पल्लवी अष्टेकर
“माझा मराठीची बोलू कौतुके,
परि अमृतातेही पैजांसी जिंके”
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले गीत आहे. या गीतात त्यांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे. मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेनं जिंकणारी अक्षरे अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या शब्दा-शब्दांतून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. मराठी ही भारताच्या बावीस भाषांपैकी एक आहे. असे म्हणतात की, मराठीचे वय सुमारे २४०० वर्षं आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ कलाकृती निर्माण झाल्या आहेत आणि त्यात सतत भर पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. मराठीला अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखनाने धन्य केले आहे. त्यातलेच एक म्हणजे केशवसुत. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी ७ ऑक्टोबर १८६६ मध्ये जन्म झाला. ‘केशवसूत’ यांचे पूर्ण नाव – कृष्णाजी केशव दामले. त्यांचे शिक्षण खेड, बडोदा, वर्धा, नागपूर व पुणे येथे झाले. शिक्षणकाळातच त्यांचा विवाह १८८० मध्ये झाला. मॅट्रिकनंतर मुंबईला त्यांनी (१८८९) मुंबईला (१८९७) पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. सुरुवातीला भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांनी दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून त्यांची बदली झाली. नोकरीसाठी त्यांना बरीच वणवण करावी लागली. काही काळ मुंबई, सावंतवाडी, मडगाव, धारवाड येथे जावे लागले. त्यांनी नोकरी, संसार सांभाळून कविता करण्याचा छंद जोपासला होता. त्यांच्या कवितेत गरिबी, भूक, जातीभेद, वर्णभेद यांचा उल्लेख आढळतो. त्यांनी स्वानुभवावर व तसेच गुढरम्य निसर्ग यावर कविता केल्या. त्यांच्या कविता दर्जेदार व मराठी कवितेला नवीन दिशा देणाऱ्या होत्या. त्यांचे इंग्रजी चांगले होते. ‘कीटस्’ या कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. इंग्रजीत १४ ओळींचा ‘सॉनेट’ काव्यप्रकार असतो, या धर्तीवर त्यांनी मराठीत काव्यप्रकार सुरू केला आणि त्याला ‘सुनीत’ हे नाव दिले. त्यांच्या ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘स्फूर्ती, गोफण’ या कविता त्या दृष्टीने सांगता येतील. साहित्यात केशवसुतांचे नाव उल्लेखनीय आहे. त्यांच्या गुढरम्य कविंतामध्ये ‘कोणाकडून कोणीकडे’ व ‘हापुर्झा’ या कवितांचा गाजावाजा झाला. त्यांचा मृत्यू ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांच्या व्याख्यानातून शिवाजी महाराजांचे कर्तृत्व डोळ्यांसमोर येते. ते एक इतिहासकार आणि पुस्तके व नाटकांचे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यकृती बहुतेक १७ व्या शतकातील मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहेत. बाबासाहेब ‘जाणता राजा’ हा भव्य नाटक प्रयोग करून आणखी मोठे झाले. या प्रयोगात कलाकारांबरोबर खरोखरचे घोडे, उंट आणि हत्ती असायचे. या नाटकाचे मराठीप्रमाणे इतर भाषांमध्ये देखील प्रयोग झाले आणि भारतभर शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती होऊ लागली. त्यांनी पेशव्यांच्या इतिहासाचा देखील अभ्यास केला. त्यांनी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांना साथ देत शिवाजी महाराजांची गाणी लोकप्रिय केली. बाबासाहेबांचा उत्साह, ऊर्जा अफाट होती. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करण्यात आले. २५ जानेवारी २०१९ रोजी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांचे कार्य सर्वांच्या नेहमी स्मरणात राहील. त्यांचा मृत्यू १५ नोव्हेंबर २०२१ रोजी झाला. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी १९१२. हा दिवस ‘मराठी राज्यभाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ. त्यांना त्यांच्या चुलत्यांनी दत्तक घेतले. दत्तक घेतल्यावर त्यांचे नाव ‘विष्णू वामन शिरवाडकर’ असे झाले. त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीवरून – कुसुमवरून ‘कुसुमाग्रज’ असे टोपण नाव घेतले.
कुसुमाग्रज हे एक प्रतिभावंत कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक होते. त्यांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायाकरिता ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण तिथेच गेले. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून त्यांनी आपले बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले. बी. ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. त्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात या लढ्यापासून झाली. प्रामाणिक सामाजिक आस्था, शब्दकलेवरचं प्रभुत्व, क्रांतिकारक वृत्ती ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत. साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘मेघदूत’ या नाटकाचे भाषांतर जलरंग कलाकार नाना जोशी यांनी केले होते. हे नाटक १९७९ मध्ये ‘मेनका’ या दिवाळी अंकात प्रकाशित झाले होते.
कुसुमाग्रज यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ या नाटकाचे रूपांतर महेश मांजरेकर यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत २०१६ मध्ये केले होते. ‘नटसम्राट’ हे नाटक १९७० मध्ये पहिल्यांदा सादर झाले. त्यात प्रमुख भूमिका श्रीराम लागू यांची होती. कुसुमाग्रज यांच्यात तीव्र सामाजिक जाण होती. त्यांनी नाशिकमध्ये ‘लोकहितवादी मंडळ’ स्थापन केले. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक पाठ्यपुस्तके देखील संपादित केली. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तीन कादंबऱ्या, सोळा कविता खंड, आठ लघुकथा खंड, सात निबंध खंड, अठरा नाटके व सहा एकांकिका लिहिल्या. ‘विशाखा’(१९४२) या गीतसंग्रहासारख्या त्यांच्या कामांनी एका पिढीला भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रेरणा दिली. त्यांनी ‘नटसम्राट’, ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘ययाती आणि देवयानी’ अशा नाटकांचे नाटककार होत इतिहास घडविला. कुसुमाग्रज यांचे निधन १० मार्च १९९९ रोजी झाले. त्यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभी करण्यात आली आहे.