मृणालिनी कुलकर्णी
चक दे चित्रपटात अनंत अडथळे पार करून अंतिम सामन्यापर्यंत आलेल्या हॉकी संघाला सामान्यांच्या आधी कोच शाहरुख खेळाडूंना सांगतॊ, “आज इस आखरी मॅचमे कैसे खेलना है ये मै तुम्हे नही बताऊंगा। मैं सिर्फ इतना बताना चाहता हूं की ये सत्तर मिनिट तुमसे कोई छीन नही सकता। जाओ, खेलो, और ऊन सबको दिखाओ जिन्होने तुम्हारी काबिलियतपे विश्वास नहीं किया… ”. दहावीची परीक्षाही या अंतिम सामन्यासारखी असते. केजी ते दहावी या शालेय जीवनातील शेवटचा आणि बाह्य जगात प्रवास करण्याचा पहिला टप्पा. गेली सात वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चामधून विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधत आहेत. याक्षणी परीक्षेच्या हॉलमध्ये येणाऱ्या ताणतणावाबाबत – १. वेळेच्या आधी नेहमीच्या कपड्यात, कोणत्याही अफवेच्या चर्चेत भाग न घेता मनाची घालमेल करू न देता शांत राहा. २. तसेच हॉलमध्ये जास्त पुरवण्या घेणारा, खाणाखुणा करणारे… याकडे दुर्लक्ष करत फक्त आणि फक्त स्वतःच्या उत्तरपत्रिकेकडे लक्ष द्या. ३. कूल राहा. तुम्ही परीक्षेला कसे सामोरे जाता यावर तुम्ही दिलेल्या परीक्षेचे यश अवलंबून असते. ‘आय हॅव टू विन’ ही मनाशी जिगर ठेवून आत्मविश्वासाने, आनंदाने परीक्षेला जा. शेवटी मिळालेले यश साजरेही करा. मिळालेल्या मार्कांप्रमाणे जेथे प्रवेश मिळेल तेथे दुसऱ्या मित्राशी तुलना न करता येथे आपले चांगले होणार आहे, या भावनेने अभ्यास करा. स्वतःचेही भविष्य आपल्याला माहीत नसते.
मिळणाऱ्या या दहावीच्या मोठ्या सुट्टीत स्वत:चा शोध घ्या. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नवीन शिका. दहावीला असतानाच आत्मविश्वासाने लेखनाला प्रारंभ करणारे विश्वास पाटील, याच सुट्टीत शिक्षण घेऊन पुढे करिअर करणारी राही सरनोबत, चित्रपटांत गेलेल्या अलका कुबल… असे अनेकजण दहावीच्या सुट्टीकडे संधी म्हणून पाहतात. युवा अवस्थेतील कॉलेजची ५-६ वर्षे उभ्या आयुष्यात महत्त्वाची असतात. नवं जग जाणून घेण्याचा कालखंड… चारी बाजूने अनेक आकर्षणे यात स्वतःवर संयम ठेवून मी कुठे हे ओळखणं फार महत्त्वाचे. ११-१२ या कॉलेजमधील दोन वर्षांत कॉलेजमध्ये, समाजात चालू असलेल्या अनेक अॅक्टिव्हिटीतून, वाचनातून अनेक क्षेत्रातल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ओळख होते. आधीच्या काळांत कशातही भाग न घेतलेले, न बोलणारे यांना या आयुष्यातल्या परीक्षेत अचानक मार्ग गवसतो. येणारे अनुभव, अपयश, लोकांची कडू, निराशाजनक वाक्ये हा सारा आयुष्यातल्या परीक्षेचा भाग असतो.
११-१२ च्या परीक्षेला शाखा बदलण्यासाठी मार्कांचे दडपण असते; परंतु अनेक शाखांच्या उपशाखा विस्तारलेल्या असल्याने माहीत नसलेली शाखा आपले भविष्य बनते. आज शिक्षणातील स्पर्धा परीक्षा, परदेशातील प्रवेश, परीक्षा त्याचा अभ्यास, अवकाश, समुद्र, सैन्यदल, कला, क्रीडा, करमणूक जितके पर्याय तितकी आव्हानेही आहेत. म्हणूनच स्वतःबाबत निर्णयक्षमता महत्त्वाची ठरते. १७ व्या वर्षी स्टीव्ह जॉब्सने स्वतःला ओळखत ड्रॉप घेतला. त्यावेळी घेतलेले कॅलिग्राफीचे शिक्षण अनेक वर्षांनी उपयोगी पडले. गिरीश चौधरी यांना अभ्यासापेक्षा भटकंती, वेगवेगळे मैदानी खेळ, इतिहास- भूगोलांच्या या आवडीमुळे त्यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर प्रथम छोट्या काही वर्षांनी मोठ्या सहलीचे आयोजन करू लागले. ते आज ६७ वर्षांचे आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी गुकेशने मिळविले असामान्य यश. वयाच्या १७ व्या वर्षी सुभाषचंद्र गोयल यांनी वडिलांचा तोट्यात जात असलेला व्यवसाय हाती घेतला आणि आज ते एस्सेल समूहाचे प्रमुख आहेत.
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम म्हणाले होते, “भारतीय तरुण पिढीची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पष्ट दृष्टीचा आभाव, नक्की दिशेचा आभाव. तुम्ही कोणी असा, छोटे-मोठे, गरीब श्रीमंत पण हिम्मत हरू नका.” १. मीराबाई चानू हिचे रिओतील अपयश हे टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा पाया ठरला होता. २. पूर्णतः निरक्षर कुटुंबातील पहिला मुलगा भरत आंधळे शाळेत प्रत्येक इयत्तेत नापास. अपार मेहनतीने दहावी उत्तीर्ण. प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे लक्ष्य मनात ठेवून, त्यांनी २००० साली सुरू केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, अपयश पचवत परिस्थितीवर मात करीत २०१० साली उत्तीर्ण झाला.
युवकांनो! परीक्षे पे चर्चावर लिहिताना, शेवटी जीवनमे चुनौतीया न हो, जीवनमे स्पर्धा न हो, तो जीवन बहुतही प्रेरणाहीन बन जायेगा. मोदीजी म्हणतात, मै हर चुनौतीको चुनौती देना मेरा प्रवृत्ती है। बच्चो, किसीभी हालत मे निर्णय लेना आना चाहिये. खुद को कुछ करना है तो दुनियासे मत डरे. मेरा क्या, मुझे क्या… इससे कोई लेना देना नही चाहिये। आखिरमें १० वी, १२ वी ये तो सुरुवात है ! जिंदगी का सफर बहुत लंबा है। सृष्टी का, जीवन का आनंद लेके परीक्षा निभाना।