. ही विदारक अवस्था जाणल्यानंतर शिवबाने प्रत्येकाला गरज असेल तशी मदत करण्याचे जाहीर केले. अवजारे नसतील त्यांना अवजारे दिली, अन्नाचा घास नसणाऱ्यांना खंडी-दोन खंडी धान्य दिले, शेतीच्या कामासाठी बैल नसणाऱ्यांनी ती मदत देऊ केली. अशा प्रकारे त्यांनी रयतेची मूलभूत प्रश्नांपासून सुटका केली.