लता गुठे
माझं बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे सण उत्सवामध्ये म्हटली जाणारी गाणी. विशेषत: पंचमी सणाला स्त्रिया फेर धरून गाणी म्हणत असत. त्याचप्रमाणे जात्यावरच्या ओव्या, पिकाची कापणी करताना म्हटली जाणारी गीतं म्हणजे भलरी, दान पावलं म्हणत वासुदेव राम प्रहरी वासुदेव गावात यायचा आणि सारं गाव जागं व्हायचं. गाणी, पाळणे, पोतराजाची गाणी, गोंधळ याबरोबरच संत नामदेव, तुकारामांचे अभंग, एकनाथांचे भारूड या सर्व लोकगीतांचा परिचय झाला आणि त्या लोकगीतांच्या चाली शब्दांसह मनात रुजल्या. लोकगीतांच्या मुळाशी असलेले लोकसंगीत, लोकवाद्य आणि गीतांच्या चाली यामुळे ती गीते अनेक वर्षानुवर्ष टिकून राहिली. लोकगीते म्हणजे जनसामान्यांच्या हृदयातील भावनांची स्पंदनंच होय. तसेच लोकगीते अतिशय लवचिक असल्यामुळे त्यामध्ये बदल करणे सहज सोपे असते. लोकगीते त्या त्या भागातील त्या त्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. यामध्ये अंगाई गीते, पाळणे, खेळाची गाणी, डोहाळगीते, सण उत्सवात म्हटली जाणारी गाणी, भलरी अशा प्रकारच्या गीतांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागामध्ये लोकगीते गायली जातात. या गीतांच्या चाली ठरावीक असल्यामुळे अनेक प्रांतांमध्ये ती गीते त्याच पद्धतीने म्हटली जातात. मौखिक परंपरेतून ही गीते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आणि स्थिरावली. लोकगीतांमधून श्रमपरिहार होण्याचे मुख्य कारण आहे.
लग्नामध्ये म्हणायची गीते महानुभाव संप्रदायातील कवयित्री महदंबा या स्त्रीने रचली. त्या गीतांना ढवळे म्हणू लागले. पुढे बदलत्या परंपरेबरोबर गीत रचनांमध्येही थोडेफार बदल करून त्याच चालीवर ती गीते म्हटली जाऊ लागली. पूर्वीच्या काळापासून पद्य वाङ्मयाला अनन्यसाधारण महत्त्व लाभले. महाराष्ट्रामध्ये तर बारा कोसाला बदलणारी मराठी भाषा आणि त्या मराठीमध्ये असलेली त्या त्या संस्कृतीची लोकगीते फार प्रसिद्ध आहेत. मराठी लोकगीतांचा अभ्यास करताना त्या लोकगीतांची काही वैशिष्ट्ये जाणवली ती अशी… मराठी लोकगीते बऱ्याचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात. लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ऱ्हस्व-दीर्घ पद्धतीने होतो. लोकगीते हे सामुदायिक जीवनाला उठाव देणारा एक महत्त्वाचा प्रकार आहे. गोंधळासारख्या मराठी लोकसंगीतात आख्याने असतात, त्यामुळे ऐकायला ते रसाळ असतात.
भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला आहे. पूर्वापार चालत आलेल्या लोकगीतांच्या चालींवर नव्याने शब्दांचे संस्कार करून अभिजात लोकसंगीत तयार झाले. लोकसंगीत हे लोकांच्या मनातील भाव-भावना पिढ्यांनपिढ्यांच्या संस्कारातून आल्यामुळे त्याला स्वतःचा एक इतिहास आहे.भारतामध्ये भावगीते, भांगडा आणि गिधा, लावणी, दांडिया, बाऊल, भटियाली, गरबा असे विविध प्रांतांमध्ये काही लोकसंगीताचे प्रकार प्रसिद्ध आहेत. ते लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात. त्यामुळे गाण्यासाठी ती सोपी असतात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला एक वेगळा आयाम देणारा महत्त्वाचा प्रकार आहे. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी ४००० हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गाणी ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार सादर करीत आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी लावण्या, गण-गवळण, लोकगीते, असे मनोरंजनाच्या अानुषंगाने विविधांगी साहित्य निर्माण केले. लोकभिमुख ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या लिखाण शैलीमुळे त्यांचे साहित्य सामन्यांना सहज समजण्याजोगे आणि मनाला भावणारे असल्यामुळे लोकप्रिय झाले. साधारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून लग्नात म्हणायची गीते प्रसिद्ध आहेत. लग्नाची सुरुवात जात्याची पूजा करून करतात आणि गाणी म्हटली जातात. तसेच ओव्यांमधून सासर-माहेर, मुलांविषयी असलेली माया-नाते संबंधातील ओलावा. मोठ्यांबद्दल आदर हे सर्व दिसून येते. पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून खेड्यातील बाया अंगण झाडून काढताना, सडा टाकताना म्हणत असत…
सकाळी उठून
हाती माझ्या सडापात्र
सडा टाकते पवित्र
राम रथातून उतरं
राम मनी, राम द्यानी
रामावाचून नाही कुणी.”
हे माझ्या आई आजीकडून ऐकलेलं गाणं. याचा रजेचा कोण असेल हे कोणालाही माहीत नाही; परंतु मौखिक परंपरेतून हे साहित्य कायम जिवंत राहिले. लहानपणी कानावर पडून मीही ही गाणी शिकले. त्यामुळे याचा कुठेतरी संग्रह करून ठेवावा असे वाटले…
सकाळी उठून
हाती माझ्या झाडणी
झाडते ईश्वराची न्हाणी
राम मनी राम ध्यानी
रामावाचून नाही कुणी
असं म्हणताना ते खेड्यातील अशिक्षित स्त्री त्यामध्ये पूर्णपणे एकरूप होऊन परमेश्वराचे चिंतन या पवित्र शब्दातून करायची. ही सकारात्मक ऊर्जा तिला दिवसभर पुरत असे. त्यांच्या रोजच्या जगण्यातील घटना, प्रसंग गाण्यांमधून व्यक्त होतात. शेतकऱ्यांचा पाऊस अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे, सुखाचे क्षण देणारा पाऊस त्यांना अतिशय प्रिय वाटतो म्हणूनच तो स्त्रियांच्या गीतांमधूनही साकार होतो…
पड राजा तू पावसा
ओल्या होऊंदी जमिनी
डोई भाकरीच्या पाट्या
शेता निघाल्या कामिनी
पड राजा तू पावसा
ओली होऊंदी वावरं
तिफनीबाईच्या मागं
कुणबी झालेत नवरं
शेतकऱ्याला दिलेली नवऱ्याची उपमा किती सूचक आहे पाहा… त्यामध्ये उतावीळपणा आहे. भक्तिगीतांमध्ये संत साहित्यातून भक्तिगीतांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. वारकरी संप्रदायाच्या अभंगांपासून हरिपाठ, गोंधळ आणि भारुड यांसारख्या गीतांनी महाराष्ट्रात धार्मिक भक्तिसंस्कृती निर्माण केली.लावणी हा महाराष्ट्राचा खास लोकसंगीत प्रकार आहे. यामध्ये नृत्याच्या तालावर असलेली लावणी विशेषतः तमाशामध्ये गाजते. देवीची आराधना करण्यासाठी गोंधळ हा गीतप्रकार गायला जातो. तो प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आढळतो. आदिवासी संस्कृतीशी निगडित असलेला भराड हा लोकगीत प्रकार आहे. तो प्रामुख्याने विदर्भ आणि खानदेशात प्रसिद्ध आहे. गोंडी गीते ही गोंड समाजातील पारंपरिक गीते, जी निसर्ग, पाऊस, पीक आणि सणांवर आधारित असतात. लोकगीते म्हणजे जनसामान्यांच्या भावनांचे प्रतिध्वनी असून ती आपली सांस्कृतिक ओळख आहे. ग्रामीण आणि शहरी समाजाच्या जीवनशैलीतील अंतर भरून काढण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचे संगोपन करण्यासाठी लोकसंगीताचे संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे लोकसंगीताची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.