भालचंद्र ठोंबरे
अंतकाळी केलेल्या भगवंताच्या नामस्मरणाने अजामेळाचा नरकवास टळून तो वैकुंठाला गेल्याची कथा श्रीमद्भागवताच्या सहाव्या स्कंधातील पहिल्या व दुसऱ्या अध्यायात आहे. कान्यकुब्ज शहरात एक अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अहंकार रहित व सर्व प्राणीमात्रांचे हित इच्छिणारा होता. एके दिवशी वनवासातून फुले, फळे आणण्यासाठी गेला असता त्याला एक गणिका(वेश्या) दिसली. तिला पाहून तो कामातूर झाला. कामरूपी पिशाच्चाने त्याच्या मनाचा ताबा घेतला व तो वेश्येच्या नादी लागला. सर्व त्याग करून तो वेश्येसोबतच जंगलात राहू लागला. उपजीविकेसाठी चोरी, वाटमारी करून धन अर्जीत करू लागला. अशाप्रकारे त्याचे पूर्ण जीवन पापमय होऊन गेले. अजामेळाला नारायण नावाचा एक मुलगा होता. तो त्यावर फार प्रेम करीत असे. तो सतत नारायणाचाच विचार करीत असे. त्याच्या अंतःकाळी त्याच्या पापकर्माने त्याला नेण्यासाठी यमदूत आले. त्यांचे अक्राळविक्राळ रूप पाहून घाबरलेल्या अजामेळाने मोठ्याने नारायणाला हाक दिली. आर्ततेने दिलेल्या या हाकेमुळे भगवान विष्णूचे दूतही त्या ठिकाणी आले. त्यांनी अजामेळाच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर ओढून घेत असलेल्या यमदूतांना तसे करण्यापासून रोखले. तेव्हा यमदूतांनी धर्मराजाच्या (यमराजाच्या) आज्ञेला रोखणारे तुम्ही कोण? म्हणून प्रश्न केला. विष्णूदूतांनी यमदूतांना तुम्ही धर्माचे (यमाचे) दूत म्हणविता, तर धर्माचे तत्त्व, धर्माचे लक्षण सांगा? तसेच दंड कोणत्या प्रकारे दिला जातो.
पापचरण करणारी सर्वच दंडनीय आहेत की, त्यांच्यापैकी काहीजण आहेत? असा प्रश्न केला. यावर यमदूत म्हणाले की, वेदांनी जी कर्मे करावयास सांगितली आहेत, ती करणे हा धर्म व ज्यांचा निषेध केला आहे ती करणे हा अधर्म आहे. जीवाच्या कर्माची आप, तेज, वायू, आकाश, इंद्रिये, चंद्र, काळ, दिवस, रात्र, दिशा, पाणी, पृथ्वी हे सर्व साक्षी आहेत. त्यांच्याद्वारे धर्म, अधर्म कळतो व दंडाच्या पात्रतेचा निर्णय होतो. पाप चरण करणाऱ्याच्या कर्मानुसार दंड ठरतो व तसेच फळ तो परलोकांत भोगतो. अजमेळाने शास्त्राज्ञेचे उल्लंघन करून स्वच्छंदी व पापी वर्तन केलेले असल्याने तसेच पापाद्वारे अर्जीत अन्नाने आपले जीवन व्यतीत केले. त्यामुळे त्याचे सर्व जीवनच पापमाय झाले आहे. आपल्या पापाचे कोणतेही प्रायश्चित्त न घेतल्याने त्या पापी पुरुषाला आम्ही यमराजाकडे नेत असल्याचे सांगितले. तेव्हा भगवंतांचे दूत म्हणाले की, हा पापी असेल मात्र त्याने अंतकाळी नारायणाचे नाव घेतले. त्यामुळे त्याच्या कोट्यवधी जन्माच्या पापांचे प्रायश्चित्त झाले आहे. तपश्चर्या, दाने आदींनी पापे नाहीशी होतात मात्र या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही. मात्र भगवंताच्या चरणाच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते. जाणतेपणे अथवा अजाणतेपणेही भगवंताच्या नामाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होतात. म्हणून अजामेळाची सर्व पापे भस्म झाल्याने अजामेळाला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. असे म्हणून त्यांनी या अजामेळाला यमपाशातून मुक्त केले व वैकुंठाला नेले.
अजामेळासारख्या पापी माणसाने मृत्यू समयी पुत्राच्या निमित्ताने भगवंताच्या नावाचा उच्चार केल्याने त्याला वैकुंठ प्राप्ती झाली, तर श्रद्धेने सतत भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या भाग्यवंताच्या भाग्याबद्दल तर बोलायलाच नको! इतरत्र असलेल्या अजामेळाच्या एका कथेनुसार पूर्वी एक हटयोगी व चंद्रमणी नामक एक हटयोगिनी होती. एकदा कडाक्याच्या थंडीत हटयोगी तोकड्या कपड्यात निद्रासनाद्वारे ध्यान करत होते. तेव्हा थंडीपासून त्यांचा बचाव करण्याच्या उद्देशाने त्याचे अंगावर पांघरून घालण्याच्या उद्देशाने चंद्रमणीने सभोवताली वस्त्र शोधले पण ते न दिसल्याने ती शुद्ध मनाने त्याचा थंडीपासून बचाव करण्याच्या हेतूने त्याच्या अंगावर झोपली. काही वेळाने हटयोगी समाधीमधून बाहेर आले व आपल्या अंगावर झोपलेल्या साध्वीला पाहून ते क्रोधायमान झाले. साध्वीला त्यांनी पुढच्या जन्मी वेश्या होण्याचा शाप दिला. आपल्या चांगल्या हेतूने केलेल्या कृत्याचा विपरीत अर्थ काढून शाप देणाऱ्या हटयोग्याचा चंद्रमणीला राग आला. तिनेही हट योग्याला पुढच्या जन्मी भडवा होण्याचा शाप दिला. काही वेळाने दोघांनाही आपली चूक कळून आली. तेव्हा त्यांना पश्चाताप झाला. पुढे दोघेही ब्रह्मचर्येचे पालन करून एकत्र राहू लागले.
कालांतराने दोघेही मरण पावले. हटयोगी ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तोच अजामेळ, तर चंद्रमणी गणिका झाली. अजामेळ एकदा फुले, फळे आणण्यासाठी वनात गेला असता गणिकेला पाहून तो मोहीत झाला व सर्व त्याग करून तो गणिकेसोबत जंगलात राहू लागला. उपजीविकेसाठी खून, चोरी करू लागला. एके दिवशी एक साधू पुरुष त्यांच्या झोपडीत आला. दोघांनीही त्याचा स्वागत सत्कार केला. जाताना त्याने चंद्रमणीला एक पोपट देऊन त्यांचे नाव गंगाराम असून त्याची सेवा करण्यास सांगितले. (चंद्रमणीने गंगाराम ऐवजी केवळ राम राम म्हणून त्याची सेवा केली) व अजामेळाला नामस्मरणाचा सल्ला दिला. मात्र नामाशिवाय वेगळे सांगा असे अजामेळ म्हणाला असता त्याने तुला आता होणाऱ्या पुत्राचे नाव नारायण ठेव असे सांगितले. अजामेळाने त्याप्रमाणे त्याला झालेल्या पुत्राचे नाव नारायण असे ठेवले. तो त्याचे फार लाड करीत असे. सतत त्याच्या नावाने त्याला आवाज देत असे. अंतकाळी जेव्हा यमदूत त्याला नेण्यासाठी आले त्यावेळेला त्यांने नारायणाचे नाव घेतल्याने विष्णूचेही दूत त्याला नेण्यासाठी आले व त्यांनी यमपाशातून सोडवून त्याला वैकुंठाला नेले. या राम नामामुळे चंद्रमणीचाही उद्धार झाला.