मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गांवरून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे. उच्च गती, अद्ययावत सुविधा आणि अधिक सुरक्षिततेसह ही बोट प्रवाशांसाठी जलप्रवासाचा नवा अनुभव घेऊन येत आहे. पारंपरिक फेरीसेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची हमी देणार आहे. (Catamaran Boat)
नवी दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरण, मृतांच्या कुटुंबियांना १० लाख आणि जखमींना २.५ लाख रूपये मदतीची घोषणा
समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे आणि शहरांना जलमार्गाने मुंबईशी जोडण्याचे काम पारंपरिक फेरी बोटी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, भाऊचा धक्का ते मोरा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गांवर पारंपरिक जलवाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र ही सेवा प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. तसेच सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ती सुधारण्याची गरज आहे. सध्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक, प्रदूषण आणि अपुरे रस्ते या समस्यांचा विचार करता प्रशासनाने रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांवर मोठा खर्च केला आहे. तरीही वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जलमार्गाच्या विकासावर भर दिला जात आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत अत्याधुनिक वॉटर टॅक्सी आणि रो-रो बोटी सुरू करण्यात आल्या आहेत. आता त्याच धर्तीवर, पारंपरिक फेरी बोटींसोबतच अत्याधुनिक कॅटामरान बोट आणण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेने घेतला होता. त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांची वातानुकूलित कॅटामरान बोट खरेदी करण्यात आलेली असून ही बोट मुंबईत दाखल झाली आहे. (Catamaran Boat)
मुंबईतील जलवाहतुकीसाठी हा मोठा टप्पा आहे. पारंपरिक फेरी बोटींपेक्षा ही अत्याधुनिक कॅटामरान बोट वेगवान, अधिक सुरक्षित आणि आरामदायी आहे. विशेषतः पर्यटक आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरेल. यामुळे एलिफंटा आणि मांडवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढेल, तसेच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था, सचिव, शराफत मुकादम यांनी म्हटले.